महालक्ष्मी आवाहनाचा दिवस. घरची महालक्ष्मी साजरी होऊन थटून तयार. आवाहन करायला सज्ज. सोबत तिच्या नवरा, मुलं, सुना, नातवंड सगळेच. गोकुळात समाधानी ती. अहेवपणाचे लेण लेऊन सज्ज ती. ठसठशीत मळवट भरल्यासारखे गोल कुंकवाचे रिंगण कपाळावर. थकवा आहेच तिला थोडा आजही. आजच काय. गेल्या वर्षांपासून वाढतच जाणारा थकवा. पण वर्षातला सगळ्यात मोठा सण. महालक्ष्मी जेऊ घातल्याशिवाय चैन कसे पडावे. तशाही परिस्थितीत प्रसन्न मुद्रा. सण पार पाडण्याची जिद्द. कोथळ्यात गहू, ज्वारी भरून तयार. मखर तयार. चौक तयार. कोथळ्यांना साडी नेसवून तयार. पिलवंड तयार. पावले काढून तयार. मुखवटे परातीत घालून तयार. पूजेची तयारी तयार. तिने सूनांसोबत लक्ष्मी चे आवाहन केले. हळद कुंकू वाहिले. उखाणे घेतले. ती या घरची लक्ष्मी. आज महालक्ष्मी चे आवाहन.
तिचा जीव अजून थोडा थोडा. बोलायची शक्ती थकलेली. खुणेने विचारणा. सवाष्ण बसली का जेवायला. होणार. यथासांग कुलोपचार होणार. सर्व घरदार मनाने तिच्यासोबत. पण तिच्या निग्रहामुळे देहाने कुलोपचार पार पाडण्यात. सवाश्ण आली. पान सजले. रांगोळी सजली. गोविंद विडा, दक्षिणा ठेवली गेली. गजरा. ओटी. पद्धतशीर. तिच्या इतमामात साजेल असे. ती या घरची लक्ष्मी. आज महालक्ष्मी चा महानैवेद्य.
महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस. पटापट गाठी घेतल्या. हळद कुंकू वाहिले. सगळे घरदार, गणगोत तिच्या भोवती. ती तृप्त. तिची प्रवासाची तयारी पूर्ण झालेली. आता मात्र तिची लगबग. आता घाई करायला हवी. आता थांबून चालणार नाही. तिच्या पुण्याई च्या जोरावर त्या शक्तीने थांबवून ठेवलेले घटिका पात्र भरत आले आता. त्या अनामिक शक्ती ला तिचा शेवटचा दंडवत. सगळ्या गोताला प्रेम, आशीर्वाद, दंडवत. दारात आलेल्या अतिथी ला अजून किती ताटकळत ठेवणार. अतिथी देवो भव. यावेळेस तर अतिथी साक्षात...!!!
काल पासून अन्न पाणी त्यागलेल्या तिने अखेरचा श्वास सोडला. त्या अतिथी च्या शक्तीत ती एकरूप झाली. घरची लक्ष्मी महालक्ष्मी मध्ये विलीन झाली. विसर्जित झाली. तिच्या मनाप्रमाणे यथायोग्य कुळाचार झाला. समाधान पावली ती. भरून पावली. अहेवपणी चुडा मळवट भरून निघाली ती. ती या घरची महालक्ष्मी. आज महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस. घरचे सर्व या महालक्ष्मी च्या चरणी नतमस्तक!!!!!
जीव गलबलून गेला ..
ReplyDeleteशब्द शब्द दृश्य रूपाने पुढे उभा राहिला.