दैनंदिन आयुष्यात आपल्याला खूप वेळा हे प्रश्न भेडसावतात. आपण आपल्या परीने त्या त्या वेळेला उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तोच विषय कोणी परिसंवादाला देतो तेव्हा खरं तर परिसंवादापेक्षाही घडतो तो स्व संवाद. आपल्या खोल मनात डुबकी मारून, जे वाटेल मनाला ते लिहून, आपल्याला पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न असतो तो. आज असाच एक विषय समोर आला आणि लेखणी सळसळ करायला लागली. हा माझा स्व शी साधलेला प्रामाणिक संवाद. शुभ - अशुभ समज की गैरसमज!!
प्रत्येक रूढी परंपरा ज्या वेळेला ठरवली जाते ती त्या काळानुरूप योग्यच असते. पण अगदी कायदा जरी असेल तरी काळानुरूप त्याच्यात "amendments" येत राहतात. अशाच amendments रूढी परंपरा यांच्यात देखील होत राहतात किंबहुना राहायला हव्या. इतके आणि एवढे सोपे आहे खरं तर. पण वस्तुतः ते तितके सहज सोपे असते का? माहित नाही.
आपले आयुष्य फिरत असते ते चंद्र आणि सूर्य यांच्या भोवती. मग त्यात चंद्राच्या कला, महिने, नक्षत्र, दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ हे सगळेच आले. पूर्वीच्या काळी विजेची अनिश्चिती त्यामुळे बहुतेक सगळं गणित हे दिवस रात्री आणि चंद्राच्या कलांवर अवलंबून असायचे.
शुभ अशुभाचे पहिले सावट असते ते पौर्णिमा आणि अमावस्या या दिवसांवर. भाविक लोक म्हणतील पौर्णिमा शुभ म्हणून तर विज्ञानाचा आधार घेणारे म्हणतील चंद्राच्या प्रकाशात वाटचाल करणे सुकर व्हायचे म्हणून. विचार करा ना पूर्वी च्या काळात जेव्हा चंद्र सूर्य यांच्या उजेडावर लोक अवलंबून होते तेव्हाच्या काळात जर कोणी अमावास्येच्या दिवशी फिरायला शेताच्या बांधावर गेला तर अपघात, घातपात याची शक्यता पौर्णिमेच्या मानाने अधिक. पण ते जनमानसात समजून सांगणार कसे? पूर्वीच्या काळी कसे विज्ञानात सांगितले म्हणाले की लोक ऐकतील याचा भरवसा नाही पण महादेवाचा कोप होईल म्हणले की सगळे ती गोष्ट ऐकणार. त्यामुळे अशा निसर्गाच्या घडामोडी शुभ अशुभ आणि देवादिकांच्या माध्यमातून लोकांना सांगायचा प्रयत्न केला गेला. चूक काहीच नव्हते यात, लोकांच्या भल्यासाठी पसरलेले हे समज, गैरसमज तेव्हा बनले जेव्हा लोकांनी त्याच्यामागचा अर्थ समजून न घेता त्यांचा वापर चुकीच्या अर्थाने करायला सुरुवात केली. मनात सलते ते तेव्हा जेव्हा सुशिक्षित लोक कॉम्पुटर समोर नारळ फोडायला अमावस्या पौर्णिमेचा आधार घेतात.
शुभ अशुभाचे पुढचे सावट असते ते पदार्थांवर. मुळात साबुदाणा शुभ आणि पोहे अशुभ हे कोणी ठरवले असेल? यावर काही मते अशी असतात की आठवड्यात एकदा पचन शक्तीवरचा ताण हलका करण्यासाठी उपास करावेत. मान्य. पूर्वीचे ऋषी मुनी नुसती फळं आणि कंद खाऊन उपास करायचे. पण आपण करतो त्या पद्धतीच्या उपासांमधून नेमके शरीराचे कुठले हित साध्य होते? उपासाचे एक साधे उदाहरण सांगते, आमच्या ऑफिस मध्ये एक मित्र जेवताना नुसते वेफर्स खात होता. समोर एकामागे एक वेफर्स चे पुडे साठलेले बघून न राहवून त्याला विचारले काय रे, जेव तरी सरळ पोळी भाजी यापेक्षा. तर म्हणाला की माझ्या मुलाचा दहावी चा result चांगला लागावा यासाठी वर्षभर मी सोमवारी उपास आहे. त्याला म्हणलं तू पोळी न खाता वेफर्स खाल्ले तर तुझ्या मुलाचा result चांगला लागेल हा कल्पनाविलास खूप छान आहे. पण मुळात घरी जाऊन त्याचा अभ्यास घेतलास तर ती कल्पना सत्यात जास्त लवकर उतरेल असे नाही का वाटत? तो कायम म्हणायचा, "प्रॉब्लेम होतो खूप, तू जे बोलते ते खरं बोलते. मनापासून बोलते. विचार करून बोलते. हे सगळं मनाला पटतं त्यामुळे तुझ्याशी वाद घालणं जमत नाही. पण हे विचार सत्यात आणायला हिम्मत कमी पडते."
शुभ अशुभाचे पुढचे सावट महिन्यांवर. चैत्रातली नवी पालवी, आषाढाचा पहिला मेघ, श्रावण सरी, भाद्रपदातल्या गौराया, कार्तिक स्नान हे सगळे शुभ मग बिचाऱ्या फाल्गुनाची काय चूक? पानगळ होते म्हणून त्याला मागे सरकवले आपण. पण फाल्गुनात पानगळ झाली नाही तर चैत्रात नव्या पालवी ला जागा राहील का झाडावर?
माझ्या एका मैत्रिणीला करोना झालेला. घरात ती आणि तिच्या दोन शाळेत जाणाऱ्या मुली अशा तिघीच. त्यात ही एका खोलीत isolated. हॉल मध्ये मुली तोंड बारीक करून बसलेल्या. ते दृश्य पाहून ठरवले. पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ तिघींचा डबा त्यांना घरी नेऊन देत होते. देवाने मला करायची बुद्धी दिली त्यासोबत करायला शक्ती दिली. करोना पेशंट च्या घरात जाऊन डबा ठेऊन येत होते, शिंक पण नाही आली पंधरा दिवसात. आपल्यावर अन्नपूर्णा प्रसन्न, तिच्यावर धन्वंतरी प्रसन्न. अजून काय पाहिजे. पंधराव्या दिवशी तब्बेत "fit and fine". या पंधरा दिवसात दार उघडून विचारपूसही न करणाऱ्या एका अदृष्य बंद दरवाज्यामागून शेवटच्या दिवशी एक वाक्य कानावर पडलेच -
"अग्गोबाई, करून केले ते फाल्गुनात. चैत्रात जेऊ घातले असते तर पुण्य तरी पदरी पडले असते. मी आपली त्या तिघींना आता चैत्रातल्या शुक्रवारी सवाष्ण आणि कुमारिका म्हणून बोलावणार आहे. म्हणजे कसे थोडा तिला आराम पण मिळेल, आपल्याला काही धोका पण नाही तोपर्यंत त्यांच्यापासून. आणि तेवढाच सगळ्यांना बदल".
आता त्या बंद दाराला कोण सांगणार, नरकाचे advance booking करून मस्तीत जगणारे मस्तमौला आम्ही. पाप पुण्याच्या आणि शुभ अशुभाच्या नियमाच्या दावण्या कधीच तोडलेले आम्ही. आम्हाला अजून काय फरक पडणार?
आता तुम्हीच सांगा. काय शुभ, काय अशुभ!! कोणता वार शुभ, कोणता वार अशुभ!! कोणती तिथी शुभ, कोणती तिथी अशुभ!! कोणता महिना शुभ, कोणता महिना अशुभ!! शेवटी "मनोभावे" म्हणतात ना त्यातला मन आणि भाव तेवढा महत्वाचा. बाकी सगळे हातून जेव्हा जसे घडायचे तसे घडत राहते. आपण निश्चिन्त आणि निर्विकार मनाने जगाच्या नियंत्यावर स्वतः ला सोपवून द्यावे. आणि जे जे होईल ते ते पाहावे. तो हातून करून घेतो. जेव्हा आणि जिथे त्याला आपली गरज वाटते. तेव्हा तिथे तो घेऊन जातो आपल्याला. शेवटी काय, आपल्याला त्या नियंत्याची भीती वाटण्यापेक्षा, त्याच्याकडून काही मिळवण्यापेक्षा आपण त्याला समजून घेणे जास्त महत्वाचे. अंबरातल्या नीलपटावर तो सारीपाटाचा डाव मांडून बसलेला आहे. त्या डावांमधल्या चाली एकदा उमगल्या की स्वर्ग या अवनीतलावरच.. तो काही वेगळा नाही!!
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment