Monday, March 14, 2022

पुनश्च हरी ओम

एक दिवस नेहमी सारखे ऑफिस मधून घरी आलो तेव्हा वाटले पण नव्हते की पुढचे दोन वर्ष आपण ऑफिस ला जाणारच नाही. मार्च 2020 - मार्च 2022.

पूर्ण चक्र बदलले डोक्यातले. विषय बदलले. जागा बदलली. जमेची बाजू वर्ष भर निवांत पहिल्यांदाच सासरी गावी सगळ्यांना एकत्र राहायला मिळाले. सगळ्या गल्लीच्या छान ओळखी झाल्या. एक वेगळे विश्व जगायला अनुभवायला मिळाले. पाण्याची उधळपट्टी कधी केली नव्हतीच पण तरी लातूर ला नव्याने पाण्याचे मोल कळले. बऱ्याच नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या. मुळातच पुण्या मुंबईत जो निवांतपणा शोधून पण सापडत नाही तो अनुभवायला मिळाला. म्हणावी तशी महामारी ची झळ सगळे सोबत असल्याने बसली नाही. 

काम चालूच होते ऑफिस चे. आंब्याच्या झाडाखाली बसून. एकदम निवांत. कसलीच झळ बसत नव्हती. पण तरी आपले घर आठवतेच. कुलूप लावलेल्या बंद चार भिंतीची आठवण काढून मन भरून येते हे पहिल्यांदा जाणवले. लोकल मध्ये गर्दी आहे, दगदग आहे, घाम आहे, चिकचिक आहे. पण तिच्याशिवाय काहीतरी अपूर्ण वाटायला लागले होते. जन्मभूमी पुणे आणि सासर लातूर हे माझे आहेच. पण माझी कर्मभूमी मुंबई आता मला अस्वस्थ करायला लागली होती. 

कुठेतरी ऑफिस चा फ्लोअर आठवत होताच. कितीही झाले तरी ज्या ठिकाणी दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ आपण घालवतो तिथे मन रेंगळतेच. दिवसात शंभर माणसं जाता येता भेटण्याची सवय असल्याने एकदम चार भिंतीत बांधल्या सारखे वाटू लागते. घरात बसून विषय बदलतच नाहीत काही असे वाटू लागते. हे चूक की बरोबर यापेक्षा हा रोजच्या सवयीचा परिणाम असतो. 

******

ऑफिस मध्ये परत यायची प्रोसेस डिसेंबर पासून सुरू झाली. आणि omicron आल्यामुळे परत आपले जैसे थे. त्यामुळे आमचा नंबर अजून लागलाच नव्हता. तो आत्ता लागला या महिन्यात. 
परत एकदा m indicator install करणे. ट्रेन चा पास काढणे. लेडीज डब्यात आता वेगळेच चेहरे. मग आधीच्या मुलींची आठवण. ट्रेन मधली खरेदी. चिकचिक घाम. लटकून केलेला प्रवास. आणि मग दोन वर्षानंतर ऑफिस मध्ये परत पाऊल. 

परत भेटल्याचा आनंद. धपाधप काढलेले फोटो. प्रत्येकाचे करोना चे अनुभव, युक्रेन युद्ध आणि त्यामुळे पडलेले शेअर मार्केट, ऑफिस चा performance review, कामाचे डिस्कशन हे आणि असे अनंत विषय. आणि तेव्हा कळले नेमके आपण काय मिस करत होतो ते. घरून काम करणे वेळ वाचवणारे आहेच. फोन लॅपटॉप यामुळे काम अडले नाहीच. पण चार भिंतीत एकटेच बसून काम करणे आणि प्रत्यक्ष ऑफिस ला येऊन काम करणे यात फरक आहेच. काम न अडणे आणि कामाचा आनंद घेणे यात जो फरक आहे तोच. 

****

माझ्या डेस्क वर पोचून शांत बसले दोन मिनिट. समोरचे मनी प्लांट. दोन वर्षात काही पान सुकून गेलेली. मुळाशी थोडी बुरशी धरलेली. पाणी अगदी थोडे तळाला शिल्लक. बाकी सगळे पिऊन घेतलेले. आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहिलेली छोटीशी पालवी दिसली. एकदम प्रसन्न वाटले. दोन वर्ष डोळ्यासमोरून गेली. आणि एक नवीन सुरुवात करायला मन सज्ज झाले. एक नवीन सुरवात. पुनश्च हरी ओम!!!

-- अवनी गोखले टेकाळे




1 comment: