Monday, November 18, 2019

"चुडा"

गाडीचा हॉर्न ऐकून ती लगबगीने बाहेर आली.. गाडीतून त्याचे आई, वडील, बहीण उतरले तिला  मागणी घालायला.. आणि मागोमाग तिच्या स्वप्नातला "शाहरुख खान" जसा उतरला गाडीतून तेव्हा तिच्या नकळत चेहरा खुलला तिचा.. एक अनामिक लाली चढली तिच्या गालावर, ओठांवर, साडीवर, अवघ्या देहावर.. आज चौकटी बाहेरचे खुले आभाळ तिला खुणावत होते.. तरीही त्या वाड्याची जुनी पण तितकीच भक्कम मजबूत भिंत तिला थांबवत होती तिथेच.. त्या वाड्यातले सोज्वळ संस्कार तिच्या मनावर इतके रुजलेले कि तिचे पाऊल अजूनही योग्य वेळेची वाट बघत तिथेच घुटमळलेले.. तिच्या मुक्त केसांच्या लहरींसारखे तिचे मन हिंदोळलेले पण अजूनही पाऊल मात्र तिथेच दारात थबकलेले.. 
त्याची बहीण म्हणजे तिची जीवश्च कंठश्च मैत्रीण.. काही दिवसांपूर्वी याच मैत्रिणीच्या लग्नात पडेल ते काम करायला म्हणून गेलेल्या तिला काय माहित होते कि हीच मैत्रीण काही दिवसांनी आपल्याही दारात वरात घेऊन येईल.. मैत्रिणीचे घर सजवताना तिला काय माहित होते कि काही दिवसांनी हे घर पुन्हा आपल्याला साद घालेल.. काय माहित होते कि रोज भेटणारा तिचा भाऊ, नव्याने तिला भेटेल.. तिच्या मनातली घालमेल न सांगताही त्या घराला समजेल.. तिच्या घरातले संस्कार लक्षात घेऊन रीतसर मागणी घालायला येतील हे तरी तिला तेव्हा कुठे माहित होते.. 
तिची निवड तितकीच चोख.. पण तरी तिच्या मनात धाकधूक.. या वाड्याच्या चार भिंतीत काय बोलणी होतील याची.. गाडीचा हॉर्न ऐकून ती लगबगीने बाहेर आली तेव्हा हातात घालायला काढलेल्या बांगड्या तिथेच राहिल्या तिच्या आरश्यासमोर.. त्याही वाट बघत आहेत.. बोलणी कशी होतील आणि कधी तिच्या हातात त्या मानाने "चुडा" बनून किणकिण करतील याची.. !!!


No comments:

Post a Comment