Share market ची ऐशीतैशी. ब्लॉग च नाव? "अर्थातच" Bullish!!!
ही "त्यांची" गोष्ट. त्यांना नाव नाहीच काही. तुमच्या आमच्यातलेच ते. सामान्य, मध्यम वर्गातले. टुकीने संसार करणारे. त्यांचीही काही स्वप्न आहेत. छोटीशी. आणि ती स्वप्न पूर्ण करायला धावणाऱ्या त्यांचीही गाठ पडते अर्थातच "अर्थाशी". वित्त, अर्थ हे झाले मोठ्या माणसांचे शब्द. त्यांना कळतो तो सामान्य बोलीभाषेतला शब्द - पैसा!!
ते शिकत असतात ना शाळेत, कॉलेज मध्ये. तेव्हा त्यांचे सगळ्यात कुठल्या विषयाशी वाकडे असते तर ते अर्थशास्त्र या विषयाशी. Debit credit हे शब्द त्यांना दुरून पण ऐकले की पळून जावे वाटते. असे ते. आणि मग शिक्षण संपल्यावर त्यांच्या लक्षात येते ज्याच्यापासून इतके दिवस पळत होतो त्याच्यापासून सुटका नाहीच आता. आणि मग बरेच पर्याय हिंडून फिरून कधी ना कधी येतातच ते इकडे. Share Market!! ९ ते ३.३० मध्ये चालणारी ही झगमगती जादुई दुनिया.
एका रेषेत चालणाऱ्या दोन मुंग्या समोरासमोर आल्यावर काहीतरी बोलून पुढे जातात. तसे दोन ट्रेडर्स समोरासमोर आल्यावर bullish, bearish, nifty, sensex, put, call, options, futures, ipo, दोन लॉट- चार लॉट अशा अगम्य भाषेत काहीतरी बडबड करतात. त्याच्यासोबत सतराशे साठ कंपन्यांची नावं घेतात. आणि बाकीचे त्यांच्याकडे एलियन कडे बघावे तसे तसे बघत असतात.
त्यांना वाटत असतं. shares म्हणजे पैसे बुडाले. shares म्हणजे फार वेळ देऊन करायची गोष्ट. आमच्याकडे तेवढा वेळ नाही. सकाळी ना मला डबे करायचे असतात. सकाळी ना मला आवरून ऑफिस ला पोचायचे असते. सकाळी ना मुलाला शाळेत सोडायचे असते. आमच्याकडे गुंतवायला तेवढे पैसे नाहीत. आमच्याकडे ना आज पैसे आहेत पण उद्या मला ते लगेच परत लागू शकतात मी पाच पाच वर्ष लॉक करून ठेऊ शकत नाही पैसे. आम्हाला ना त्यातले काहीच कळत नाही. आमचे हे करतात बाई असलं काहीतरी, मी नाही लक्ष घालत. असे एक नाही अनेक मुद्दे. अनेक कारणं ते देत असतात. कधी दुसर्यांना. कधी स्वतः ला. पण तरी त्या प्रत्येक वेळेला मनातून एक सुप्त इच्छा असतेच. काय आहे तरी काय हे प्रकरण.
आणि मग हिम्मत करून, याला त्याला विचारून, सतरा लोकांचे डोके खाऊन, गुगल करून शेवटी उतरतातच ते ही मैदानात. काठाकाठाने चालत चालत कधी ते धापकन पाण्यात पडतात त्यांना पण कळत नाही. गटांगळ्या खात खात शेवटी जीव मुठीत धरून पोहतातच ते. आणि मग काही दिवसांनी ते पण intraday, equity, derivatives, small cap, mid cap असे शब्द बोलायला लागतात.
जाणकारांच्या सोबत बसून अवश्य शिकून घ्यावे अशी गोष्ट. वेळ नाही म्हणून share market बघत नाही म्हणणार्यांनी फक्त डिमॅट अकाऊंट काढून घ्या. app mobile मध्ये टाकून घ्या. whats app जितक्या वेळा दिवसभरात उगाचच ओपन करतो तितक्या वेळा उगाचच ते app उघडून बघा. निफ्टी ला परत एकदा वयात आलेलं पाहून पाहून एखादा ट्रेड करायची आपोआप इच्छा होईल. झालीच इच्छा तर तुम्हीही या गोष्टीचा आणि पर्यायाने "त्यांचा" आपोआप एक भाग बनत जाल.
त्यांची गोष्ट तर सांगितली. पण मी कोण? "त्यांच्यातलीच" एक.
"अर्थातच" अवनी गोखले टेकाळे
आज काही जागतिक ट्रेडर्स डे वगैरे नाही बरं. असले डे बी आपण पाळत नसतो. खूप दिवस या विषयवार ब्लॉग लिहायचा होता. आज वेळ मिळाला इतकंच.
अवनी मस्त सगळ्यांच्या मनातले लिहिले आहेस
ReplyDeleteखूप दिवसांनी लिहिले आहेस
Keep it up