PL(preparatory leave) सुरू झाली की night मारून अभ्यास करणे सुरू व्हायचे. मग तो अभ्यास रात्रीचे जेवण करून जो शांतपणे सुरु व्हायचा तो कधी एक पर्यंत तर कधी पहाटे पाच पर्यंत. आणि मग रात्री अभ्यास करायचा तर संध्याकाळी थोडी रेफ्रेशमेंट पाहिजेच ना. या नावाखाली रोज संध्याकाळी तळजाई वर तर कधी सारंग च्या कट्ट्यावर टाईमपास चालू असायचा आमचा. त्याच तळजाई वरचा पहिला किस्सा लिहिला होता. भजी खाताना जेव्हा पोलीस पकडतात. आज त्याच बंध मैत्रीचे मधला पुढचा किस्सा. केतकी, मी आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स!!!
आज आठवण यायचे कारण म्हणजे आज सगळी कॉलेज मधली पुस्तके काढून बसलेले आवरत. पण आमचे लाडके पुस्तक दिसलेच नाही कुठे. galagotia publication चे operating systems चे भगव्या रंगाचे जाडजूड पुस्तक. केतकी चे आणि माझे फेव्हरेट पुस्तक.
व्हायचे काय, रात्री आम्ही एकत्र जागून अभ्यास करायचो. घरात असायचो तरी एकमेकींना फोन चालूच. आणि त्यात परत संध्याकाळी घरी सांगितले कि केतकी ला भेटायला जातेय तर घरच्यांना प्रश्नचिन्ह असायचे. सारख्याच तर सोबत असता, परत जेवण केल्यावर अभ्यासाला ती येणार आहेच. मग आत्ता घाईने भेटून काय काम? खरच आता विचार केल्यावर वाटत कि पूर्णवेळ सोबत असताना परत घरी आल्यावर एकमेकींना फोन करून तास तास बोलण्यासारखे मधल्या वेळात काय घडायचे काय माहित. पण ते दिवस होतेच तसे. मग त्या वेळी आमच्या साथीला यायचे ते हे पुस्तक. Operating systems चे. कधी पण उठायचे, पुस्तक देऊन येते केतकी ला/केतकी कडून पुस्तक घेऊन येते म्हणून निघायचे. दोघींच्या घराच्या मध्यवर्ती सारंग च्या कट्ट्यावर भेटायचे. भरपूर गप्पा मारायच्या. आणि जाताना ते पुस्तक इकडून तिकडे जायचे.
डिग्री मिळेपर्यंत त्या पुस्तकात आत काय आहे ते उघडून वाचले नाही. पण प्रत्येक वेळेला भेटायला जाताना पुस्तक सोबत. बाकी घरच्यांना हा प्रश्न कधी पडला नाही की प्रत्येक वर्षी रोज एकच पुस्तक का द्यायचे/घ्यायचे असेल. किंवा त्यांना पडला पण असेल हा प्रश्न पण "बंध मैत्रीचे" हा विषय आई वडिलांच्या syllabus मध्ये पण होताच त्यांच्या तरुणपणात. त्यांनी पण त्यांचे मंतरलेले दिवस असेच घालवले होते कदाचित. म्हणूनच कळत असून पण आम्हाला बंधमुक्त जगू दिले त्या काळात.
आज आम्ही दोघी आपापल्या ठिकाणी, चांगल्या कुटुंबात सुखी आहोत. केतकी साता समुद्रापार लंडन मध्ये, मी मुंबई मध्ये. त्या दिवसांच्या कृपेने चांगल्या नोकरीवर स्थिरावलो आहोत दोघी. पण आज आपापल्या घरी पिझ्झा ऑर्डर करून खाण्यात पण ती मजा नाही येत जी तेव्हा सारंग च्या कट्ट्यावर दोघीत एक पाणीपुरी खाताना यायची. तेव्हा landline वरती रोज फोन वर बोलायचो, तिचा landline नंबर अजून पण पाठ आहे. आता दोघींनी मोबाईल घेतले, whats app वर बोलतो, कॉल करतो पण मनात सलते ते हे की आता मोबाईल नंबर सेव्ह झाला पण "पाठ" नाही झाला. आज मनात सलते ते एवढेच की सगळ्या गडबडीत, धावपळीत आमचे "operating systems" चे पुस्तक सापडत नाहीये. जे घेऊन आम्ही सारंग च्या कट्ट्यावर भेटू शकू, हवे तेव्हा, हवे त्या क्षणाला!!!
केतकी, एकदा तुझी पुस्तकं आवर ना, बघ ना कुठे कप्प्याच्या तळात सापडतंय का? आपले operating systems चे पुस्तक!!!
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment