Thursday, November 14, 2019

शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!

"बालदिन होऊन गेला ना.. लिहिलं नाही का काही अजून?" असा प्रश्न समोरून आल्यावर मी विचारातच पडले थोडा वेळ.. सोप्पा तर विषय आहे म्हणून कागद पेन घेऊन बसले आणि खूप वेळ विचारातच हरवले.. काही शब्दात मांडायला जमेच ना.. चार चौघांसारखं बालपण.. त्यात वेगळं लिहिणार तरी काय आणि वाचणारे वाचणार तरी काय.. प्रेमाचं म्हणतात ना.. तुमचं आमचं same असतं तसंच बालपणाचं असतं बहुतेक.. तुमचं आमचं same.. त्या वेळी नेमकं काय आठवलं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
खरंतर या आठवणी काही अशा एका वेळी बसून काढायच्या आठवणी नाहीतच.. या आठवणींना काही format नाही, वेळ नाही, "day" नाही.. आयुष्याची पहिली १०-१५ वर्ष आपल्याला कधीही आणि कुठेही आठवत राहतात वर्षभर.. आपलं आयुष्य चालत राहत घड्याळाच्या काट्यासारखं वर्तमानात आणि त्याच्या खाली फिरणारा मन नावाचा लोलक सतत घुटमळत राहतो कधी बालपणात तर कधी भविष्याच्या विचारात..त्यावेळी नेमकं काय आठवत ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवतं एवढं खरं..!!
गार्गी ला तिच्या पहिल्या gathering साठी तयार करत होते मागच्या वर्षी.. वय वर्ष अडीच.. आणि एकदम मला एक फोटो आठवला.. माझ्या पहिल्या gathering मधला.. वय वर्ष साडेतीन.. पोपटी रंगाचा सुचेता ताई च्या लग्नात म्हणून शिवलेला फ्रॉक घातला होता मी तेव्हा.. डाव्या बाजूला श्रद्धा आणि उजव्या बाजूला रमा.. मध्ये मी.. तिघींनी फोटो मध्ये मोठ्ठा "आ" केलेला आणि आमच्या समोर माईक.. मला गाण्यासाठी "स्टेज" देण्याचं धाडस बहुतेक तेव्हा पहिल्यांदा आणि शेवटचेच केले असेल कोणी तरी.. खूप दिवसात श्रद्धा चा फोन नाही झाला असं म्हणत मी तयार झालेल्या गार्गीचे फोटो काढत होते.. त्यावेळी नेमकं काय आठवत होतं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
महालक्ष्म्यांसाठी सगळे चुलत सासू सासरे, दीर जावा आणि आमची मुलं एकत्र जमलो होतो.. चार हाका मारल्या मुलांना पण ते त्यांच्याच नादात.. डोकावून बघितलं तर घरातली सगळी उश्या पांघरुणे जिन्यात आणि त्यात घुसून ते घर घर खेळत होते.. सगळ्या माणसांमध्ये असूनही मी थोडा वेळासाठी मनाने नारायण पेठेतल्या वाड्यात पोचले.. तीन फूट बाय सहा फूट च्या एकाच कॉट वर सगळी आत्ते-चुलत भावंडं एका वेळी मावण्याचे दिवस होते ते.. त्यावेळी नेमकं काय आठवलं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!! 
शनिवारी पुण्याला गेले होते.. साधना मध्ये पुस्तक खरेदी साठी जायचं होत.. जाता जाता नवीन मराठी शाळा आणि पुढच्या चौकात अहिल्यादेवी लागल्यावर गाडी चा स्पीड आपोआप कमी झाला.. मित्र मैत्रिणी, शाळेतल्या बाई, पट्ट्यांची मारामारी, स्वच्छतेचा तास, वर्तनपत्रिका, ग्राउंड वर केलेली athlatics ची प्रॅक्टिस, ऑफ तासाला केलेला दंगा, गृहपाठ, १० बोटात घातलेल्या बॉब्या, रस्त्याच्या बाहेर बसणारे चिंचा, पेरू, पट्टीवर केलेले संत्र्याचे सूत आणि एक चुकार चॉकलेट.. नेमकं काय काय आठवत होतं ते शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवलं एवढं खरं..!!
नोकरी घर संसार सगळ्यात रमलेले मित्रमंडळ.. काही पुण्यात settle झाले.. काही बाहेर पडले.. रोजच्या सारखाच दिवस सुरु असतो पण अचानक कोणीतरी मैत्रीण foreign हुन काही दिवसासाठी आल्याचं निमित्त होत.. night out मारायची ठरते.. फोनाफोनी सुरु होते.. पहिला फोन झाल्यापासून ते night out होईपर्यंत आणि त्यानंतरचे बरेच दिवस.. नेमका काय काय विचार करत असतो आपण असं शब्दात नाही सांगता येत.. पण मन हरवतं एवढं खरं..!! बालपण देगा देवा.. मुंगी साखरेचा रवा.. !! म्हणजे नेमकं काय ते खरंच शब्दात नाही सांगता येत पण मन हरवतं एवढं खरं..!! 

Follow my momspresso blog for regular updates

Follow posts on FaceBook also -
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also -
https://avanigokhale.blogspot.com/


No comments:

Post a Comment