Monday, January 17, 2022

खोली

ही ना अशीच स्वप्नातली एक खोली आहे. साधीशी. 
समुद्रकाठी. अस्मानी रंग असलेली खोली. self geometric design चे पांढरेशुभ्र पडदे. त्या खोलीचे दार उघडले की थेट समुद्र. नजरेत मावेल तितका. खिडकी उघडली की माड, पोफळ, फणस, काजूगर. खोलीत फरशी नाहीच. थेट समुद्राची वाळू. म्हणजे समुद्रावरून अनवाणी पायांनी चालत खोलीत आल्यावर वाळू आली, साफ करा हे म्हणायचे कामच नाही. खोलीत एक पण घड्याळ नाही. कॅलेंडर नाही.
त्या खोलीत ना एक मोठे सागवानी लाकडी कोरीव काम केलेले झाड. झाडाच्या प्रत्येक फांदीवर वर्गीकरण करून ठेवलेली पुस्तके. जास्त करून कवितांची, गझलांची, ललित लेख, कादंबऱ्या. काही पौराणिक. सर्व प्रकारच्या कला आणि शास्त्रांवर आधारित. अर्थशास्त्र सोडून सगळ्या विषयांवर. त्या झाडाच्या शेजारी एक सागवानी झोपाळा. भला मोठा झोपता येईल एवढा. पूर्वी चौसोपी वाड्यात अंगणात असायचा तसा. त्यावर एक लोड आणि तक्क्या. काश्मिरी टाके घालून पाना फुलांचे भरतकाम केलेला. त्याच्या शेजारी एक फिल्टर कॉफी मेकर मशीन. खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक सतार, हार्मोनियम आणि तबला. पु. ल. च्या रविवारची सकाळ सारखी मैफिल जमवायला. खोलीच्या तिसऱ्या कोपऱ्यात एक मोठा कॅनव्हास. आणि सोबत भरपूर रंग, ब्रश. चौथ्या कोपऱ्यात हंसावर बसलेली हातात वीणा घेतलेली शुभ्र वस्त्रें परिधान केलेली भली मोठी सरस्वती ची मूर्ती. 
या देवी सर्व भुतेशु विद्या रूपेण संस्थिता!!

कधीतरी विचार खोल खोल जातात. का करतोय एवढी मरमर. एवढी धावपळ. नेमके काय ध्येय? आणि मग विचार करत करत गेल्यावर ही खोली येते डोळ्यासमोर. निवृत्ती नंतर या खोलीच्या दिशेने वाटचाल करायची. स्वप्न सत्यात आणायचं. पुरेपूर उपभोग घ्यायचा. आणि मन भरले की थेट दार उघडून चालत राहायचे. समुद्राच्या वाळू तून आत आत. खोल खोल. समुद्राच्या गाजेचा शंख ध्वनी सारखा आवाज. समुद्राच्या मध्यात शेषशाही श्रीविष्णू आणि सोबत श्री महालक्ष्मी. खोली जास्तच गहिरी होत चाललेली. खोल खोल. समाधानी. शांत. तृप्त. 

-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment