Thursday, February 24, 2022

फासा

 ते नाही का. आपण शाळेत असताना खेळायचो. तोच खेळ. कानगोष्टी. त्यात कसं होतं ना. सगळ्यांनी गोल करून बसायचं. एका व्यक्तीने एक वाक्य बोलायचं दुसऱ्याच्या कानात. त्याने तिसऱ्याच्या. आणि मग जो सगळ्यात शेवट बसलेला व्यक्ती असतो त्याने ते मोठ्याने सांगायचे. मग बघायची गम्मत की खरे वाक्य काय होते आणि त्याचे शेवटी काय झाले. म्हणजे आपल्याला शिकवतात लहान असतानाच हा खेळ. पण आपण तो समजून घेत नाही. अगदी जाणते होईपर्यंत. सावरले पाहिजे वेळेत. ओळखले पाहिजे त्या व्यक्तीला. आपल्या बोलण्याचा ध चा मा करून आपल्या पाठीमागे दुसऱ्याच्या कानात सांगून कधी आपल्याला टपली मारून जाईल आणि आपला गैरफायदा घेऊन स्वतः ची पोळी खरपूस भाजून घेईल सांगता येत नाही.

तीच गोष्ट बुध्दी बळाची. वजीर आणि त्याच्यामागे एखादा प्यादा. एवढे पुरते चेक मेट व्हायला. समोरच्या वजिराला चार हात लांब ठेवलं पाहिजे. आणि आपल्या वजिरावर विश्वास ठेऊन त्याला जपून ठेवला पाहिजे शेवट पर्यंत. 

आणि मग शिकलेला सारीपाट. अंतिम सत्य. हिम आच्छादित शिखरावर उमा महेशाने मांडलेला भव्य सारीपाट. तिथे पोचायचे आणि त्या दोघात आपण विलीन व्हायचे. खूप लांबचा प्रवास आहे. जन्म मृत्यु चा पूर्ण फेरा.तोपर्यंत आपल्या परीने खेळत राहायचे. भातुकली चा डाव मांडत राहायचे. हरण्या जिंकण्या पेक्षा खेळत राहणे महत्त्वाचे. शिकत राहणे महत्त्वाचे. शेवटी फासे टाकणारी नियती. आपण फक्त प्यादे होऊन दान पत्करत जायचे. 

-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment