Thursday, August 19, 2021

Work Anniversary.. 13 years down the lane..!!

खूप लोक भेटतात हल्ली. कधी पण बघा ते स्वतः च्या नोकरी च्या कामाबद्दल, वेळेबद्दल, पगाराबद्दल, टीम बद्दल असमाधानी असतात. फार क्वचित एखादा समाधानी भेटतो. काय असतं हे समाधान? Work satisfaction? माहित नाही. तेरा वर्ष पूर्ण झाली आज IBM मध्ये. अर्थ लागत नाहीत यातल्या बऱ्याच प्रश्नांचे अजून पण. आता अर्थ लावावे असे पण वाटत नाही. फक्त बदलत गेलेले आपण आणि त्यासोबत बदलत गेलेले दिवस दिसत राहतात. खूप माणसं वाचायला मिळाली, त्यातली चांगली माणसं आठवत राहतात.
स्थित्यंतरे दिसतात.
ऑफिस वातावरणात नवीन. कॅनडा, अमेरिकेतल्या लोकांचा accent कळत नाही म्हणून भेदरलेली. आपल्याला नीट जमेल का जुळवून घ्यायला याचा काडीचा पण कॉन्फिडन्स नसलेली. तिथून ते हळू हळू इथपर्यंत आलेली. 
स्थित्यंतरे दिसतात. 
कॉलेज सोडल्यावरचे ऑफिस आणि टीम म्हणजे extended college life. धमाल करणारी. मग लग्नाळलेले दिवस. मग नवी नवरी. आपल्याच विश्वात असणारी. नवीन शहरात धडपडणारी. मग pregnancy चे मोठे पोट सावरत ऑफिस ला जाणारी. मग तान्ह्या मुलीची भूक भागवायला, जड शरीराने ट्रेन मधून धावत पळत घरी पोचायची धडपड करणारी. ऑफिस मध्ये वावरताना मन घरी सोडणारी. सतत रडणारी. बेचैन असणारी. आणि मुलगी थोडीशी मोठी झाल्यावर आता परत एकदा नव्याने उत्साह भरलेली. या सगळ्या धावपळीची सवय करून घेतलेली.
स्थित्यंतरे दिसतात.
हातात gloves घालून सुसाट बाईक वर अर्ध्या रात्री ऑफिस मधून घरी येणारी. तिथपासून मुंबई च्या लोकल मध्ये, शेअर रिक्षा मध्ये adjust करणारी घामाने डबडबलेली, फूट रेस्ट वर लटकलेली.
स्थित्यंतरे दिसतात.
नवीन नोकरी लागल्यावर जगाला गवसणी घालावी वाटणारी. स्वतः च्या लग्नासाठी पैसे साठवणारी. लग्न झाल्यावर एक एक घरातली आर्थिक जबाबदारी उचलत कधी नवऱ्याच्या सोबत पूर्ण घराची जबाबदारी घ्यायला शिकले कळले पण नाही. कधी car loan, home loan, शाळेची फी या तारखा भोवती फिरायला लागलो कळलेच नाही. थोडक्यात काय कधी हळूहळू संसारी होत गेलो कळलेच नाही.
स्थित्यंतरे दिसत नाहीत ती फक्त एकाच ठिकाणी. 
अजून पण अपेक्षा तीच आहे. तेवढीच आहे. जी नोकरी च्या पहिल्या दिवशी होती. कधीतरी गाड्यावर एखादी पाणीपुरी आणि कधीतरी एखादे ट्रेन मध्ये खरेदी केलेले पाच दहा रुपयाचे कानातले. यावर मोठी स्वप्न तेव्हा पण नव्हती. आज पण नाहीत. 
नोकरी करणाऱ्या मुलींची ऐश असते असे म्हणतात म्हणजे नेमके काय असते ते मात्र अजून कळले नाही. घरी बसल्यावर दिवसभर निवांत चालू राहणारी कामं ऑफिस च्या गडबडीत एक दोन तासात उरकताना शंभर चुका होतात. अर्ध्या गोष्टी विसरायला होतात. कळत असून पण वेळ कमी पडतो. सगळ्याचसाठी. सगळ्यांसाठीच. एवढं करून महिना अखेरीला खिसा आणि अकाउंट दोन्ही चातकासारखी वाट बघत असतात पुढच्या पगाराची. या सगळ्यात ऐश म्हणजे नेमके काय असते तेवढे अजून कळले नाही. 
हे सगळे अजून किती वर्ष? माहित नाही. चरकात घातलेल्या ऊसाला चिपाड झाल्याशिवाय बाहेर यायला मुभा नाही हेच खरे. आनंद हाच की त्यातून मधूर रस मिळतो तो आपल्याच लेकरासाठी. ऐश हीच. तिला जे पाहिजे ते तिला देता यावे!!

-- अवनी गोखले टेकाळे

3 comments:

  1. वाह.. अगदी मनातलं लिहलंस.. 👌

    ReplyDelete
  2. Khupchh sunder lihileyes Avni!! Thodya far farakane saglya working women chi hich katha.

    ReplyDelete