Wednesday, August 21, 2019

पौष्टिक आणि पारंपरिक noodles

उन्हाळा आला कि सगळ्या बायकांना आठवण होते ती वाळवणाची.. आता ते घरी केले कि विकतचे या ऐतिहासिक वादात नको जाऊया आपण सध्या.. ते परत कधीतरी.. पण काही का असेना या गोष्टींनी प्रत्येक घर भरत हे मात्र नक्की.. ज्वारी, तांदूळ, पोहे, उडीद असे वेगवेगळे पापड, ताकातल्या मिरच्या, खाराच्या मिरच्या, बाजरीच्या खारवड्या, तांदुळाच्या चिकवड्या, वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे.. उपासाच्या चकल्या, पापड वेगळेच.. घरी केले पापड तर मग लाट्या/डांगर खाणे हा एक वेगळा आनंद.. या सगळ्या वाळवणांची राणी म्हणजे कुरडई.. एकतर तिला नैवेद्याच्या पानात पण जागा असल्यानी तिचा मान सगळ्यात जास्त.. सगळ्यात किचकट पण चवही तितकीच अप्रतिम.. कुरडया बनवताना गरम गरम चीक खाणे हा लहानपणचा आवडता उद्योग.. असले किचकट पदार्थ बघून सगळ्यात मोठा प्रश्न पडतो ते म्हणजे कोणी शोधून काढले असेल?.. ते गहू आधी सडायला ठेवा.. मग त्याचा चीक करा ..त्याच्या कुरडया करा.. वाळत घाला.. 
असो.. तर आता प्रश्न हा पडला असेल कि या title चा आणि या वर्णनाचा काय संबंध.. नमनाला घडाभर तेल ओतून झाले कि मग  येतेच आहे तिकडे.. ही प्रस्तावना फक्त थोडेसं तोंडाला पाणी सुटावं यासाठी.. 
तर या कुरडया करून झाल्या कि मग आजी, आई, काकू त्यातल्या छान गोल कुरडया वेगळ्या काढून पत्र्याच्या डब्यात भरून झाकणाला आतून कागद लावून पॅकबंद करून ठेवायच्या.. आणि खाली उरायचा तो चुरा.. तो एका वेगळ्या डब्यात भरून ठेवायचा.. कुरडयाची भाजी(उपमा) करण्यासाठी.. हा चुराच आहे आपल्या आजच्या कथेचा नायक.. इतका खटाटोप करायला वेळ होत नाही आता तर बाजारात खास कुरडयाचा चुरा विकत मिळतो.. महिन्याला जशी आपण नूडल्स ची पाकिटं घरी आणतो तसा हा चुरा वर्षातून एकदा आणून ठेवू शकतो.. पोटात जाऊन संपतोच लवकर पण नाहीच संपला तरी वर्षभर टिकतो हा चुरा.. (माझ्या आत्तेसासूबाईंच्या घराजवळ घरगुती शेवया करून मिळतात.. थोड्या जाडसर असल्यानी उपमा चांगला होतो त्याचा.. त्या माझ्या साठी शेवया घेऊन ठेवतात.. आणि मी त्यांच्यासाठी कुरडयाचा चुरा घेऊन ठेवते.. आम्ही असं साटंलोटं करून दोन नाश्त्याच्या पदार्थांची वर्षाची सोय करून ठेवली आहे.. )
या पदार्थाला कुरडई ची भाजी असं जरी म्हणत असले तरी हा नाश्त्याला खायचा पदार्थ आहे.. पाणी उकळले कि त्यात थोडेसे मीठ आणि तेल(कुरडया चिकटू नयेत एकमेकांना म्हणून) घालायचे.. आणि मग या उकळत्या पाण्यात पोहायला सोडून द्यायचं चुऱ्याला.. ५ मिनटं मंद गॅस वर ठेवलं कि शिजतो.. पांढरट पडल्या कुरडया कि समजायचं झालं आता.. मग चाळणीवर निथळून घ्यायचं आणि वरून गार पाण्याची धार सोडायची.. म्हणजे overcook होऊन चिकट होऊ नये म्हणून.. आता उलटं सांगायचं तर आपण noodles boil करून थंड करून घेतो तसंच आहे हे प्रकरण साधारण.. 
दुसऱ्या गॅस वर फोडणी करायची.. त्यात शेंगदाणे, कढीपत्ता, मिरच्या, कांदा घालून या शिजलेल्या कुरडया घालायच्या.. मीठ, साखर घालून एक वाफ आणायची.. आपल्या पारंपरिक नूडल्स तयार.. ही process साधारण पोह्यांसारखीच फक्त मुळात कुरडया आंबूस असल्यामुळे थोडीशी साखर घालायची आणि लिंबू नाही पिळायचे.. 
आपल्या आज्या, आया, सासवा यांनी कधी diet chart, calories, body mass index अशा मोठमोठ्या गोष्टींचा विचार नसेल केला.. पण तरी त्यांनी जे पदार्थ आपल्याला खाऊ घातले ते सकस आणि पौष्टिकच.. स्वदेशी म्हणजे काय यामध्ये पण त्या फार पडल्या नसतील.. पण घर कटकसरीत चालावं म्हणून वेगवेगळे प्रकार घरीच केले त्यांनी.. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पण काळाच्या ओघात मागे पडलेल्या या recipe ला परत एकदा रोजच्या नाश्त्याच्या options मध्ये सामावून घेऊ.. आयांना पोहे, उपमा याला पर्याय मिळेल.. मुलांना noodles खाल्ल्याचं समाधान मिळेल..
ब्लॉग आवडला तर जरूर विचार करा.. follow करा, comment करा.. तुमचा एक feedback लिहायला अजून motivation देईल.. माझ्या नावासकट "अवनी गोखले - टेकाळे" पोस्ट share करायला हरकत नाही.. आणि कुरडयाची भाजी बनवल्यावर खायला बोलावलं तरी हरकत नाही.. :)


No comments:

Post a Comment