Sunday, April 18, 2021

हे महादेवा!!

हे महादेवा!! 

धगधगता वन्ही ललाटावर झेलणारा महाकपाल तू!! प्रसन्न पवित्र गंगाजळाला जटेत सामावणारा गंगाधर तू!! हलाहल प्राशन करून देवतांना अमृत प्रदान करणारा भोळासांब तू!! पूर्ण उमललेल्या कृष्ण कमळाप्रमाणे सावळा कंठ असणारा नीलकंठ तू!! नीलकंठ दाह शमवणारा भुजंग नागाचा वेढा, त्याच्या फण्यावर कदंब कुंकुम तेजाची उधळण करणारा तेजस्वी मणी आणि त्या फण्याला खुलवणारा महेश तू!! डमरू वाजवणारा तांडव करणारा नटेश्वर तू!! शीतल शशांक मस्तकी धारण करणारा चंद्रशेखर तू!! हाती त्रिशूळ, भाळी त्रिनेत्र, त्रिदेवातील एक तू!! शिवाचा शक्तीशी मिलाप अर्धनारी तू!! शैल पुत्री चा सुरेश तू!! उमेचा उमेश तू!! मुरुगन आणि गजानन यांचा पिता गिरिजापती तू!! काली चा महाकाल तू!!
अंबरातल्या नील पटावर सारीपटाचे दान टाकणारा शिव शंभो तू आणि समोर दान झेलायला बसलेली तुझी शक्ती महेश्वरी!! आज त्या सारीपटाचे एक दान या अवनी तलासाठी टाकावे म्हणून हे आर्जव!! वेगाने फिरणाऱ्या सापाच्या फुत्कारातून, धगधगणारा अग्नी पसरत आहे. धिमिध धिमिध असा मृदंगाचा आवाज क्षणाक्षणाला वाढत जात आहे. डमरू च्या निनादात सुरू असलेले तांडव आता सहन होत नाही महादेवा!!
हे महादेवा!! तू तर मदनाचा,  त्रिपुरासुराचा, जगाच्या बंधनांचा, दक्ष यज्ञाचा, गजासुराचा, अंधकासुराचा नाश केला आहे ना.. त्या यमावर नियंत्रण ठेवणाऱ्या महादेवा ती ताकद फक्त तुझ्यात!! तुझ्यापुढे नतमस्तक!! तुझा सखा हरी, तोच धन्वंतरी रे महादेवा, त्याच्या कृपेने त्याच्या लेकरांना प्रज्ञा तर मिळाली लढायला पण तुझ्या कृपेने त्यांना शक्ती पण दे महादेवा, त्यांना हिम्मत दे महादेवा!! रेड्यावर आरूढ होऊन सैरावैरा धावणाऱ्या त्या यमराजावर नियंत्रण ठेव महादेवा!! हे महादेवा, या अवनी चे, या धरेचे, या पृथ्वीचे तुला त्रिवार वंदन!! हे महादेवा!!!!!! 

-- अवनी गोखले टेकाळे.. 

2 comments:

  1. शिव नामाच्या एकेका अर्थाला आळविलेली आर्त प्रार्थना निश्चित तो भोळा सांब..प्रजाहितदक्ष सदाशिव ऐकल्याशिवाय राहणार नाही..ही प्रार्थना फलद्रुप होवो, हीच मनोकामना..!✍

    ReplyDelete