Tuesday, December 31, 2019

आमचे येथे नाविन्यपूर्ण संकल्प सुचवले जातील..

ते संकल्प वगैरे सुरु होतील ना उद्यापासून.. मग काय एक आठवडा पहाटे रस्त्यावर तुरुतुरु चालणाऱ्या लोकांचा पूर.. म्हणजे ढेरी कमी करणे ही संकल्पाची मुख्य जात आणि त्याला जोडून येणाऱ्या morning walk, gym, diet वगैरे संकल्पाच्या "पोट"जाती.. झालंच तर नोकरदार माणसांचा अजून एक ऐतिहासिक संकल्प म्हणजे या वर्षात प्रमोशन मिळाले पाहिजे.. बस इतकंच? खरं तर सुदृढ शरीर आणि आर्थिक स्थैर्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत.. तर हा लेख त्यांच्यासाठी, ज्यांना नवीन वर्षात काहीतरी वेगळे संकल्प करायचे आहेत पण हे दोन संकल्प सोडून दुसरे काही विशेष सुचत नाहीये.. २०२० वर्षाचे स्वागत करा या २० संकल्पातून.. 
  1. दिवसभरात टीव्ही चा वेळ आणि आवाज जितका कमी करता येईल तितका कमी करणे 
  2. घरात असताना मोबाईल एका कोपर्यात ठेऊन देणे.. जसा पूर्वी landline असायचा.. 
  3. दिवसभरात ठराविक वेळ तरी कुठलाही व्यत्यय येऊ न देता कुटुंबाशी संवाद साधणे 
  4. खळखळून हसणे, ढसाढसा रडणे अशा क्रिया अत्यंत नैसर्गिक असून न लाजता सातत्याने करत रहाणे 
  5. नवीन मित्र जोडणे 
  6. जुन्या मित्रांना आवर्जून भेटणे(भेटणे बरं का.. फोन किंवा whats app नाही.. ) 
  7. मित्र आणि couligue यामधील फरक ओळखणे 
  8. सुंदर melody आणि lyrics असलेली गाणी ऐकणे 
  9. छान कागदाचे पुस्तक हातात धरून वाचणे.. (कागदाचे पुस्तक म्हणजे e-book नको थोडक्यात)
  10. नातेवाईकांना आवर्जून वेळ देणे 
  11. एखादे पत्र लिहिणे 
  12. निसर्गाच्या जवळ नेणारी एखादी तरी ट्रिप करणे 
  13. आपला छंद मुलांसमोर जोपासणे(एकही छंद नसेल लहानपणापासून, तर जास्त विचार करणे) मुलांसमोर यासाठी की ते अनुकरण करत असतातच की.. 
  14. दरमहा थोडी बचत करून पैसे गुंतवणे 
  15. एखादे नवीन technical skill develop करणे 
  16. कुठल्याही क्षणी आहे ती नोकरी जरी सोडायला लागली तरी उद्या काय याचा विचार करून ठेवणे 
  17. वेगवेगळ्या policy, scheme यांची योग्य चौकशी करून भविष्य सुरक्षित करणे
  18.  जेवण, झोप आणि व्यायाम यांच्या वेळा पाळणे 
  19.  आवर्जून पाठांतर करणे 
  20. आत्मविश्वासाने जगणे 
आता हे सगळं जर तुम्ही रोज करतच असाल तर मग काय करणार नवीन.. काही नवीन संकल्प वगैरे करू नका.. तुमचा सुखी माणसाचा सदरा फक्त पाठवून द्या..
आता म्हणाल एवढे फंडे मारत आहे तर तुझा काय २०२० चा संकल्प… तर एक ब्लॉग सध्या फार viral होत आहे.. "आमचे येथे नाविन्यपूर्ण संकल्प सुचवले जातील.." तर एक वाचक म्हणून वाचून बघते तो.. काही सुचतंय का.. !!!
बाकी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का..!!! आणि हो जाता जाता अजून एक महत्वाचे.. नवीन वर्षात हा एक संकल्प अवश्य करा.. रोज वाचत रहा..  "तुमचेच रहाट गाडगे .. माझ्या लेखणीतून.." !!! -- अवनी गोखले टेकाळे 



Friday, December 20, 2019

तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे..

रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 
तशी मी जाते एक दोन महिन्याला.. शनिवारी सकाळी उठायचं.. बॅगेत सापडतील ते दोन ड्रेस घालायचे आणि निघायचं.. एक रात्र राहायचं आणि रविवारी संध्याकाळी परत.. येताना एक बॅग ektra हातात.. (कारण काय सांगायचे वेगळे.. आठवा फक्त तुमचीही माहेरून निघताना सामानाची कथा.. ) तर हि कहाणी या दीड दिवसाची.. तुमची माझी नावं वेगळी.. गावं वेगळी.. पण ही कहाणी थोडी फार तुमचीही तितकीच जितकी माझी..!! ही जेवढी एका लग्न झाल्यावर दुसऱ्या गावीसासर असणाऱ्या मुलीची तितकीच मूळ गाव सोडून नोकरीला दुसऱ्या गावी गेलेल्या मुलांची सुद्धा.. 
फक्त माय चे घर म्हणजे माहेर एवढी सोपी सरळ व्याख्या नाही ती.. फारच कंगोरे आहेत याला.. लहानाचे मोठे झालो ते घर, तिथल्या आठवणी, सगळे माहेरचे नातेवाईक, सासरचे खूप सारे नातेवाईक, भरपूर मित्र.. सगळेच आहेत इथे माहेरच्या गावाला.. शाळा, कॉलेज, ऑफिस, क्लास आणि गप्पांचे कट्टे सगळेच आहे इथे.. इथल्या हॉटेल मधील जेवण चविष्ट कि गप्पा चविष्ट हा एक जागतिक चर्चेचा विषय आहे.. जी कथा हॉटेल ची तीच शॉपिंग ची.. एवढंच काय माझा शिंपी, डेंटिस्ट, पार्लरवाली आणि असे बरेच "वाले" अजूनही इथेच आहेत.. या सगळ्यांना बसवायचं असत दीड दिवसात.. काही भेटतात, काही रुसतात, काही समजून घेतात.. कोणाला भेटायचं असा प्रश्न आयुष्यात पडण्यापेक्षा वेळ कमी पडला म्हणून भेटता आलं नाही हे जास्त छान.. कशाला अली भेटायला असं वाटण्यापेक्षा भेटायला आली नाही म्हणून रुसणारे आहेत हे जास्त छान.. आपण जमेल तेवढं जमवत रहायचं.. बाकीच्यांना next time म्हणत राहायचं.. दीड दिवसाचं माहेर मिरवत राहायचं.. 
आपला जीव सगळीकडेच अडकतो.. हेही सोडवत नाही आणि तेही.. सासरचे पण इतके आहेत माहेरच्या गावात कि कधी कधी गावी जाऊन पण "घरी" जायलाच होत नाही.. घरचे उलट खुश होतात म्हणतात रुळली सासरी अजून काय हवं.. तरीही मन हुरहूर लावतच.. अशावेळी डोळ्यातला चुकार थेंब जाताना गल्लीत सोडून जायचं.. तीन तास मनात घर आठवत राहायचं.. अशावेळी माहेरच्या गल्ल्या सुद्धा आधार देतात.. जुने क्षण आठवून उगाच हसवून जातात..
इथले रस्ते सांगताना मी नेहमी गोंधळात पडते.. सगळे चिडवतात कि इतकी वर्ष गेली तुझी इथे, इतकी फिरलीस बाईक वर पण तुला रस्ते कसे सापडत नाहीत.. काय सांगू इथल्या रस्त्यावर ढीगभर आठवणी सोडल्या आहेत.. त्या आठवणींच्या पाठीमागे जाताना चार गल्ल्या पुढे गेलेले असतो आणि मग सगळंच हरवल्यासारखं वाटत.. रस्ताही आणि आठवणीही.. आणि मग मी एकच पुणेरी वाक्य बोलते फक्त.. पुणे फार बदललं ना अशात.. 
आपलं म्हणजे कसं दीड दिवसाच्या गणपती सारखं.. एकच आरती.. त्यातच सगळ्यांना बोलवायचं.. तेव्हाच वाटायचा प्रसाद, तेव्हाच दाखवायची आरास, बाप्पाला मनात साठवायचं ते पण तेव्हाच आणि पुढच्या वर्षीची आरतीची स्वप्न रंगवायची ती पण तेव्हाच.. 
तसं सुखासुखी चालू असतंच कि सासरी.. काही तक्रारी करायला जायचं नसतं ,माहेरी.. महत्वाचं असं काहीच काम नसतं.. पण उगीच थोडं पाय पसरून सुस्त व्हावं असं वाटत.. हातातलं घड्याळ थोडं काढून ठेवावं वाटत.. तेवढंच समाधान वाटत मनाला कि रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याचं ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे.. 

Tuesday, December 10, 2019

छोटी छोटीसी बात

शीर्षक वाचून अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा आठवले ना.. तशीच काहीशी आहे ही गोष्ट.. आमच्या एका मित्राची एक छोटीसी बात..

आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो..  पनवेल हार्बर लाईन चे पहिलेच स्टेशन..  त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीट साठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो.. तो गजाला डोके लावतो आणि डोळे खिडकीच्या बाहेर काढतो.. नेरुळ यायची वाट बघत उगाच वेळ काढतो..

नेरुळ ला "ती" चढते.. धावत पळत.. ladies first class मध्ये.. डोक्यावर गुंडाळलेले ओले केस, लेगीन कुर्ता, गळ्यात ऑफिस चे I-card आणि एका खांद्याला लॅपटॉप बॅग लटकलेली.. खिडकीच्या बाहेर काढलेले त्याचे डोळे भरून पावतात.. तिला आजही बसायला जागा मिळतच नाही.. ती दारात ओथंबून उभी.. पायात बॅग सावरून ती बॅग मधून पुस्तक काढून वाचायला सुरवात करते.. तिला पुस्तक वाचताना बघून आपण कसे काहीच वेगळे करत नाही याचा त्याला आज परत एकदा साक्षात्कार होतो.. तो आजपण ठरवतो.. उद्यापासून आपण पण पुस्तक वाचायचं.. नकळत ती पुस्तकाच्या मागून त्याला बघते.. रोज बघून सवयीच्या झालेल्या त्याला एक smile देते.. तो घायाळ.. दिवस सार्थकी.. जमेल तेवढा मोठा श्वास घेऊन पोट आत घेत तो return smile देतो.. आपल्याला अबरचबर खाणे कमी करून पोट कमी केले पाहिजे याचाही साक्षात्कार त्याला परत एकदा होतो.. तो आजपण ठरवतो उद्यापासून gym नक्की.. बास!! एवढीच त्यांच्यामधली काय ती देवाण घेवाण..

ती घणसोली स्टेशन आल्यावर थोडे केस ठीक करते.. मोबाइल adjust करत एकदा थोडा चेहराही ठीक करते.. रबाळे स्टेशन आल्यावर ती उतरते.. त्याला आठवत आता पुढचं स्टेशन आपलं.. कासवासारखं अंग आकसून घेत ऐरोली ला तोही खाली उतरतो.. तिच्या एका smile मुळे घायाळ झालेल्या त्याला सगळी romantic songs एकाच वेळी म्हणावीशी वाटत असतात.. उगाच गालात हसत तो ऑफिस मध्ये शिरतो.. ऑफिस मध्ये लॅपटॉप बडवताना सुद्धा दिल गार्डन गार्डन.. मग  चहा पिताना घडलेला सगळा प्रकार तो आम्हाला तपशील वार सांगतो..

२ वर्ष हे सगळं असंच चालू आहे.. आम्हाला जरी ती मुलगी रस्त्यात दिसली तरी तिला ओळखू आम्ही; इतके तपशीलवार वर्णन आम्ही २ वर्ष ऐकत आलो आहे.. सगळे त्याला सांगत असतात अरे एकदा उतर तू पण तिच्या सोबत रबाळे ला.. बोला कि काहीतरी.. पण सांगितलं ना.. तसं केलं असतं त्याने तर आजच्या जमान्यातला अमोल पालेकर का म्हणलं असतं..

एक दिवस तो येतो.. resignation देतो.. तीन महिने संपतात तरी सांगत नाही कुठे चालला ते.. आमच्या डोक्यात त्याच्या सोबत ती उगाचच.. उगाचच उदास उदास..शेवटच्या दिवशी निघताना त्याचे डोळे चमकतात.. दिल गार्डन गार्डन.. तो एवढंच म्हणतो आता उद्यापासून प्रवासाचे एक स्टेशन कमी.. आता रबाळे लाच उतरणार..

आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो.. पनवेल हार्बर लाईन चे पहिलेच स्टेशन.. त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीट साठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो..

रंग बदल बदल.. मन को मचल मचल..
रहे है चल न जाने क्यू वो अंजान पल.. !!!


स्वतःभोवती गिरकी मारणारी थोडी थोडी "अवनी" आहे..

आपल्या मर्यादा माहित असलेली, तरीही जे आवडत त्यात दिलखुलास रमणारी मी माझीच favourite आहे.. कधी कागदावर उमटणाऱ्या शब्दातून झिरपत असते.. कधी रेशमाच्या लडींमध्ये, कधी आवडीच्या पुस्तकामध्ये.. कधी मण्याच्या तोरणांमध्ये, कधी स्वयंपाकाच्या तडक्यामध्ये सतत स्वतःला शोधत असते.. कधी splandor च्या भन्नाट स्पीड मध्ये तर कधी लोकल ट्रेन च्या गर्दीमध्ये स्वतःला मिरवत असते.. कधी कॉलेज मधले ट्रेक तर कधी गिटार च्या chords आठवते.. working mother ची तारेवरची कसरत करते.. कधी कणखर तर कधी हळवी.. कधी वीज तर कधी झीज आहे.. कधी अस्ताव्यस्त रान कधी जगण्याचं भान आहे.. कधी आकाश कधी क्षितिज कधी थोडी "अवनी" आहे.. मस्तीत जगणारी, स्वतःभोवती गिरकी मारणारी थोडी थोडी "अवनी" आहे.. 

Wednesday, December 4, 2019

गंधाली… गंधाच्या भोवती राहून गंधाच्या प्रतीक्षेत ती..

ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून.. डोक्यावर फुलाची पाटी घेऊन.. या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये.. तिच्या पाटीतले रंग मोहक.. तिच्या पाटीतले गंध मोहक.. पण आत्ता तिच्या पर्यंत ते पोचत आहेत का नाहीत माहीत नाही.. ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून..  
ट्रेन च्या गर्दीत माणसांच्या घामाचे वास घेऊन पिचलेले चेहरे आणि त्यांच्या कपाळावरची आठी सपाट होते जेव्हा ती धावत पळत त्या डब्यात शिरते.. ती फुलाची पाटी बघून कोणी मोहरते.. कोणी फुलते.. कोणी उमलते.. कोणी आठवते.. कोणी स्वप्नाळते.. कोणी गंधाळते.. पण ती.. ती फक्त गंध विकते.. ती हसऱ्या चेहऱ्याने पैसे घेते.. बटव्यात टाकते आणि पुढच्या स्टेशन ला पळत खाली उतरते.. पलीकडे प्लॅटफॉर्म बदलून दुसऱ्या ट्रेन मध्ये चढते.. ती फक्त पळते.. 
तिनी कधी नशिबाला दोष नाही दिला.. तिनी कधी आत्महत्येचा प्रयत्न नाही केला.. तिनी कधी भीक मागायला हात नाही पसरले.. तिनी शाळेचा चेहरा नसेल बघितला पण या जगाने खूप शिकवले तिला.. तिला जेवढी माणसं कळतात तेवढी आपल्यालाही नाही कळणार.. तिला नाही कळत women empowerment चा अर्थ.. पण तिला आपल्या डोक्यावरची पाटी कशी सांभाळायची ते कळत.. तिला child labour चा अर्थ नाही कळत.. पण आपलं पोट कसं भरायचं एवढं कळत.. तिला abuse शब्दाचा अर्थ नाही कळत.. पण कोणी पैसे देताना हात दाबायचा प्रयत्न केला तर त्याला गुलाब देता देता काटा कसा रुतावायचा हे तिला अचूक कळत.. ती आक्रोश करत बसत नाही.. चिडत नाही.. रडत नाही.. नियतीने तिच्या डोळ्यातलं पाणी कधीच अटवल आहे.. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू अजून टिकून आहे.. उमलत जाणाऱ्या कळी प्रमाणे.. मार्ग काढत राहते.. पुढे जात राहते.. पळत राहते.. पायाला भिंगरी लावून.. 
ती रोज दिसते.. तिच्या केसात कधीच नाही पाहिले एखादे फूल लावलेले.. एका फुलाची किंमत तिच्याएवढी कोणाला कळणार.. ते विकत घेण्याएवढा तिचा बटवा अजून उबदार नाही झाला.. ती रोज पळते.. गंध विकते.. पण गंधाच्या दुनियेत राहूनही गंधाच्या प्रतीक्षेत आहे ती.. तिच्या मनात एकच स्वप्न छोटंसं.. जे पूर्ण होण्यासाठी धावत आहे ती.. 
"एक दिवस आपणही एक फूल विकत घेऊन केसात माळावं.. तोऱ्यात मिरवावं.. उगाच गालात हसावं.. थोडंसं मोहरावं.. थोडंसं फुलावं.. थोडंसं झुलावं.. थोडंसं गंधाळावं.. आपल्या पैशानी एक फूल विकत घ्यावं.. हक्काचं"
हे स्वप्न मनात घेऊन ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून.. डोक्यावर फुलाची पाटी घेऊन.. या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये.. तिच्या पाटीमधले रंग मोहक.. गंध मोहक… पण आत्ता तिच्या पर्यंत ते पोचत आहेत का नाहीत माहित नाही.. ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून..


व्यंकटेश सुप्रभातम

कौशल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्हिकं !!१!!

>> हे श्रीरामा, कौसल्येचा पुत्र पूर्वेकडून पहाटेचे आगमन होत आहे.. हे नरशार्दुला आपली दैनंदिन दैवी कर्तव्य पार पाडण्यासाठी उठा, जागे व्हा..

उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यम मंगलम कुरु !! २!!

 >> हे गोविंदा, हे गरुडध्वज उठा, जागे व्हा.. हे कमलाकांता त्रैलोक्याचे मंगल करण्यासाठी उठा, जागे व्हा..

हा झाला या दोन कडव्यांचा शब्दार्थ.. आता भाषेच्या लहेज्याबद्दल आणि व्याकरणाबद्दल थोडेसे..

राम, गोविंद, गरुडध्वज, कमलाकांत या सगळ्या शब्दांचा अर्थ श्री विष्णू .. भगवान विष्णू यांना संबोधून हे लिहिले असल्यामुळे या शब्दांची विभक्ती संबोधन एकवचन ही आहे..

उत्तिष्ठ म्हणजे उत + स्था (तिष्ठ) धातू .. ज्याचा अर्थ उठा असा आहे.

देवांच्या नावांमध्ये बऱ्याच वेळा बहुव्रीही समास वापरलेला आढळतो.. म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन तिसरा शब्द तयार होतो.. जसे की..
गरुडध्वज - गरुड आहे ध्वजावर ज्याच्या असा तो
कमलाकांत - कमला (श्री लक्ष्मी) चा पती

पुढची कडवी लवकरच.. 

Thursday, November 28, 2019

अमृतवाणी, संस्कृत भाषा.. नैव क्लिष्टा न च कठिणा!!

एक नवीन प्रयत्न करत आहे.. संस्कृत भाषेची गोडी उलगडण्याचा प्रयत्न.. अवघड वाटते का तुम्हाला भाषा.. तर हे पहिले सुभाषित वाचा.. शाळेत संस्कृत विषय सुरु झाल्यावर दाणी बाईंनी वर्गात शिकवलेले हे पहिले सुभाषित..

सुरस, सुबोधा, विश्वमनोज्ञा, ललिता, हृद्या, रमणीया!
अमृतवाणी, संस्कृत भाषा.. नैव क्लिष्टा न च कठिणा!!

भाषेचे वर्णन करणारे इतके सुंदर सुभाषित ज्या भाषेमध्ये आहे.. ती भाषा आतून किती सुंदर असेल..

या लेखमालेची सुरवात करणार आहे.. व्यंकटेश सुप्रभातम पासून.. व्यंकटेशाचे आणि पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणाचे अप्रतिम वर्णन.. संस्कृत भाषेमधले माधुर्य, गोडवा, अचूक व्याकरण आणि शब्दसंपदा.. हे सगळेच खूप मोहून टाकते.. ज्याला आपण positive thinking म्हणतो त्यालाच आपले पूर्वज श्लोक, स्तोत्र, सुभाषित म्हणायचे.. तर आस्तिक आणि नास्तिक याच्या पलीकडे जाऊन थोडे जाणीवपूर्वक positive thinking करूया.. सुप्रभातम चा स्वैर मराठी अनुवाद करण्याबरोबरच भाषेचा गोडवा उलगडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे.. जसजसा वेळ होईल तसतसे एक एक कडवे उलगडून दाखवेन.. या प्रयत्नांना तुमच्या अभिप्रायाची साथ मिळावी हीच अपेक्षा..

गीर्वाण भाषेची मनापासून ओढ वाटणारी .. अवनी गोखले टेकाळे.. 

Tuesday, November 26, 2019

सामान्य मतदार आणि त्याच मत..

सामान्य मतदार आणि त्याच मत.. अवनी गोखले टेकाळे

निवडणुका जाहीर झाल्यावर तो..
त्याचं असं एक मत असतं.. ते कोणासाठी तेही ठरलेलं असतं.. तो हिरीरीने ते सगळ्यांना पटवून देतो.. मतभेद होतात त्यांच्याशी तो वाद घालतो.. what's app वरती, Facebook वरती.. त्यासाठी तो इकडून तिकडून आलेल्या forwarded posts चा  database तयार करतो.. तो घरी येतो.. शाळेतल्या मुलीचा नागरिक शास्त्राचा अभ्यास घेतो.. नुकतीच १८ वर्ष झालेल्या मुलाचे नाव मतदार यादीत सामील झाल्याची खात्री करून घेतो.. एकूणच काय तो एक सुजाण नागरिक असतो..

निवडणुकीच्या दिवशीचा तो..
तो मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठतो.. आपल्या एका मताला सुध्धा खूप किंमत आहे यावर त्याचा विश्वास असतो.. त्यामुळे मतदान न करता long weekend साजरा करायला गोव्याला जायचं तो अजिबात डोक्यात आणत नाही.. दाढी अंघोळ देवपूजा करून बाहेर पडतो..केंद्रावर जाताना आधार card, voter card, pan card जमलच तर एखादा फोटो थोडक्यात काय सापडेल ते सगळ हातात घेऊन खोली नंबर घोकत बाहेर पडतो.. रांगेत ज्येष्ठ दिसले तर हात धरतो.. तरुण मुलांना समजून सांगतो.. हळू हळू रांगेतून पुढे सरकतो.. तो आत जातो बटन दाबतो.. आवाज ऐकतो.. चित्र उमटल्या ची खात्री करतो.. डाव्या हाताच्या तर्जनीचे नख काळे करून बाहेर येतो.. मग चेहऱ्याच्या शेजारी तर्जनी बसवून मोबाईल हवेत तिरका धरून उगाच हसतो.. मग तो फोटो सगळी कडे पाठविल्यावर त्याच कार्य पूर्ण होत.. हे सगळ सकाळी ८ वाजता अावरुन तो घरी चहा पोहे समोर यायची वाट बघत पेपर वाचतो..

रिझल्ट च्याच प्रतीक्षेत तो..
तो ऑफिस मधून घरी येतो.. हात तोंड धुवून टीव्ही समोर बसतो.. तो ठराविक वेळ बातम्या बघतो.. थोडा खुश होतो .. थोडा वैतागतो.. थोडा बडबड करतो स्वतःशीच..
मग शांत होऊन तो किती वाजले ते बघतो.. आजही आठ वाजल्यावर तो शनाया च बघतो..
त्याला खरंच फरक पडतो का? कोण आले कोण गेले.. त्यानी ठरवलं तरच त्याला फरक पडतो.. त्याला सगळं कळतं.. त्याला सगळं समजत.. "हॉटेलिंग" करता येत नाही म्हणून त्याला दुःख नसत.. आपल्या चौकोनी कुटुंबात तो कांदे पोहे खाताना सुध्धा समाधानी असतो.. तो गप्प बसला असला तरी आजही त्याला एक आवाज असतो.. पण तो कधी कुठे कसा कोणासाठी.. त्याच त्याच गणित ठरलेलं असतं!!.. हो, आजही त्याला त्याच एक मत असतं .. पण ते कधी कुठे कस कोणासाठी.. त्याच त्याच गणित ठरलेलं असतं.. !!

Tuesday, November 19, 2019

कलेचा जागर.. कलाकाराचा जागर।।

कलेचा जागर.. कलाकाराचा जागर।। एकदा तूही काहीतरी लिहून तर बघ.. !!
माझे लेख आणि कविता यांचे वाचन करायचा हा नवीन प्रयोग करत आहे.. माझा हा video log बघून तुम्ही तुमच्या छंदांना परत वेळ द्यायला नक्की सुरवात कराल अशी अपेक्षा आहे.. तुमच्या प्रतिक्रिया मला video च्या खाली नक्की द्या.. आणि frequent updates साठी channel ला  like, share, subscribe करायला विसरू नका..

https://youtu.be/CXuycK7EPVw

Monday, November 18, 2019

हे मुंबई.. तू माझी lifeline आहेस..

तू स्वप्न बघायला शिकवलेस.. त्यांना पूर्ण करायचा मार्गही तूच दाखवलास.. प्रत्येक मिनिटाची आणि प्रत्येक रुपयाची किंमत तू शिकवलीस.. वेळ आणि पैसा कमवायची वाटही दाखवलीस.. माज आला तर जमीन दाखवलीस.. खचले तर आभाळ दाखवलंस.. सुख आणि दुःख याच्या बरोबरीने थकव्याने सुद्धा डोळ्यात पाणी येत हे दाखवून दिलंस आणि ते अलगद झेलणारीही तूच होतीस.. तू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना भेटवलंस.. माणसं वाचायला शिकवलीस.. लिहायला विषयही दिलेस.. तळहातावरच्या रेषांमागे धावायला शिकवलेस.. मध्येच तीच मूठ उलटी करून "time please" म्हणायला शिकवलेस.. तुझ्या पोटातल्या या एका ठिपक्याला त्याच्या अस्तित्वासकट उभे राहायला शिकवलेस. माझी कर्मभूमी म्हणून मला तुझा खूप आदर आहे.. हे मुंबई.. तू माझी lifeline आहेस.. 

"चुडा"

गाडीचा हॉर्न ऐकून ती लगबगीने बाहेर आली.. गाडीतून त्याचे आई, वडील, बहीण उतरले तिला  मागणी घालायला.. आणि मागोमाग तिच्या स्वप्नातला "शाहरुख खान" जसा उतरला गाडीतून तेव्हा तिच्या नकळत चेहरा खुलला तिचा.. एक अनामिक लाली चढली तिच्या गालावर, ओठांवर, साडीवर, अवघ्या देहावर.. आज चौकटी बाहेरचे खुले आभाळ तिला खुणावत होते.. तरीही त्या वाड्याची जुनी पण तितकीच भक्कम मजबूत भिंत तिला थांबवत होती तिथेच.. त्या वाड्यातले सोज्वळ संस्कार तिच्या मनावर इतके रुजलेले कि तिचे पाऊल अजूनही योग्य वेळेची वाट बघत तिथेच घुटमळलेले.. तिच्या मुक्त केसांच्या लहरींसारखे तिचे मन हिंदोळलेले पण अजूनही पाऊल मात्र तिथेच दारात थबकलेले.. 
त्याची बहीण म्हणजे तिची जीवश्च कंठश्च मैत्रीण.. काही दिवसांपूर्वी याच मैत्रिणीच्या लग्नात पडेल ते काम करायला म्हणून गेलेल्या तिला काय माहित होते कि हीच मैत्रीण काही दिवसांनी आपल्याही दारात वरात घेऊन येईल.. मैत्रिणीचे घर सजवताना तिला काय माहित होते कि काही दिवसांनी हे घर पुन्हा आपल्याला साद घालेल.. काय माहित होते कि रोज भेटणारा तिचा भाऊ, नव्याने तिला भेटेल.. तिच्या मनातली घालमेल न सांगताही त्या घराला समजेल.. तिच्या घरातले संस्कार लक्षात घेऊन रीतसर मागणी घालायला येतील हे तरी तिला तेव्हा कुठे माहित होते.. 
तिची निवड तितकीच चोख.. पण तरी तिच्या मनात धाकधूक.. या वाड्याच्या चार भिंतीत काय बोलणी होतील याची.. गाडीचा हॉर्न ऐकून ती लगबगीने बाहेर आली तेव्हा हातात घालायला काढलेल्या बांगड्या तिथेच राहिल्या तिच्या आरश्यासमोर.. त्याही वाट बघत आहेत.. बोलणी कशी होतील आणि कधी तिच्या हातात त्या मानाने "चुडा" बनून किणकिण करतील याची.. !!!


Thursday, November 14, 2019

शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!

"बालदिन होऊन गेला ना.. लिहिलं नाही का काही अजून?" असा प्रश्न समोरून आल्यावर मी विचारातच पडले थोडा वेळ.. सोप्पा तर विषय आहे म्हणून कागद पेन घेऊन बसले आणि खूप वेळ विचारातच हरवले.. काही शब्दात मांडायला जमेच ना.. चार चौघांसारखं बालपण.. त्यात वेगळं लिहिणार तरी काय आणि वाचणारे वाचणार तरी काय.. प्रेमाचं म्हणतात ना.. तुमचं आमचं same असतं तसंच बालपणाचं असतं बहुतेक.. तुमचं आमचं same.. त्या वेळी नेमकं काय आठवलं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
खरंतर या आठवणी काही अशा एका वेळी बसून काढायच्या आठवणी नाहीतच.. या आठवणींना काही format नाही, वेळ नाही, "day" नाही.. आयुष्याची पहिली १०-१५ वर्ष आपल्याला कधीही आणि कुठेही आठवत राहतात वर्षभर.. आपलं आयुष्य चालत राहत घड्याळाच्या काट्यासारखं वर्तमानात आणि त्याच्या खाली फिरणारा मन नावाचा लोलक सतत घुटमळत राहतो कधी बालपणात तर कधी भविष्याच्या विचारात..त्यावेळी नेमकं काय आठवत ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवतं एवढं खरं..!!
गार्गी ला तिच्या पहिल्या gathering साठी तयार करत होते मागच्या वर्षी.. वय वर्ष अडीच.. आणि एकदम मला एक फोटो आठवला.. माझ्या पहिल्या gathering मधला.. वय वर्ष साडेतीन.. पोपटी रंगाचा सुचेता ताई च्या लग्नात म्हणून शिवलेला फ्रॉक घातला होता मी तेव्हा.. डाव्या बाजूला श्रद्धा आणि उजव्या बाजूला रमा.. मध्ये मी.. तिघींनी फोटो मध्ये मोठ्ठा "आ" केलेला आणि आमच्या समोर माईक.. मला गाण्यासाठी "स्टेज" देण्याचं धाडस बहुतेक तेव्हा पहिल्यांदा आणि शेवटचेच केले असेल कोणी तरी.. खूप दिवसात श्रद्धा चा फोन नाही झाला असं म्हणत मी तयार झालेल्या गार्गीचे फोटो काढत होते.. त्यावेळी नेमकं काय आठवत होतं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
महालक्ष्म्यांसाठी सगळे चुलत सासू सासरे, दीर जावा आणि आमची मुलं एकत्र जमलो होतो.. चार हाका मारल्या मुलांना पण ते त्यांच्याच नादात.. डोकावून बघितलं तर घरातली सगळी उश्या पांघरुणे जिन्यात आणि त्यात घुसून ते घर घर खेळत होते.. सगळ्या माणसांमध्ये असूनही मी थोडा वेळासाठी मनाने नारायण पेठेतल्या वाड्यात पोचले.. तीन फूट बाय सहा फूट च्या एकाच कॉट वर सगळी आत्ते-चुलत भावंडं एका वेळी मावण्याचे दिवस होते ते.. त्यावेळी नेमकं काय आठवलं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!! 
शनिवारी पुण्याला गेले होते.. साधना मध्ये पुस्तक खरेदी साठी जायचं होत.. जाता जाता नवीन मराठी शाळा आणि पुढच्या चौकात अहिल्यादेवी लागल्यावर गाडी चा स्पीड आपोआप कमी झाला.. मित्र मैत्रिणी, शाळेतल्या बाई, पट्ट्यांची मारामारी, स्वच्छतेचा तास, वर्तनपत्रिका, ग्राउंड वर केलेली athlatics ची प्रॅक्टिस, ऑफ तासाला केलेला दंगा, गृहपाठ, १० बोटात घातलेल्या बॉब्या, रस्त्याच्या बाहेर बसणारे चिंचा, पेरू, पट्टीवर केलेले संत्र्याचे सूत आणि एक चुकार चॉकलेट.. नेमकं काय काय आठवत होतं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
नोकरी घर संसार सगळ्यात रमलेले मित्रमंडळ.. काही पुण्यात settle झाले.. काही बाहेर पडले.. रोजच्या सारखाच दिवस सुरु असतो पण अचानक कोणीतरी मैत्रीण foreign हुन काही दिवसासाठी आल्याचं निमित्त होत.. night out मारायची ठरते.. फोनाफोनी सुरु होते.. पहिला फोन झाल्यापासून ते night out होईपर्यंत आणि त्यानंतरचे बरेच दिवस.. नेमका काय काय विचार करत असतो आपण असं शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवतं एवढं खरं..!! बालपण देगा देवा.. मुंगी साखरेचा रवा.. !! म्हणजे नेमकं काय ते खरंच शब्दात नाही सांगता येत पण मन हरवतं एवढं खरं..!! 

Follow my momspresso blog for regular updates

Follow posts on FaceBook also -
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also -
https://avanigokhale.blogspot.com/


Wednesday, November 6, 2019

"ससा.."

"ससा.."
लेखिका - अवनी गोखले - टेकाळे
त्यांच्या घरात एक ससा आहे.. कापडाचा शिवलेला.. निळ्या रंगाचा.. त्या सश्या नी चार पिढ्या पहिल्या आहेत आत्ता पर्यंत.. तीन घरे पहिली.. आणि बरेच खण कोनाडे पाहिले.. पण त्याचा रंग कोणी विटू दिला नाही आज पर्यंत हे महत्त्वाचे..
आत्ता आत्ता पर्यंत त्या घरात एक लांब पांढरी दाढी वाले आजोबा फिरायचे.. त्यांना म्हणे पहिली बायको आणि छोटी मुलगी होती.. नाव काही माहीत नाही पण त्या मुलीचा होता तो ससा.. पुढे बायको आणि मुलगी मागे आठवणी ठेवून देवाघरी गेल्या आणि काही काळ गेल्यावर आजोबांचे लग्न झाले आजी सोबत.. भाऊबीज आली तसे त्या "सश्याचे मामा" आजी समोर येऊन बसले ओवाळ म्हणून.. नात्यांची वीण उकलावी तितकी घट्ट बसते.. नवऱ्याच्या पहिल्या बायको चा भाऊ ओवाळणी घेऊन बसलेला आणि ताम्हणातले निरांजन मंद तेवत होते.. समाधानाने.. त्यानंतर आजी हयात असेपर्यंत मामांची भाऊबीज आणि आजीची राखी चुकली नाही कधी.. आजीने वड सुधा पुजला नाही कधी वटपौर्णिमा असताना.. म्हणायची "तिनेही" काही वर्ष वड पुजला असेल ना.. देवाला कशाला कोड्यात पाडू पुढच्या जन्मी.. सगळी कर्तव्ये पार पाडून एक दान तिने राखून ठेवले कायम "तिच्यासाठी".. आजी नी तो ससा सांभाळून कोनाड्यात जपून ठेवला यातच सगळे काही आले..
नंतर घरे बदलली, furniture बदलले.. पिढी बदलली .. जुने सामान गेले नवीन सामान आले.. पण निळाशार ससा तसाच राहिला आहे अजून कोनाड्यात..

Tuesday, October 29, 2019

आजी आजोबा आणि ती.. साताजन्माची कहाणी

आजोबांची पहिली बायको आणि मुलगी डाव अर्ध्यात सोडून गेलेले.. त्यानंतर आजी आली घरात माप ओलांडून.. वटपौर्णिमेला आजीने सांगितले कि मी वड पुजणार नाही.. ५५ वर्षांपूर्वी तो चर्चेचा विषय झाला होता.. पण आजी नी सगळ्यांना समजून सांगितले.. 
"त्यांच्या आधीच्या बायकोनी पण काही वर्ष वड पुजलाच होता ना.. दोघींनी वड पुजून देवाला कशाला कोड्यात पाडायचं.. पुढच्या जन्मी तिला राहिलेला संसार पूर्ण करता यावा.. "
आजोबा निःशब्द.. आजीनी दर वर्षी वटपौर्णिमेला हाच भाव जपला मनात.. संसारामधली सगळी कर्तव्य पार पाडूनही एक दान आजीने राखून ठेवले "तिच्यासाठी".. 
माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही.. तरीही वाटते.. त्यांना पुनर्जन्म मिळावा आणि त्यांची साता जन्माची कहाणी सुफळ संपूर्ण व्हावी.. 


Friday, October 25, 2019

उद्याने

हो, नाही आवडत आम्हाला अजूनही प्रत्येक रविवार संध्याकाळ मॉल मध्ये घालवायला.. तिथला AC, तिथला food court, तिथले shopping, तिथले game zone यांना काही नावं नाही ठेवायची.. आम्हीही करतो कि हो तिथे shopping, बघतो कि तिथे movies, खातो तिथेही.. नाही असे नाही.. पण फक्त रविवारी संध्याकाळी करायचे काय सुचत नाही म्हणून मुलांना game zone मध्ये खेळायला न्यावे असे नाही वाटत.. given a choice अजूनही मुलांना खेळायला बागेत मोकळ्या हवेत न्यावे असे अजूनही वाटते.. जे बालपण आपण जगलो ते मुलांनी पण जगावं यासाठी अट्टाहास का आपल्याच बालपणात थोडं रमावं त्या निमित्तानी यासाठीची धडपड माहित नाही.. पण हो, अजूनही आमच्यामधला मध्यम वर्ग जिवंत आहे..
अशीच एक रविवार संध्याकाळ.. असेच एक गार्डन.. भरपूर मोठे.. मुलांना खेळायला खेळणी हि भरपूर.. आणि भरपूर मुलेही खेळणारी.. पण बऱ्याच खेळण्यांच्या तर्हा साधारण अशा होत्या.. घसरगुंडीच्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या.. झोपाळा मधोमध तुटलेला किंवा पकडायची दोरी तुटलेली.. spring लावलेले प्राणी spring खराब झाल्यामुळे मान टाकून बसलेले.. जंगल जिम चे बार मधेच वाकून मोडलेले.. बाकीचे वर्णन जर तुम्ही अशात कुठल्या आसपासच्या बागेत गेला असाल तर तुम्हीच मनाशी करून बघू शकता.. प्रचंड खेळणी असूनही खूप थोडी खेळणी मुलांना खेळायला योग्य होती.. आणि  मुले लहानच.. त्यामुळे खेळणी खराब आहेत हे त्यांना कुठे कळायला.. त्या तुटलेल्या गांजलेल्या खेळण्यांवर मुले तशीच जात होती आणि त्यांच्या मागे त्यांच्या पालकांचा जीव मुठीत.. घरी येईपर्यंत..
आणि मग घरी येताना मन चरकतच क्षणभर.. कि ज्या अट्टाहासाने बागेत घेऊन जातो ते नेमके योग्य आहे ना..
हे कोणालाही दुखावण्यासाठी लिहिलेले नाही.. याचे राजकारण तर नक्कीच होऊ नये.. पण तरीही कुठेतरी व्यक्त व्हावे असे वाटते.. आम्ही कोण? अजूनही मुलांनी मोकळ्या हवेत खेळावं असे वाटणारे पालक.. बाकी नावात काय आहे.. !!

Wednesday, October 23, 2019

स्वयंपाक घर आणि पूर्व तयारी

थोड्याफार फरकाने प्रत्येक घरात सकाळी हेच चित्र असते.. एका तासात आपल्याला सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचे डबे, मुलांचे आवरणे हे सगळे उरकायचे असते.. मग होते ती गडबड.. या धावपळीत आपल्याला एक मिनिट वाचले तरी हवे असते.. ही काही पूर्व तयारी आपण किराणा आणताना आणि आठवड्याच्या भाज्या आणताना जर केली तर कदाचित थोडा रोजचा वेळ वाचू शकतो..

किराणा आणल्यावर करून घेऊया ही तयारी..
गुळाची ढेप चिरून ठेवणे
रवा, दलिया, शेवया भाजून ठेवणे
दाणे भाजून ठेवणे
दाण्याचे कूट तयार ठेवणे
चिंच गूळ चटणी तयार fridge मध्ये ठेवणे. एक महिना टिकते. आंबट वरण, काही भाज्यात पटकन घालता येते. आयत्या वेळेला चिंच भिजवून कोळ करण्यापेक्षा बरे पडते .
२ ओले नारळ खवून air tight डब्यात deep fridge मध्ये ठेऊन देणे (एक महिना टिकतो)
धनेजिरे पूड करून ठेवणे
मिरे दालचिनी लवंग भाजून पूड करून ठेवणे
कोरडे खोबरे किसून ठेवणे
तीळ, कोरडे खोबरे, शेंगदाणे, खसखस, वाळलेला कढीपत्ता एकत्र मिक्सर ला फिरवून ठेवणे. पटकन रस्सा भाज्या मध्ये घालता येते.
वेलदोड्याची पूड करून ठेवणे
पिठीसाखर दळून ठेवणे
उपासाची भाजणी आणि साधी थालिपीठ भाजणी - करायला नाही झालं घरी तरी निदान पिठं तरी आणून ठेवूया
तयार श्रीखंड छोटे १-२ डबे आणून deep fridge मध्ये ठेवणे (एक महिना टिकतं) अचानक पाहुणे आल्यावर गोड म्हणून पुढे करता येते. मुलांना पटकन पोळी बरोबर देता येते एखाद वेळा
Weekend लाच भरून ठेऊ मिसळणाचा डबा, चहा साखर मिठाचा डबा आणि तेलाचे बुटले.

भाज्या आणल्यावर करूया ही तयारी
पालेभाज्या, कोथिंबीर निवडून कागदात गुंडाळून ठेवणे
Flower ची फुले काढून ठेवणे
गवार आणि तत्सम शेंगा मोडून ठेवणे
पावटे मटार आणि तत्सम शेंगा सोलून ठेवणे
लसूण सोलून ठेवणे
आलं लसूण paste बनवून ठेवणे
मिरच्यांची डेख काढून मध्यम आकाराचे तुकडे चिरून डब्यात भरून ठेवणे
कढीपत्ता पानं सुट्टी करून डब्यात भरून ठेवणे


भाज्या नसतील तेव्हा पटकन करता येतील असे हे काही प्रकार घरात ठेऊया
सांडगे
डांगर
कुळीथ पीठ
हरबर्याचा वाळलेला पाला
मिश्र डाळी

सकाळच्या धावपळीच्या एक तासा मधील एक मिनिट वाचवूया.. त्या एका मिनटात paper मध्ये headline वरती तरी नजर टाकुया.. अजून काही छोट्या idea comments मध्ये सांगा ज्या तुमचे माझे सगळ्यांचेच सकाळच्या गडबडीत एखाद मिनिट वाचवतील..

Thursday, October 17, 2019

Same Pinch!!!

बाप म्हणणारा सूरवात करतो ३०० रुपये महिना..
मुलगा म्हणणारा सूरवात करतो ३०००० रुपये महिना..
संसारात पडल्यावर दोघांचा जमाखर्च सारखाच असतो..
मुलगा बापाला चिमटा घेत same pinch म्हणतो..

तसे रोज संध्याकाळी ते सगळे पोळी भाजी वरण भातच खातात अजूनही..
सासू म्हणणारी एखाद्या रविवारी हट्ट करून उडपीची इडली आणि मंगला थिएटर ला dream girl बघायला जाऊ म्हणायची..
सून म्हणणारी आता एखाद्या रविवारी dominos pizza खाऊ आणि pvr ला dream girl बघायला जाऊ म्हणते..
दोन "dream girl" मध्ये फरक असला तरी सासू सुनेचे ड्रीम साधारण सारखेच असते..
सून सासूला चिमटा घेत same pinch म्हणते..

दुसऱ्या शहरात नोकरी लागते. घर घ्यायची वेळ येते..
मुलगा Home loan ची चौकशी करतो..
हप्ते बापाने ही फेडले.. हफ्ते मुलगा ही सुरू करतो..
सून म्हणणारी FD RD मोडते.. दागिने समोर ठेवते..
अजून एका छपराला त्यांचे आडनाव मिळते..
सासू म्हणणारी ३० वर्षांपूर्वीचे पिठाच्या डब्यात लपवलेले पैसे दागिने आठवते..
सासू सुनेला चिमटा घेत same pinch म्हणते..

बजाज स्कूटर साठी बाप म्हणणारा चार खेटे घालतो..
थोडे पैसे साठवतो.. थोडे कर्ज घेतो..
मुलाने wagonR साठी car loan ची चौकशी केल्यावर बाप तेच दिवस आठवतो..
बाप मुलाला चिमटा घेत same pinch म्हणतो..

नवरा म्हणणाऱ्याने चिंतामणी रंगाची कांजीवरम आणि नाग वाकी हेरून ठेवलेली असते बायको साठी.. कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
दुसऱ्या नवरा म्हणणाऱ्याने बदामी रंगाचा one piece आणि हिर्याचे पेंडेंट बघितलेले असते बायकोसाठी.. कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
पण या पाडव्याच्या ओवाळणीत मात्र तो बंद पाकीट च ठेवतो..
एक नवरा दुसऱ्या नवऱ्याला same pinch म्हणतो..

फार काही बदलले नाही.. तेव्हाही आणि आत्ताही..
अजूनही जमाखर्च मांडताना महिना अखेर येतेच..
तरीही अजूनही महिना अखेरीला kitchen भरलेले असतेच..
अजूनही कपाटात खाली लपवलेले पाकीट जड असतेच..
काटकसरीच्या मडक्यातून अजूनही बचत झिरपते..
अजूनही बापाला मुलाने गुणल्या नंतर उत्तर चौकोनी कुटुंब हेच येते..
एक पिढी दुसऱ्या पिढीला same pinch म्हणते..

-- अवनी गोखले - टेकाळे

Wednesday, October 16, 2019

काय या आजकालच्या मुली.. !!!

ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. एक दागिना नको अंगावर यांना.."
ती थोडीशी मिटते..
दसऱ्याच्या वेळचे तिचेच दागिन्यांनी मढलेले रूप आठवते..
नंतर दिवाळी मध्ये book केलेले स्वतःचे घरही आठवते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती पाहुणेरावळे करते.. स्वयंपाक बिवपाक करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
पाठ फिरता फिरता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. पसारा सुद्धा आवरता येत नाही यांना.."
ती थोडीशी मिटते..
उरलंसुरलं अन्न काढून फ्रिज मध्ये ठेवते.. आणि मागे वळून बघते..
पाहुणचार करून तृप्त घर तिच्याकडे प्रसन्न नजरेने बघत असते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती जॉबबिब करते.. काम करते.. काम करून घेते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..
केबिन च्या बाहेर पडता पडता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. घरचे कारण सांगून मस्त कल्टी मारता येते यांना.. "
ती परत थोडीशी मिटते..
डेस्कवरच डबा खाते.. पटकन काम संपवते..
लायनिंग च्या ड्रेस मध्ये गळणारे दूध सावरते..
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते..

ती बस ट्रेन पकडते किंवा गाडीला किक मारते.. धक्केबिक्के पचवते..
रस्त्यानी जाता जाता असेच कोणी बोलून जाते..
"काय या आजकालच्या मुली.. नोकरी चे कारण सांगून मस्त फिरता येते यांना.."
ती परत थोडीशी मिटते..
घरी जाऊन फ्रेशबिश होते.. पोरीला दूध पाजते..
हातात आलेला आयता वाफाळता चहा बघून सुखावते.. !!
ती परत थोडीशी उमलते.. हसते आणि पुढे जाते.. !!!

Tuesday, October 15, 2019

Best Friend Forever..!!

बाबी आणि सुधी.. (वय वर्ष ७५+)
संध्याकाळी अचानक फोन खणाणतो.. सुधी मावशी गेली.. आजी आधीच आजारी म्हणून तिला झालेली गोष्ट न कळू देता आई बाबा  वैकुंठावर.. ते बाहेर पडल्यावर आजी म्हणते..तुम्ही जेऊन घ्या अरे.. त्यांना यायला आता रात्रच होईल.. सुधी गेली म्हणून बाहेर पडले ना ते..
अग पण आजी तुला कसं कळलं? तुला तर कोणी काही सांगितलं पण नाही..
बालमैत्रीण होती ना रे माझी.. मग मला सांगायला कशाला पाहिजे.. आतून कळतं!! म्हणजे कसं, काय ते कळायला अजून लहान आहात तुम्ही खूप.. !!
आणि मग काय.. जुन्या आठवणीत पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!

मी आणि नेहा.. (वय वर्ष ३०+)
एक निसर्ग वर्णन करणारी कविता वाचून नेहा चा फोन..
नेहा - काय ग, काय झालंय? any problem? तुझी कविता वाचली..
मी - मला काय धाड भरणारे.. मस्त मजेत.. आवडली का कविता? खूप like आलेत त्याला..
नेहा - like करणारे फक्त कविता वाचतात आणि मला त्याच्या मागच्या तुला पण वाचता येत एवढाच काय तो फरक.. बोला आता, काय झालंय..
आणि मग काय ..पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!

तात्या आणि नानी.. (वय वर्ष ९०+)
तात्या आणि नानी म्हणजे खरंतर दीर आणि जाऊ.. पण संसाराच्या उतार चढावांचे त्याच्या पिढीतले आता हेच दोघे साक्षीदार राहिलेले.. आताच्या पिढीला त्यांच्या बोलण्यातले अर्धे संदर्भ कळत नाहीत.. सणावाराच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र आले कि हे दोघे तासंतास हातात हात घेऊन बसतात.. जुन्या  आठवणींना उजाळा देत.. आणि मग काय.. पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि शेवटी आभाळभर हसणं..!!

वश्या आणि राजा.. (वय वर्ष ५५+)
निवांत रविवार दुपार.. सगळे घरातले पाय पसरून दिल चाहता है पाहत होते.. picture संपल्यावर बाबा अचानक उठले आणि कपडे बदलायला गेले.. शर्ट चे बटण लावता लावता पायात चप्पल सरकवली देखील.. अहो, आत्ता कुठे अचानक?
आलोच राजेंद्र कडे जाऊन.. म्हणत गाडीला किक मारून निघाले देखील..
आणि मग काय पोटभर बोलणं आणि आभाळभर हसणं..!!

शकू आणि शोभा (वय वर्ष ६०+)
सासूबाईंची माजलगावची बालमैत्रीण खूप वर्षांनी contact झाला.. आणि कुठे आहे काय करत करत लक्षात आले कि ते पण आता नवी मुंबईत रहातात.. मग काय mobile नंबर दिले घेतले.. आणि एक दिवस त्या मावशींचा फोन.. या श्रावणी शुक्रवारी ये ग सवाष्ण म्हणून.. नातवंड शाळेत जातात, मुलं कामावर.. मग आपण दोघीच घरात.. सणाचं निमित्त आणि आपल्या निवांत गप्पा होतील साठलेल्या.. आणि मग काय.. नव्या जुन्या गप्पांमध्ये पोटभर रडणं, मनभर बोलणं आणि आभाळभर हसणं.. !!

गार्गी आणि काव्या.. (वय वर्ष ३)
गार्गी - मला बाऊ झालाय ना तर आज teacher नी सांगितलं class मध्ये.. don't touch her.. पण मी काव्या ला हात लावू दिSSलाSS.. ती माझी best friend आहे ना म्हणून.. तिनी हळूच हात लावला.. आणि मला दुखलं पण नाही..
खरंय आपल्या हळव्या जागेवर हात लावायचा हक्क फक्त best friend चाच.. चला, म्हणजे हे best friend प्रकरण पोचलंच तर पुढच्या पिढीपर्यंत..

कोण म्हणत लग्नानंतर मित्र वगैरे काही रहात नाहीत.. हे best friends नंतर कुटुंबाचाच एक भाग होतात आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग.. ते फॅमिली फ्रेंड्स का काय म्हणतात तसे.. आणि भरभरून वाढत रहात आपलं कुटुंब.. वय बदलत जाईल त्याप्रमाणे भेटायची निमित्त बदलत जातात.. बोलायचे विषयही.. पण ओढ मात्र तीच..

काय मग वाचताना मनात आठवण आली ना कोणाची तरी.. तोच हो, तुमचा best friend forever..  मग जास्त वाट नका बघू.. भेटाच लगेच.. आणि शक्य तेवढं whats-app आणि fb वर नाही तर प्रत्यक्ष भेटून एक मिठी माराच.. बघा जमतंय का.. सांगा comments मध्ये तुमच्या BFF बद्दल..


Friday, October 11, 2019

संधिप्रकाश .. corporate च्या अंगणातला..

meeting संपल्यावर सहज खिडकीतून पाहिलं निघायच्या आधी.. काही पाऊस वगैरे नाही ना.. तर मस्त संधिप्रकाश पडलेला.. एकदम प्रफुल्लित, टवटवीत वाटलं.. खाली उतरून स्टेशन च्या दिशेनी जाताना campus नव्याने भेटला.. 
वातावरण सोनसरी पिवळसर.. सोनसरी रंग म्हणजे कसा तर pure च्या पाटल्यांसारखा one gram च्या गोठासारखा नाही.. सूर्याने लगबगीने जाता जाता color pallete ला दिलेला धक्का आणि  निळ्या सावळ्या कॅनव्हास वर अस्ताव्यस्त विखुरलेले रंग.. एकमेकात मिसळूनही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून असलेले.. गोलाकार buildings च्या मधोमध हिरवेगार landscape आणि त्यात फ़वारलेले तुषार सिंचन.. त्याच्या कडेनी प्रदूषण कमी करण्यासाठी लावलेले snake plant.. building नंबर ४ आणि ५ च्या मध्ये असलेले रातराणीचे झाड आभाळभर घमघमत होतं.. तिथून जाताना नकळत रेंगाळणारी काही पावलं बघून वाटलं आहे आहे.. मगाशी पडलेल्या पावसाचा ओलावा रुजला आहे थोडासा अजून इथल्याही मातीमध्ये.. बिल्डिंग ११ च्या बाहेर असलेल्या वडाच्या पारंब्या मातीत रुजलेल्या.. त्या सांगून गेल्या कि, तुम्ही यायच्या काही वर्षांपूर्वी अशी दिसत होती ही वास्तू, जंगलासारखी.. जाता जाता मस्त एखादा cutting चहा मारावा असा विचार करत बाहेर पडले campus च्या..
टपरी वरचे दृश्य बघून मात्र चहा प्यायची तीव्र इच्छा विरून गेली.. हवेत विरत चाललेल्या संधिप्रकाशासारखी.. काचेच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्याच्या बाहेरच्या चहा आणि पानटपऱ्या.. सिगारेट च्या वलयामागे हरवलेले formal shoes आणि high heels.. तुमच्या माझ्या वयाचेच.. धुरातून छेदत हा संधिप्रकाश पोचला असेल का यांच्या पर्यंत.. मागे वळून आपल्याच बिल्डिंग कडे बघताना जाणवलं.. हो, ही काचेची बिल्डिंग आहे..!!
संधिप्रकाश अनुभवणं क्षणिक.. दिवस मावळताना मिळालेले बोनस क्षण.. म्हणजे inning संपली वाटताना शेवटचा बॉल "no ball" पडावा.. त्यावर sixer जावी आणि परत हातचा एक बॉल मिळावा तसं काहीसं..  शेवटी निसर्ग काय सगळ्यांना सारखंच देत असतो.. तो क्षण टिपता आला तर आपला नाहीतर नंतर आहेच मिटत जाणारा दिवस..  
ट्रेन मध्ये हेच सगळे विचार करत होते.. एकीकडे लिहून काढत होते.. पण काही प्रश्नांची उत्तरं तशीच अपूर्ण अजूनही.. आणि उतरले तोपर्यंत आकाश काळेभोर.. black board वर duster मारून साफ करावे तसे.. स्टेशन च्या बाहेर पडताना एक काकू आकाशात पाहून म्हणाल्या आज चंद्र फार छान दिसतोय ना.. मन प्रसन्न झालं.. आपल्या भोवतीचे खळे तो फार दिमाखात मिरवत होता.. सगळे प्रश्न पुसत निर्व्याज पांढऱ्याशुभ्र प्रकाशातून द्वादशीचा चंद्र हसला थोडासा..

या आधी तुम्ही कधी रेंगाळला होतात निवांत संधी प्रकाशामध्ये.. comments मध्ये नक्की सांगा.. मॉल मधल्यासारखा "गारठा" नाही मिळाला तरी थोडासा "गारवा" नक्की मिळेल.. बघा जमतंय का… !!!

Follow posts on FaceBook also for regular updates -
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also for regular updates -
https://avanigokhale.blogspot.com/

Friday, October 4, 2019

माझ्या घरातील कृष्ण..

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कृष्ण भेटत राहतो.. प्रत्येक वेळा भेटणारा कृष्ण वेगळा .. त्याला सामोरे जाणारे आपले रूपही वेगळे . कधी आपण यशोदा असतो, कधी राधा, कधी रुक्मिणी, कधी मीरा, कधी द्रौपदी.. एवढंच काय कधी आपण अर्जुन असतो, कधी राधेय, कधी उद्धव तर कधी स्वतः कृष्ण ही.. काहींना कृष्ण देव्हाऱ्यात रंगनाथ म्हणून दिसतो तर काहींना तो चालत्या बोलत्या माणसात.. पण भेटतो मात्र नक्की.. 
आपण लहान असतो.. शाळकरी मित्र जमवून हैदोस घालणारे.. त्यात आपल्या group चा leader आपला कृष्ण असतो आणि आपण आपले पेंद्या.. पण तो कृष्ण आपल्याला सामावून घेतो.. आपल्यामधल्या माणसाला हळूहळू प्रगभ करतो..  आता आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेज मध्ये येतो.. आपले विश्व बदलत जाते तसे मैत्रीच्या व्याख्याही.. पण त्या मित्रांच्या ग्रुप मध्ये पण काही मुलं खूप जबाबदार असतात.. घरच्यांचा पण त्यांच्यावर नितांत विश्वास असतो.. की ते आहेत ना सोबत मग जा बिनधास्त.. ही मुलं आपले मित्र तर असतातच.. पण त्याच बरोबर आपली काळजी सुध्धा घेतात..गैरफायदा तर सोडाच पण प्रसंगी टवाळ मुलांपासून आपल्याला जपतात सुध्धा.. अशा वेळी ते आपला कृष्ण असतात आणि अापण द्रौपदी.. 
आणि मग हळूहळू पंखात बळ येऊन पंख झेप घ्यायला बघतात.. आयुष्याला एक स्थैर्य यावं वाटत.. आपल्याला वाटायला लागत की आपणही कोणाची तरी राधा व्हावं, रुक्मिणी व्हावं.. आपल्या आयुष्यात त्या वेळेला आपला नवरा भेटतो कृष्ण म्हणून.. आपल सुखदुःख वाटून घेणारा हक्काचा सखा, सोबती.. 
आणि मग या रुक्मिणी ची नकळत यशोदा होऊन जाते.. आणि ताक घुसळत असताना तिचा कृष्ण/राधा लोण्याचा गोळा कधी येऊन फस्त करतात तिलाही कळत नाही.. त्या बाललीला बघण्यात ती गुंगून जाते.. कधी ती प्रेमळ तक्रारी करते तर कधी कौतुक सांगते.. पण ती सतत बोलते मात्र आपल्या लेकराबद्दलच.. 
घरचे सांभाळत उंबरठा ओलांडून ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो आपण आणि सामना होतो तो corporate politics शी.. अशा वेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा, कणखर व्हायला शिकवणारा एखादा senior भेटतो.. तेव्हा तो कृष्ण असतो आणि आपण सारे अर्जुन..
मोठा भाऊ कामानिमित्त परदेशी.. घरच्यांच्या मनात काळजी, विरह, अभिमान, कौतुक सगळेच मिश्र भाव.. तो जाणार म्हणून उदास घराला सावरायची वेळ येते ती धाकट्या भावंडांवर.. अशा वेळी धाकटे भावंड उद्धव तर मोठा भाऊ कृष्ण..
कधीकधी आपणच खंबीर राहून सगळी सूत्रे हाती घ्यावी लागतात.. घराचा आधारस्तम्भ होऊन उभ राहायला लागतं.. अशा वेळी रथाची दोरी आपल्या हातात असते.. आणि या विशाल महाभारताचे तेव्हा आपणच असतो कृष्ण!!!


Tuesday, October 1, 2019

रियाझ, चंद्रघंटा आणि ती..

काल तिनी एका प्रसिद्ध कवी च्या मुलाखतीमध्ये ऐकले होते की गायक किंवा चित्रकार जसा रियाझ करतो तसे लेखकाने देखील रियाझ केला पाहिजे.. तेव्हा पासून तिच्या मनात ते वाक्य फिरत होते.. ती सारखा विचार करत होती कि आपण पण रोज रियाझ करायचा.. म्हणजे नेमके आपण काय काय करू शकतो.. तिनी ठरवलं रोज काहीतरी लिहिले पाहिजे.. काहीतरी वाचले पाहिजे.. रोजच्या धावपळीमध्ये थोडा वेळ स्वतःला दिला पाहिजे.. 
तिनी खास लवकर चा गजर लावला होता.. सकाळी जरा walk ला जाऊ उठून.. मग थोडा सूर्योदय वगैरे बघता बघता काहीतरी सुचेल कदाचित.. पण कसलं काय.. उठली आणि लक्षात आलं की आज कुसूम ची सुट्टी आहे.. (कुसूम म्हणजे तिची कामवाली.. मुलाला बरं नाही कळल्यावर हिनीच तर सांगितलं होतं तिला कि येऊ नको दोन दिवस कामावर.. आणि वर पैसे पण दिले होते दवाखान्यात जायला.. ) मग कसलं walk आणि काय.. ती उठली तेच kitchen मध्ये गेली.. गॅस वर एका बाजूला पोहे, मध्ये साबुदाणा खिचडी(हो घरात काही जणांचे नवरात्रीचे उपास होते ना..) आणि तिसऱ्या शेगडी वर भाजी शिजायला ठेवली आणि तिनी भांडी घासायला घेतली.. सगळ्यांचे नाश्ते, डबे तयार केले.. मुलांना तयार करून शाळेत सोडले आणि ती बसली ५ मिनिट निवांत.. नाश्ता आणि चहा घ्यायला.. पटकन पेपरमधल्या headline वर नजर टाकली.. आज नवरात्रीची तिसरी माळ.. देवाची थोडक्यात पूजा करून मग ऑफिस साठी आवरायला गेली ती.. 
मध्यम उंची, सावळा वर्ण, गडबडीमुळे जाड व्हायला वेळच मिळाला नाही म्हणून राहिलेला सडपातळ बांधा, केसांचा step cut, लाल plain सिल्क ची साडी आणि त्याला golden मोठे काठ आणि गोल्डन पदर.. नाजुकशी लाल टिकली.. कानात गळ्यात माणकांचा सेट आणि त्याखाली आलेले नाजूक मंगळसूत्र.. हातात मोती, माणिक असलेले नाजूक गोठ.. आणि हलकासा make-up.. म्हणलं तर traditional आणि म्हणलं तर professional.. क्षणभर ती थबकून स्वतःकडे बघत राहिली.. केसातल्या क्लिप मध्ये लावलेला गजरा आपल्या ऑफिस च्या काचेच्या बिल्डिंग मध्ये "जरा जास्तच होतंय का" हा विचार करत तिनी परत काढून पाण्यात घालून ठेवला आणि गळ्यात ऑफिस चे I-card लटकावून, खांद्याला लॅपटॉप बॅग टांगून निघाली ती.. एकीकडे विचार चालूच होते.. आज काहीही झालं तरी काहीतरी वाचायचं आणि काहीतरी लिहायचं.. रियाझ चुकला नाही पाहिजे.. मग पटकन एक कवितांचे पुस्तक टाकलेच तिनी बॅग मध्ये निघता निघता.. ट्रेन मध्ये पळत जाऊन window seat पकडू.. निवांत थोडे वाचले काही म्हणजे सुचेल काहीतरी लिहायला..
ट्रेन पळत पकडली खरी पण आज नेमके बसायचे सुख नव्हते.. एका हातात बॅग सावरत दुसऱ्या हातात छत्री(कोणी सांगावा पावसाचा भरवसा, ठेवावी निदान दसऱ्या पर्यंत सोबत म्हणून निघता निघता हातात घेतलेली) त्यामुळे वाचायचे राहून गेले.. शेवटी ट्रेन मधल्या बायकांबरोबर साडया, नवरात्र आणि recipe अशा विषयांवर गप्पा मारण्यात गुंग झाली ती.. 
ऑफिस मध्ये तर कसलाच विचार करायला वेळ नाही मिळाला तिला.. त्याच दिवशी प्रोजेक्ट deploy असल्यामुळे तिथे वेगळीच धूम.. बॉस च्या अंगात तर बाजीप्रभू संचारला होता.. गडावर तोफेचे बार ऐकू येईपर्यंत सगळे झुंज देत होते.. शेवटी एकदाचा code deploy झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.. मग success celebration म्हणून आणलेला pizza खाणे, फोटो काढणे सगळे सोपस्कार करून निघेपर्यंत अंधार पडला होता..
परत एकदा धावत पळत ट्रेन पकडली.. सगळ्या बायकांच्या मध्ये चेंगरून उभे असताना कमरेतून तळपायापर्यंत एक सणक गेली एकदम.. एकदम ताकद गेल्यासारखे झाले.. पायात गोळे आले.. तिनी तारीख आठवली परत एकदा आणि स्तब्ध झाली ती जागेवरच.. आता फक्त फार उशीर व्हायच्या आत घरापर्यंत पोहोचाव म्हणजे झाले..घरी पोचली तर तिचा चेहरा बघूनच नवऱ्यानी सरबत आणून दिले हातात.. त्यातच केवढी उभारी मिळाली तिला.. सगळे घर जेवण करून झोपाळले आणि मग तिनी डोळे मिटले..
हे रियाझ वगैरे काही आपल्याला झेपण्यातले काम नाही.. इथे श्वास घ्यायला उसंत मिळेना.. आणि त्यात कसले काय रोज लिहायला वेळ मिळणारे.. आणि सुचले तर पाहिजे काही.. आंबलेले अंग करंजी च्या आकारात गुंडाळून डोळे मिटून पडली ती.. आणि तिच्या डोळ्यासमोर लक्खकन दिसली.. लाल साडी नेसलेली, लाल भडक कुंकवाचा मळवट भरलेली चंद्रघंटा.. चेहरा थोडा ओळखीचा वाटला तिला.. सकाळी आरशात निरखून पाहिलेला चेहरा थोडासा असाच होता असं उगीचच वाटून गेलं तिला.. आणि काहीश्या उत्साहात तिनी आपले डायरी आणि पेन काढले.. एकटाकी लेख लिहून पूर्ण केला तिने.. तिच्या नकळत तिचा रियाझ चालूच तर होता दिवसभर.. सकाळी पाण्यात काढून ठेवलेला गजरा अजूनही तिच्याकडे बघून हसत होता.. 

Wednesday, September 25, 2019

हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या ..

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. 

कोकणातले वरच्या आळीमधले ते ऐसपैस घर.. माणसांच्या मनासारखेच मोकळे ढाकळे ..  square foot च्या चौकटी नसलेले..  ओसरी पडवी ओलांडून गेल्यावर कौलारू घर.. मागे परसदार आणि परसातून मागे नजर पोचेल तिथपर्यंत वाडी.. वाडी मध्ये उंचीची स्पर्धा करणारी नारळी पोफळीची झाडं.. त्यामागे आमराई.. त्यात असणारी विहीर आणि तिला लावलेले रहाट गाडगे.. आणि वाडीतून मागे जाणारी पायवाट थेट समुद्रकाठी पोचणारी.. समुद्राची गाज माडाच्या सावलीत निवांत बसल्यावर पण यायची.. आणि नजर उचलल्यावर दिसायचे प्रदूषणाची झालर नसलेले निळेशार आकाश.. 
या निसर्गाच्या कुशीत असणारी माणसं तिथल्या मातीतल्या फणसासारखीच.. तिरकस काटेरी बोलणे पण मनातून गोडवा.. सहज म्हणून २०-२५ माणसं तरी असायचीच घरामध्ये.. त्यावेळी काही त्याला joint-family वगैरे म्हणायची पद्धत नव्हती.. परत माधुकरी साठी वारावर जेवायला येणारे वेगळेच.. आई वडील, त्यांची मुलं, आणि पुढच्या पिढीतले मुलं, सुना आणि नातवंड.. एखादी आलवणामधली आत्या आणि तिची मुलं.. मुली आपापल्या संसारात.. 
बयो हि या घरातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती.. वयाने, मानाने, अधिकाराने आणि कर्तव्याने थोर.. त्यांचं मूळ नाव सुलक्षणा.. त्यांचा उत्साह लहान पोराला लाजवेल असा…आणि त्यात आता तर काय.. गौरी गणपती चा सण म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण.. गणपती तर रुबाबात बसलाच होता.. आणि गौराई यायचीच वाट बघत होता.. 
तो दिवस गौरी आवाहनाचा.. तिन्ही सांजेला समुद्राकाठी जाऊन खडे आणायचे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची .. घरात एकीकडे नैवेद्याची तयारी चालू होती.. एकीकडे सजावट चालू होती.. बयो अष्टभुजा असल्यासारखी सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होती.. आणि सगळे मार्गी लागल्यावर तिने स्वतःचे आवरायला वेळ काढला.. 
आधीच दागिन्यांची भारी आवड आणि त्यात आज तर गौरी आवाहन करायचा मान त्यांना मिळाला होता.. त्यामुळे अजूनच दुधात साखर.. ठेंगण्या आणि काटक बयो निळीशार नऊवार नेसल्या होत्या.. गोऱ्यापान रंगावर अस्मानी रंग अजूनच खुलून दिसत होता..  नाकात मोठी नथ अर्धे ओठ झाकले जातील एवढी.. लांबसडक केसांचा खोपा घातलेला.. खोप्याच्या मध्यभागात अग्रफूल आणि भरपूर गजरे.. कानात डुलणारी कर्णफूले.. गळ्यात चिंचपेटी, त्याच्या खाली रुळणारा मोत्यांचा लफ्फा, त्याच्या खाली येणारा रायआवळे हार तर त्यांचा खास आवडीचा.. आणि या सगळ्यापेक्षा उठून दिसणारे ठसठशीत डोरले.. दंडात नागवाकी.. कंबरपट्टा आणि मेखला कंबरेवर शोभून दिसत होता.. कष्ट करून मजबूत झालेल्या हातांची शोभा वाढवायला गोठ, तोडे, पाटल्या, बांगड्या, बिल्वर होतेच तर पैंजण, जोडवीं, वीरवली पायाची शोभा वाढवत होते.. नखशिखांत सजलेल्या बयो साक्षात गौरी सारख्या दिसत होत्या.. 
तिन्ही सांजेची वेळ आणि बयो गौरी आवाहनासाठी निघाल्या.. त्यांच्या सोबत त्यांच्या, सासूबाई, जावा, सुना ही निघाल्या.. या वेळी गौरी हळदी कुंकवाच्या पावलांनी येणार का सोन्या चांदीच्या पावलांनी.. याचा विचार चालू होता सगळ्यांच्या मनात.. उखाणे आठवून ठेवा बयो.. घरात जाताना घ्यायला लागेल उखाणा.. वाडीच्या मागच्या पाऊलवाटेने सगळ्या निघाल्या होत्या..  
इतक्यात बायोला  वेगळीच शंका आली.. मगासपासून येत असलेला वास हा जनावराचा असावा असे त्यांना वाटले.. कानांनी देखील चाहूल घेतली पण तेवढ्यात उशीर झालेला होता.. दबा धरून बसलेले जनावर अचानक समोर आले..  आणि बयोच्या किंकाळीने सगळा गाव थरारला.. 
त्या दिवसानंतर बयो आणि गौरी घरासाठी एक आठवण बनून राहिल्या.. घराने परत गौरी आवाहन केले नाही.. कधीतरी घरावर मोठे संकट येते.. प्रयत्नांची शर्थ करूनही मार्ग सापडत नाही.. आणि अचानक फासे पलटतात आणि संकट टळते.. सगळे सुरळीत होते.. तेव्हा आजी आभाळाकडे पाहून हात जोडत म्हणते बयोच आहे बघ आपल्या घराच्या पाठीशी.. घराची आणि आपल्या सगळ्यांची काळजी अजूनही घेत राहते ती.. 



Thursday, September 19, 2019

मी नेहमी आनंदात असते कारण...

मी नेहमी आनंदात असते कारण मी रोज लोकल ट्रेननी प्रवास करते..आधी खूप चिडचिड व्हायची, दगदग वाटायची.. आता मी त्यातच आनंद शोधला आहे.. लोकरीचे गुंडे, आवडीचे पुस्तक हे आता नेहमी असते बॅग मध्ये.. mobile मध्ये ठेहराव असलेली गाणी असतात.. यापलीकडे मग  कधी हलका make-up करावासा वाटतो तर कधी नुसत्या बाकीच्या बायकांबरोबर गप्पा माराव्या वाटतात.. कधी एखादा विषय डोक्यात फिरत असतो लेख लिहिण्यासाठी तर कधी मटार निवडायचे असतात.. कधी ट्रेन मध्ये खरेदी तर कधी सोनचाफा दरवळत असतो.. कधी डोळे बंद करून नुसतं रडावसं वाटत तर कधी  राहिलेली झोप पूर्ण करायची असते.... सगळे छंद पूर्ण करायचं हे ठिकाण..  माझा हक्काचा वेळ.. ही ७० मिनिटं.. 

उध्दवा.. शांतवन कर जा.. !!

मध्वमुनीश्वरांची ही कविता वाचताना घडलेला प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.. श्रीकुर्ष्णाच्या वियोगाने धैर्य खचलेले गोकुळ वासी, गोकुळात जीव गुंतलेला असताना अपरिहार्य कारणाने तेथून निघालेला कृष्ण आणि गोकुळवासी जनांची समजूत घालायला निघालेला उद्धव..
खरेतर हे आपल्या आसपास कायम घडत असणारे प्रसंग आहेत.. आपल्या रोजच्या जगण्यात खूप वेळा आपल्या प्रिय व्यक्तींचा विरह सहन करायची वेळ येते.. आणि तो सहन करण्याची ताकद आपल्या मध्ये येते ती आपल्याला वेळोवेळी भेटणाऱ्या उद्धवांमुळे.. पण होते असे कि आपण तो विरह सहन करून खूप पुढे जातो पण या उद्धवाची आठवण काढणे कधीतरी राहून जाते..
तो आणि ती.. एक अतिशय खंबीर आणि कणखर जोडपे.. त्याचे पोस्टिंग काश्मीर बॉर्डर वरती झाले.. सीमा भागामध्ये घर परिवार नेणे सुरक्षित राहणार नाही म्हणून ती काही दिवस मुलाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहिली.. एक नाजूक मनस्थिती.. सतत वाटणारी नवर्याबद्दल काळजी, त्यातून आलेले हळवेपण, जीवाची होणारी तगमग आणि त्यातून झालेली चिडचिड सुद्धा.. पण तिच्या घरच्यांनी तिला खूप समजून घेतले.. तिच्यामधल्या कलागुणांना वाव दिला.. तिचे मन कसे चांगल्या गोष्टींमध्ये रमेल हे पहिले.. तिच्या भावाने तर घरी सगळ्यांना सांगितले होते कि आपल्यासाठी तिच्या मनाला उभारी देणे हीच देशसेवा.. पुढे दोन वर्षांनी त्यांची पोस्टिंग परत दुसऱ्या शहरात झाली जिथे पूर्ण फॅमिली घेऊन राहणे शक्य होते.. कधी बोलून दाखवले जाते तर कधी मनातच राहते.. पण त्या दिवसांची आठवण सगळ्यांनाच येते हे नक्की.. ते एक देशसेवेला वाहून घेतलेले जोडपे बाकी नावात काय आहे..
तो आणि ती.. सख्खे बहीण भाऊ.. भाऊ multinational company मध्ये.. carrier साठी भावाचे परदेशात जायचे ठरले.. आणि आई वडिलांसाठी खंबीर उभी राहिली ती.. मुलाच्या प्रगतीचे कौतुक आई वडिलांना होतेच पण मुलगा, सून, नातवंडे सगळ्यांचा विरह सहन करणे सोपेही नव्हते.. त्यात वयामुळे तब्बेतीच्या कुरबुरी चालूच असायच्या.. पण ती शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहायला होती.. त्यामुळे तिचा आधार होताच.. सासरच्या माणसांना जीव लावताना तिचे एक काळीज शेजारी आई वडिलांच्या भोवती पण घुटमळत असायचे.. भावाच्या मनात तिचे स्थान तितकेच भक्कम जितके आई वडिलांच्या मनात.. पण आपल्याच माणसाला बोलून काय दाखवायचे म्हणून कोणी व्यक्त केले नाही एवढाच काय तो फरक..
तो आणि ती.. आई आणि मुलगा.. मुलाच्या नकळत्या वयात अचानक वडील देवाघरी गेले त्याचे.. नेमके कोणी कोणाचे सांत्वन करायचे  हा प्रश्न सतत भेडसावायचा त्यांना.. हा विरह तर आयुष्यभराचा.. खचले तर दोघं होते आणि धीर तर दोघांना द्यायचा होता.. आई आणि वडिलांचा प्रेम विवाह.. त्यामुळे सगळे नातेवाईक दुरावलेले.. शेवटी ते दोघंच उभे राहिले एकमेकांच्या पाठीशी.. आणि घर बाहेर काढले त्यांनी दोघांनी मिळून.. दोघे उद्धव एकमेकांचे जन्मभरासाठी..
आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीचा विरह सहन करावा लागतो.. कधी तो क्षणिक असतो.. कधी तो काही वर्षांसाठी असतो.. तर कधी आयुष्यभरासाठी.. या प्रत्येक प्रसंगात आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी असे उद्धव भेटत असतात.. त्यांच्या परीने सांत्वन करत असतात.. यथावकाश आपण त्या परिस्थिती मधून बाहेरही येतो.. पण कृतज्ञता कधी व्यक्त केली जाते तर कधी करायची राहून जाते.. पण मनात प्रत्येकाच्या राहते हे तेवढेच खरे..

Wednesday, August 21, 2019

पौष्टिक आणि पारंपरिक noodles

उन्हाळा आला कि सगळ्या बायकांना आठवण होते ती वाळवणाची.. आता ते घरी केले कि विकतचे या ऐतिहासिक वादात नको जाऊया आपण सध्या.. ते परत कधीतरी.. पण काही का असेना या गोष्टींनी प्रत्येक घर भरत हे मात्र नक्की.. ज्वारी, तांदूळ, पोहे, उडीद असे वेगवेगळे पापड, ताकातल्या मिरच्या, खाराच्या मिरच्या, बाजरीच्या खारवड्या, तांदुळाच्या चिकवड्या, वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे.. उपासाच्या चकल्या, पापड वेगळेच.. घरी केले पापड तर मग लाट्या/डांगर खाणे हा एक वेगळा आनंद.. या सगळ्या वाळवणांची राणी म्हणजे कुरडई.. एकतर तिला नैवेद्याच्या पानात पण जागा असल्यानी तिचा मान सगळ्यात जास्त.. सगळ्यात किचकट पण चवही तितकीच अप्रतिम.. कुरडया बनवताना गरम गरम चीक खाणे हा लहानपणचा आवडता उद्योग.. असले किचकट पदार्थ बघून सगळ्यात मोठा प्रश्न पडतो ते म्हणजे कोणी शोधून काढले असेल?.. ते गहू आधी सडायला ठेवा.. मग त्याचा चीक करा ..त्याच्या कुरडया करा.. वाळत घाला.. 
असो.. तर आता प्रश्न हा पडला असेल कि या title चा आणि या वर्णनाचा काय संबंध.. नमनाला घडाभर तेल ओतून झाले कि मग  येतेच आहे तिकडे.. ही प्रस्तावना फक्त थोडेसं तोंडाला पाणी सुटावं यासाठी.. 
तर या कुरडया करून झाल्या कि मग आजी, आई, काकू त्यातल्या छान गोल कुरडया वेगळ्या काढून पत्र्याच्या डब्यात भरून झाकणाला आतून कागद लावून पॅकबंद करून ठेवायच्या.. आणि खाली उरायचा तो चुरा.. तो एका वेगळ्या डब्यात भरून ठेवायचा.. कुरडयाची भाजी(उपमा) करण्यासाठी.. हा चुराच आहे आपल्या आजच्या कथेचा नायक.. इतका खटाटोप करायला वेळ होत नाही आता तर बाजारात खास कुरडयाचा चुरा विकत मिळतो.. महिन्याला जशी आपण नूडल्स ची पाकिटं घरी आणतो तसा हा चुरा वर्षातून एकदा आणून ठेवू शकतो.. पोटात जाऊन संपतोच लवकर पण नाहीच संपला तरी वर्षभर टिकतो हा चुरा.. (माझ्या आत्तेसासूबाईंच्या घराजवळ घरगुती शेवया करून मिळतात.. थोड्या जाडसर असल्यानी उपमा चांगला होतो त्याचा.. त्या माझ्या साठी शेवया घेऊन ठेवतात.. आणि मी त्यांच्यासाठी कुरडयाचा चुरा घेऊन ठेवते.. आम्ही असं साटंलोटं करून दोन नाश्त्याच्या पदार्थांची वर्षाची सोय करून ठेवली आहे.. )
या पदार्थाला कुरडई ची भाजी असं जरी म्हणत असले तरी हा नाश्त्याला खायचा पदार्थ आहे.. पाणी उकळले कि त्यात थोडेसे मीठ आणि तेल(कुरडया चिकटू नयेत एकमेकांना म्हणून) घालायचे.. आणि मग या उकळत्या पाण्यात पोहायला सोडून द्यायचं चुऱ्याला.. ५ मिनटं मंद गॅस वर ठेवलं कि शिजतो.. पांढरट पडल्या कुरडया कि समजायचं झालं आता.. मग चाळणीवर निथळून घ्यायचं आणि वरून गार पाण्याची धार सोडायची.. म्हणजे overcook होऊन चिकट होऊ नये म्हणून.. आता उलटं सांगायचं तर आपण noodles boil करून थंड करून घेतो तसंच आहे हे प्रकरण साधारण.. 
दुसऱ्या गॅस वर फोडणी करायची.. त्यात शेंगदाणे, कढीपत्ता, मिरच्या, कांदा घालून या शिजलेल्या कुरडया घालायच्या.. मीठ, साखर घालून एक वाफ आणायची.. आपल्या पारंपरिक नूडल्स तयार.. ही process साधारण पोह्यांसारखीच फक्त मुळात कुरडया आंबूस असल्यामुळे थोडीशी साखर घालायची आणि लिंबू नाही पिळायचे.. 
आपल्या आज्या, आया, सासवा यांनी कधी diet chart, calories, body mass index अशा मोठमोठ्या गोष्टींचा विचार नसेल केला.. पण तरी त्यांनी जे पदार्थ आपल्याला खाऊ घातले ते सकस आणि पौष्टिकच.. स्वदेशी म्हणजे काय यामध्ये पण त्या फार पडल्या नसतील.. पण घर कटकसरीत चालावं म्हणून वेगवेगळे प्रकार घरीच केले त्यांनी.. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पण काळाच्या ओघात मागे पडलेल्या या recipe ला परत एकदा रोजच्या नाश्त्याच्या options मध्ये सामावून घेऊ.. आयांना पोहे, उपमा याला पर्याय मिळेल.. मुलांना noodles खाल्ल्याचं समाधान मिळेल..
ब्लॉग आवडला तर जरूर विचार करा.. follow करा, comment करा.. तुमचा एक feedback लिहायला अजून motivation देईल.. माझ्या नावासकट "अवनी गोखले - टेकाळे" पोस्ट share करायला हरकत नाही.. आणि कुरडयाची भाजी बनवल्यावर खायला बोलावलं तरी हरकत नाही.. :)


Wednesday, August 14, 2019

माझ्यासाठी श्रावण म्हणजे..

माझ्या साठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्यपदकांप्रमाणेच तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत राहावी.. ही गोष्ट याच दोघांची आणि त्यांच्या श्रावण सरींची..

हा ऊन सावल्यांचा खेळ त्यांच्या आयुष्याला जोडला गेला तेव्हाच.. जेव्हा त्याने मिलिटरी मध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतला.. वाटतो तितका सोपा नाही हा खेळ.. काळजीने अधीर झालेलं तिचं मन आणि भक्कम कणखर उभा तो.. त्याच्यावर मायेची बरसात करणारी ती आणि तिच्या डोक्यावर छत्र धरून स्वतः पाऊस झेलणारा तो.. 

हा सोमवार खास होता.. घरातलं आवरणं, श्रावणी सोमवार त्यामुळे तिची आणि आईची पूजेची लगबग चालू होती.. सगळं पटपट आवरून तिची ऑफिस ला निघायची घाई होती.. उपास करायचा का नाही हे अजून ठरत नव्हतं तिचं.. पण गडबडीत खायला वेळ नाही झाला म्हणून दूध पिऊन निघाली होती ती.. बघू खाऊ ऑफिस मध्ये काहीतरी उपासाचं मिळालं तर ते, नाहीतर जे मिळेल ते.. असं मनाशी ठरवत निघाली ती.. बाहेर चालू असणाऱ्या श्रावणसरी तिचं मन प्रसन्न करत होत्या.. पूर्वी बायकांना या निसर्गाच्या कुशीत शिरता यावं म्हणून तर सुरु झाले असणार हे सणवार त्यांच्या मागे.. आजची स्त्री रोजच बाहेर पडत आहे.. हा श्रावण रोजच अंगावर झेलत आहे.. भरलेलं आभाळ, रिमझिम पाऊस.. हिरव्या रंगाला पण किती वेगळ्या छटा असतात.. नाजूक पोपटी पानांपासून ते गर्द हिरव्या झाडीपर्यंत.. नकळत निसर्ग न्याहाळत तिचे विचार मोकळे धावत होते.. ऑफिस ला जाताना प्रवासातला तिचा आवडता छंद म्हणजे बातम्या ऐकणे.. तिने कानात हेडफोन घातला आणि बातम्या ऐकायला सुरवात केली.. आणि ती ऐकतच राहिली.. मन एकवटून त्याला आठवत राहिली.. 

