झालं असं. खरंतर ती आमची सखी. त्याची ओळख झाली तीच, तिचा तो नवरा म्हणून झाली खरंतर. खूप चांगला स्वभावाने. सज्जन माणूस. पण त्यांचे काही कारणाने बिनसले. घटस्फोट झाला. काय? का? दोष कोणाचा. हे फक्त त्या जोडीचे प्रश्न. उत्तरं त्यांची त्यांनी शोधावीत. आणि ती गाठ स्वतः बांधावी किंवा उकलावी. यात आपल्याला पडायचे नाही कारण आपल्या हातात काही नाही. पण प्रश्न आता एवढाच. ती आमचीच सखी. तिला आधार देणे, साथ देणे हे तर करणारच. पण त्याचे काय? आता कोण तो आमचा? कोणीच नाही? अरे असं कसं शक्य आहे?
खरंतर आम्ही शिकत असतानाच तिचे लग्न झाले. सगळ्यात आधी तिचा नंबर. आमच्यासाठी काहीच बदलले नाही. आम्हाला मैत्रिणी सोबत एक चांगला मित्र मिळाला. तो थोडा मोठा आमच्यापेक्षा. आमच्याच IT क्षेत्रातला. आम्ही शिकत होतो, तो नोकरी करत होता. त्यामुळे एक सिनिअर या नात्याने पण आम्ही त्याचा सल्ला घ्यायला लागलो. त्याला पण लिखाणाची आवड. कवितांची आवड. मग आम्ही तिला भेटायला जायचो आणि सगळेच एकत्र गप्पांची मैफिल रंगवायचो. आमच्यासाठी तो फक्त तिचा नवरा नाही राहिला. आमचाही कोणीतरी झाला तो. एक चांगला निखळ मित्र. एक अचूक सल्लागार. घरचाच झालेला. नुसत्या गप्पागोष्टी नाही तर अगदी दवाखाने, लग्न कार्य प्रत्येक ठिकाणी हजर. कष्टाने, पैशाने, मानसिक आधार सगळेच. मनापासून. जीव तोडून.
आणि आता अचानक कळलं हे असं. पूर्ण तुटल्यावर कळलं. काय झालं. का झालं. या चर्चेच्या पलिकडल. क्षणात संपल सगळं त्यांच्यासाठी.
आता बोला. नात्यांची वीण इतकी सहज तुटते का? पिळे पडलेले सुटतात का? कळल्यावर पहिले तिला भेटलो. गळ्यात पडलो. रडलो. मोकळे झालो. तिला आधार दिला. आयुष्यभर देत राहू. यालाच तर मैत्री म्हणतात. आता पुढचा प्रश्न. चार वेळा वाटलं भेटाव त्याला हे सगळं कळल्यावर. पण आता त्याचा काय संबंध? त्याला कशाला भेटणार आता? खरंच आता कोण तो आमचा? खरंच कोणी नाही? कसं शक्य आहे?
आमच्या पिढीचं हे एक सोपं गणित असतं. असे गुंतागुंतीचे नाव नसलेले नाते आम्ही सहज मैत्रीचे नाव देऊन पुढे नेऊ शकतो. एकदा मैत्रीचे नाव दिले ना त्याला, की खूप सोपं होत जात सगळं. कोडं उलगडत जात सहज पणे. आणि मग खात्रीने सांगता येत. हो आम्ही भेटलो त्यालाही. तो रडला आमच्यासमोर तितक्याच मोकळेपणाने. आधार त्यालाही दिला. देत राहू. कायम. हो, मित्र आहे अजूनही तो आमचा. आणि राहील शेवट पर्यंत कायम. बाकी त्यांच्या आपसात घडलेल्या घटनांशी आमचा काही संबंध नाही. असल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.
-- अवनी गोखले टेकाळे
Very true. You should keep the relation. They are always needed.
ReplyDelete