Sunday, December 26, 2021

समुद्र.. अंतिम श्वास..!!

हे सागरा. तुझी ओढ घेऊन येतेच तुझ्या पर्यंत. परत परत येतच राहणार तुझ्या विसाव्याला.  प्रत्येक वेळी वय वेगळे. विचार वेगळे. लहरी वेगळ्या. तू तोच. अथांग. अमर्याद. प्रत्येक तरंग सामावून घेणारा. 

माहित आहे तुला. तुझ्याशी बोलायला नाही तर तुला ऐकायला येते तुझ्याकडे. वेळाकाळाचे भान न राहता भरती ओहोटी चे चक्र अनुभवायला येते इथे. तुझी गाज ऐकायला येते इथे. फक्त तू बोलतोस, मी विचार करायच्या पलीकडे जाऊन एका निर्वात पोकळी मध्ये असते फक्त तुला ऐकत. तुझ्या सोबत शेष ही अनुभवते आणि अनंत ही. 

डोळे मिटायचे आणि अनुभवायची प्रत्येक लाट तुझ्या गाजेतून. डोळे उघडून फक्त मोजायची. एक.. दोन.. तीन.. आठवी लाट मोठी भरती कडे नेणारी. परत सुरू.. एक दोन.. तीन.. किती मोजले.. किती तास मोजले.. माहित नाही.. 

तुझ कसं आहे ना. तू ओळखतोस मनातलं. त्यामुळे सुख. बोलायला लागतच नाही तुझ्याशी. शांत बसून राहायचं. मनातले संभ्रम आपसूक मिटतात. मार्ग मिळतात. प्रश्न सुटतात. आणि मग एक क्षण येतो. काहीच विचार येत नाहीत. आधी वाटायचं अशक्य आहे. विचारा शिवाय मन म्हणजे मृत्यू अवस्था. पण नाही. तुझ्या सोबत ती निर्वात पोकळी अनुभवता येते. यापेक्षा अजून नशीबाची गोष्ट काय. घर दार संसार कुटुंब नोकरी आप्त मित्र सगळ्याच्या पलीकडल काहीतरी. फक्त तूच तो. सगळं गुपित माहिती असलेला. माडाच्या बनातून पलीकडे पोहोचलो की पसरलेला अथांग तू.

तूच तो. अगस्तीन्नी गिळलेला. तूच तो. सरीतेला भिडलेला. तूच तो. शशांकाकडे पाहत उसळलेला. तूच तो. नारळी पौर्णिमेला उधाण आलेला. तूच तो. ज्याला बघून स्वातंत्र्यवीरांचा प्राण तळमळला. तूच तो. ज्याने स्वतः ला घुसळून मंथन घडवून आणले. तूच तो. नरहरी आणि श्री लक्ष्मी यांना आसरा द्यायची ताकद असणारा. तूच तो. 

तू असशील का रे सोबत. अंतापर्यंत. तुला काय सांगायचे. नाळ ही तू, माहेर ही तू, प्रेम ही तू, प्रणय ही तू. साक्षात्कार ही तू, विश्र्वरूप ही तू. सगळे जाणणारा तू. आम्ही फक्त ऐकायचे. या अवनी वरचा कार्यभार संपला की परत येणार तुझ्या कुशीत. किनाऱ्यावर पावले उमटवत चालत राहणार आत आत तुझ्या पोटात. मोजत राहणार. पहिली लाट. दुसरी लाट. तिसरी लाट. आता आठवी लाट सगळ्यात छोटी. ओहोटी लागलेली. किनाऱ्याची प्रत्येक वस्तू ओहोटी ला आत आत घेऊन चाललेला तू. आणि दूरवर शंख ध्वनी. तुझी गाज कानात घुमत आहे का पोहचत आलो आत आत अंतिम ध्येया पर्यंत. शेषशाही श्री विष्णू. पायाशी श्री महालक्ष्मी. आणि भोवती अथांग पसरलेला. तूच तो. हे उदधि, हे पयोधि, हे निरनिधि. तुझी ओढ घेऊन येतेच तुझ्या पर्यंत. अथांग. अमर्याद. प्रत्येक तरंग सामावून घेणारा. तूच तो. सागरा. तुझ्या कुशीत हे पूर्ण समर्पण. सामावून घेशील ना. तुझ्या पोटात अंतिम श्वास घेऊन देशील ना.

-- अवनी गोखले टेकाळे 


No comments:

Post a Comment