लहानपणापासून मैदानी खेळाची आवड असणाऱ्या त्यानी जेव्हा मिलिटरी मध्ये जायचा निर्णय सांगितला तेव्हा तिला जाणवलं.. खूप मोठा झाला आपला भाऊ.. तो पर्यंत ती एक अल्लड, हट्टी लाडावलेली छोटी बहीण होती.. पण या एका निर्णयाने ती नकळत समजूतदार झाली.. आई वडिलांबरोबरीनी तीही खंबीर झाली.. घराची जबाबदारी घ्यायला शिकली.. कोणाच्या नकळत डोळ्यातलं पाणी पुसायला शिकली आणि तेव्हाच भेटला तिला हा श्रावण खऱ्या अर्थाने.. कधी काळजी तर कधी आनंदाला उधाण असा त्यांचा श्रावण बहरू लागला.. त्याची शौर्य पदक वाढत होती.. बढती मिळत होती.. आणि घरावर सुखाची बरसात होत होती.. पावसासारखाच यायचा तो अचानक प्रसन्नता घेऊन.. सुखाने भरून जायचे घर.. आणि निघायच्या दिवशी डोळ्यात भरला मेघ फक्त बरसायचा बाकी असायचा..या वर्षीही असाच निघाला तो सुट्टी संपवून.. "दरवषी पोस्टाने येते राखी तुझी.. यावेळी मी नक्की येतो सुट्टी काढून घरीच" असं सांगून मागे न बघता निघाला होता तो.. तो दिवस आणि आजचा दिवस.. या मधल्या दिवसात त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं.. 

आज बातम्या ऐकून परत थरारली ती.. परत एकदा काळजी, अभिमान सगळंच मनात  दाटून येत होत.. परत परत तिचा हात फोन कडे जात होता.. लागणारही नाही आणि उचलणारही नाही हे माहित असूनही.. दिवसभर  बातम्याच बघत राहिली ती.. जेवायचं पण भान नाही राहिलं.. घरी आली तर आईचं ताट पण झाकून ठेवलेलं.. आई डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली अगं श्रावणी सोमवार ना आज.. ताट वाढताना लक्षातच नव्हतं बघ.. कडकडीत उपास घडला होता त्यांना त्यांच्याही नकळत.. तेवढ्यात बाबा महादेवाचा प्रसाद घेऊन आले आणि दोघींना एकच वाक्य सांगितलं..
"आकाशात इंद्रधनुष्य तेव्हाच दिसतं जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो" 

कुठूनतरी आतून बळ आलं तिला बाबांच्या वाक्याने.. आणि दरवर्षीप्रमाणेच भावासाठी घेतलेली राखी पोस्टात टाकायला निघाली ती.. आपल्यासाठी भाऊ सुट्टी घेऊन यावा एवढ्या कोत्या मनाची ती कधीच नव्हती.. 

मेघ भरला, झुरला, ओघळला अंगणी!
मल्हार थिरकला, सर आली ही श्रावणी!!

बहिणीची राखी बघून इकडे त्याचा जीव तळमळत असतो.. हातात पिस्तूल, डोक्यात जोश, मनात घरच्यांना आठवत असतो.. त्यांच्या आठवणीने तोही तितकाच हळवा झालेला असतो.. फार प्रयत्न करून शेवटी घरी संपर्क करण्यात तो यशस्वी होतो.. दर वर्षी प्रमाणेच याही वर्षी सुट्टी रद्द झालेली असते.. मोठ्या उत्साहात सांगितलं होतं बहिणीला कि राखी या वर्षी पोस्टाने पाठवू नको आता तिची समजूत कशी घालायची या विचारात तो शब्द जुळवत असतो..

तिच्या कणखर आवाजात सगळा संयम वहात असतो..
"मी लवकरच परत येईन", त्याचा निःशब्द श्वास सांगत असतो..
शांत करारी चेहरा ठेऊन तो बोलायचा प्रयत्न करत असतो..
त्या दोघांच्याही डोळ्यात  मेघमल्हार बरसत असतो..

ती कोण तर तुमच्या माझ्या सारखीच एक महिला.. आणि तो सीमा भागात लढणारा एक जवान.. बाकी  नावामध्ये काय आहे? माझ्यासाठी श्रावण म्हणजे.. आसमंतात पौर्णिमेचा चंद्र असावा आणि त्याच्या छातीवरच्या शौर्य पदकांप्रमाणेच प्रत्येक वर्षी तिची राखी त्याच्या पोलादी हातात चमकत रहावी.. !!!

Wednesday, August 7, 2019

Friendship day, सरस्वती आणि मी

मनात खोलवर असलेलं कागदावर उतरतं ते खरं लिखाण.. ते पोचतं समोरच्याच्या मनात.. रोज भेटणारी माणसं, भोवतालच्या घटना, वाचलेली पुस्तके एवढंच काय वेगळा आशय असणारे movies, ठेहराव असणारी गाणी हे सगळंच कुठेतरी समृद्ध करत जातात आपलं जगणं आणि आपलं लिखाणही.. 

मला शाळेच्या पेपर मध्ये निबंध लेखनात कधीच चांगले मार्क मिळाले नाहीत.. upsc चा अभ्यास करताना निबंध लेखन करताना तर खात्रीच पटली की आपला आणि लिखाणाचा दूरवर पण काही संबंध नाही.. पण दिलेल्या विषयावर लिहिण्यापेक्षा मनातून स्फुरणाऱ्या विषयावर लिहिलेलंच बहुतेक पोचत असावं कुठेतरी.. एकदा विचारांना स्थिरता आली कि शब्द कागदावर उतरायला वेळ नाही लागत.. अनुकूल परिस्थिती नाही लागत.. ट्रेन मध्ये चेंगरून उभे असतानाही लेख पूर्ण होऊ शकतो.. 

कॉलेज मध्ये कविता करणारे नवकवी rat-race मध्ये हरवून जातात.. पण हीच वेळ असते जेव्हा आपल्याला बाहेरचं जग कळतं.. आपले अनुभव समृद्ध होत जातात.. आणि याच सोबत आपल्यातला लेखक पण matured होतो हळूहळू.. आणि नेमकं याच वेळी आपण आपल्या या मित्राला विसरतो.. हा एक मित्र असा आहे जो भल्याबुऱ्या प्रसंगात आपल्या नेहमी सोबत असतो.. आपण साथ सोडली तरी तो उभा असतो काठावर ओथंबून आपली वाट बघत.. 

सरस्वती आणि शारदा यांची मानसपूजा करून (आता या दोघींमध्ये नेमका फरक काय आणि साम्य काय हे  परत कधीतरी..) मी आज friendship day च्या निमित्ताने या माझ्या जुन्या मित्राला परत साद घालत आहे.. माझ्यातल्या लेखकाला मला परत एकदा भेटायचे आहे.. बाकी विषय पुरवायला मुंबई समर्थ आहेच.. त्यामुळे आजपासून आता रोज.. माझा हा मित्र मला भेटेल अशी स्वतःकडूनच अपेक्षा.. पूर्वी डायरी - पेन होते त्याची जागा आता ब्लॉग्स नी घेतली आहे एवढाच काय तो फरक.. तुमच्या अभिप्रायांनी ही मैत्री अधिक दृढ होवो हीच इच्छा.. 

भेटत राहू मंथन या facebook page वरून किंवा माझ्या blogger च्या official website वरून!!!



Pls, कविता कोणावर केली आहे विचारू नको
कदाचित ती जवळपासच कोणावरतरी असेल,
कदाचित ती तुज्यामुळेही सुचली असेल॥
एकदा कडेला नजर फिरवून तर बघ,
एकदा वळुन आरशात स्वतःचा चेहरा तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू असा कसा विचार करू शकते विचारू नको
कदाचित जे घडतं रोज तेच लिहिलं असेल,
कदाचित तुज्याही आयुष्यात तेच घडत असेल॥
एकदा लोकांची दुक्ख ऐकून तर बघ,
एकदा स्वतःच्याच आयुष्यात त्रयस्थपणे डोकावून तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू नुसतीच स्वप्नात जगतेस का विचारू नको
कदाचित भविष्याची हीच सुरवात असेल ,
त्याच स्वप्नांना पूर्ण करणारा उद्याचा दिवस असेल॥
एकदा तुही स्वप्नात जगुन तर बघ,
एकदा त्यांना खर करण्याचा प्रयत्न तर करून बघ
कळलं तुला तर चांगलच आहे ....


Pls, तुला असं कसा सुचतं विचारू नको
कदाचित तेव्हा फुलांचा गंध दरवळत असेल,
कदाचित तेव्हा कोणी रागदारी गात असेल,
कदाचित तेव्हा कोणाचीतरी आठवण येत असेल॥
एकदा समुद्र किनारी जाऊन तर बघ,
एकदा चंद्र उगवताना रंगलेले आभाळ तर बघ,
अणि कोणालातरी त्यावेळी मनापासून 'miss' तर करून बघ॥
एखादा श्वास फक्त त्या 'miss' साठी घेउन तर बघ
एकदा तेव्हा तूही काहीतरी लिहून तर बघ॥


-- अवनी गोखले-टेकाळे 

Monday, August 5, 2019

जीवन करी जीवित्व - भाग २

सकाळी डोळे उघडल्यावरचा सगळ्यात मोठा यक्षप्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचं.. सारखं पोहे उपमा खाऊन कंटाळा आला.. काहीतरी वेगळं करायचंय.. पण आपल्याकडे वेळ खूप कमी असतो .. बऱ्याच वेळा पूर्वतयारी करायला पण वेळ नसतो.. त्यामुळे खूप किचकट पदार्थ करता येत नाहीत.. सहज सोपे आणि घरात असलेले पदार्थ वापरून करता येणारे नाश्त्याचे प्रकार लिहून काढले आहेत.. शेवटी उपासाचे पदार्थ पण लिहिले आहेत.. 
  1. पोहे (कांदे पोहे / बटाटे पोहे)
  2. दडपे पोहे
  3. दही पोहे 
  4. कोहळाचे पोहे 
  5. सुशीला 
  6. उपमा 
  7. मिक्स धान्याचा दलिया 
  8. शेवयाचा उपमा / vermicelli 
  9. ज्वारीची उकडपेंडी 
  10. गव्हाचा दलिया 
  11. बाजरीचा खिचडा 
  12. राळ्याचा उपमा 
  13. कुरडई ची भाजी ( कुरडयाच्या चुऱ्याचा उपमा)
  14. सांजा 
  15. मोकळी भाजणी 
  16. तांदळाची उकड 
  17. नाचणीचे आंबील 
  18. ज्वारीचे आंबील 
  19. शिरा (केळी/strawberry/काळी द्राक्ष/अननस घालून)
  20. गोड शेवया 
  21. कणकेचा शिरा 
  22.  घावन 
  23. आंबोळी 
  24. मिक्स पिठाची धिरडी 
  25. मुगाचे डोसे /पिसारट्टू 
  26. नाचणीचे डोसे 
  27. टोमॅटो ऑम्लेट 
  28. eggs ऑम्लेट 
  29. मुगाची धिरडी
  30. boiled eggs 
  31. अप्पे 
  32. गोडाचे अप्पे 
  33. आलू पराठा 
  34. पनीर पराठा 
  35. मेथी पराठा 
  36. धपाटे 
  37. पुरी भाजी 
  38. भोपळ घारगे 
  39. थालीपीठ 
  40. cutlet - बीटरूट+गाजर + कांदा / मटार +पालक +कोथिंबीर 
  41. फोडणीचा भात 
  42. फोडणीची पोळी 
  43. पोळीचा लाडू 
  44. इडली चटणी / सांबार 
  45. वडा सांबार 
  46. डोसे 
  47. धिरडी 
  48. उत्तप्पे 
  49. नीर डोसे 
  50. मिसळ 
  51. कडधान्याची उसळ 
  52. ढोकळा 
  53. मिक्स सलाड 
  54. smoothies 
  55. boiled छोले 
  56. छोले भटुरे 
  57. भाजणीचे वडे 
  58. कॉर्न टिक्की 
  59. boiled स्वीट कॉर्न/मटार चाट 
  60. मुटके
  61. ब्रेड बटर 
  62. चहा - ब्रेड / biscuits/खारी/toast 
  63.  sandwitch 
  64. oats / corn flakes /ragi flakes 
  65. साबुदाणा खिचडी 
  66. साबुदाणा वडे 
  67. बटाट्याचा किस 
  68. रताळ्याचा किस 
  69. उपासाचे अप्पे 
  70. उपासाचे कटलेट (रताळे +बटाटे +लाल भोपळा घालून)
  71. उपासाचे थालीपीठ (साबुदाणा +भगर+ राजगिरा पिठाची भाजणी )
  72. रताळ्याच्या गोड फोडी 
  73. शिंगाड्याच्या पुऱ्या 
-- अवनी गोखले टेकाळे