सदाशिव पेठेतील टिपिकल वाडा. गल्लीत एखादाच TV असण्याचा काळ. त्या गल्लीतले ते एकमेव कुटुंब म्हणजे आमचे जोशी. दर रविवारी संध्याकाळी लागणारे सिनेमे आणि ते बघायला गोळा होणारी सगळी गल्ली हे त्यावेळचे कॉमन दृष्य. त्यात असायचे हे दोघं. सीमा आणि रमेश. यांचे काही नाते नाही. पण दोघेही जोशी कुटुंबाचे लांबून नातेवाईक. त्या काळी सगळे लांबचे जवळचेच असायचे. त्या नात्याने हे दोघे त्या घरातलेच मेंबर. एरव्ही आपापल्या कॉलेज विश्वात दंग असणारे हे सीमा रमेश, बरोबर रविवारी संध्याकाळी पिक्चर सुरु व्हायच्या आधी जोशींकडे हजर.
जोशींचे वाड्यात दोन खोल्यांचे घर. त्यात दहा माणसं. त्यामुळे एका रविवार च्या सुट्टीच्या दिवशीचा (तेव्हा काही शनिवारी सुट्टी नसायची. असलाच तर half day जो की पूर्ण संपलेला च कळायचा.) फालुदा करणारे हे सीमा रमेश हळूहळू घरच्यांच्या चर्चेचा विषय बनायला लागले. घरच्यांना कुठे बाहेर जायचे असेल, लग्ना कार्याला जायचे असेल तरी हे पिक्चर बघायला हजर. बरं धड नाते नसलेल्या या दोघांवर घर सोडून घरातल्यांना बाहेर फिरायला जाणे पण जमेना. हॉल मध्ये सीमा रमेश चा पिक्चर रंगात यायचा. नी त्याच्यासोबत घरातल्या बायकांचे कांदा भजी, चहा पुरवणे चालूच. तिकडे टीव्ही वर दोन फुलं जवळ आलेली दिसली की आलाच स्वयंपाक घरातून भांडे जोरात आपटल्याचा आवाज.
बरं प्रेम बिम असावे यांचे दोघांचे तर ते पण काही चिन्ह दिसेना. निदान लग्न तरी करून टाका. नाही म्हणायला सारखे समोर बसतात, जात पात एकच आहे. पण तेही नाही. नेमके काय गौडबंगाल बंगाल आहे कोणालाच कळेना. जोशी बुवांनी काय मग आता कॉलेज संपून नोकरी लागली. आता पेढे कधी असे आडून दोघांना विचारले सुध्धा. पण त्यांची मजल आपली रविवारी जोश्यांकडे पिक्चर. एवढेच काय ते.
फक्त नावात तेवढे साम्य निघाले. एवढे सिनेमे बघून कोरडे ठाक राहिलेले हे सीमा रमेश. शेवटी एकदा रितसर कांदे पोहे करून दोघे वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर संसार थाटून आपापल्या प्रवाहाला लागले. वळणाचे पाणी वळणाला लागले आणि दोन खोल्यात राहणाऱ्या जोशींच्या कुटुंबातील तीन जोडप्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आता कुठे या जोड्यांची रविवार संध्याकाळ "मोगरा"ळायला लागली. आणि एकदा च्या त्या पिक्चर रूटीन ला खंड पडून तीन जोड्या आणि लहान लेकरं असे बागेत फिरायला जायला लागले. गजरे, भेळ आणि सगळ्या मुलांमध्ये एखादा बॉल नाहीतर फुगा. वातावरण हलके फुलके झाले. भांड्यांचे पोचे पडणे बंद झाले. जोशींनी शेवटी सिनेमा अनुभवला तो रविवारचा टीव्ही बंद झाल्यावरच!
काय कोडे होते ते शेवट पर्यंत उलगडले नाही ते नाहीच. पण आजही जोशी कुटुंब त्यांच्या पाठीमागे त्यांना सीमा देव आणि रमेश देव असेच म्हणते.
-- अवनी गोखले टेकाळे
या जोश्यांचे किस्से न संपणारे आहेत. कोकणातून हनिमून करायला एक नवदाम्पत्य या दोन खोल्यात, दहा माणसात येऊन राहिलं होतं म्हणे. त्यांना एकांत मिळाला असेल का? मधू इथे अन् चंद्र तिथे! त्यांच्या हनिमून ची रंजक कहाणी पुढच्या वेळी.
No comments:
Post a Comment