Monday, April 5, 2021

मुखवट्या मागचे चेहरे

एक फार कळकळ. एक ब्लॉगर म्हणून. माझ्या मनात. मुखवट्या मागचे चेहरे. तुम्ही याचा विचार केला आहे का?

आपण एक लेखक म्हणून, एक ब्लॉगर म्हणून, एक कवी म्हणून आपल्या कलाकृती विषयी जागरूक असतो. अभिमान असतो आपल्याला आपल्या कलेचा. जाणीव असते. भावना असतात. आपले मन गुंतलेले असते त्यात. तरल संवेदनांचा कलाविष्कार असतो ना तो. मग तो कोण चोरतो याकडे पण आपले बारीक लक्ष असते. बारीक म्हणजे कसे? उन्हाळ्यात घरातले वाळवण सांभाळणारी, डोक्यावर पदर घेतलेली आजी कशी काठी घेऊन उन्हातान्हाची पर्वा न करता राखण करते ना. अगदी तसे. अर्धे ओले पापड नजर चुकवून कोणी फस्त करताना दिसले की बसलीच काठी पेकाटात. तसेच. मग आपण येतो सगळे शब्द सोबत घेऊन. कॉपी राईट वगैरे.

पण या सगळ्यात आपण एक विसरतो की. एक कलाकार असून पण. बऱ्याच ब्लॉग च्या सोबत एखाद्या सुंदर सुबक नटी चे चित्र असते. काही खलनायक लिखाणात रंगवली की लगेच serial ची एखादी खल भूमिका करणारी अभिनेत्री आलीच पाहिजे सोबत. या वेळी आपण सोयीस्कर रित्या वरती मांडलेला पहिला परिच्छेद का विसरतो? का कळत नाही आपल्याला एक कलाकार म्हणून एका कलाकाराच्या भावना?

कोणी हक्क दिला आपल्याला त्यांचे फोटो आपल्या पोस्ट वर लावण्याचा. हो आहेत ना ते professional. Modelling पण करत असतील कदाचित. मग काय चूक आहे? ते कला सादर करतात आणि पैसे मिळवतात. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या ब्लॉग चा TRP वाढवायचा हक्क कोणी दिला आपल्याला? आपण मानधन देतो का त्यांना त्यांचा चेहरा वापरल्याचे? एखादी खल भूमिका करणारी स्त्री कलाकार खऱ्या आयुष्यात तशी नसते हो. कोणी अधिकार दिला आपल्याला, आपल्या खलनायिका त्यांच्या चेहऱ्या सोबत जोडण्याचा? त्यांचा मुखवट्या मागचा चेहरा जाणून घेतला का आपण? आपला फोटो असा तिसऱ्याच कोणाच्या फलाण्या माणसाच्या पोस्ट वर पाहून आपल्याला काय वाटेल? सासू सून नात्यावर लिहिताना सिरीयल मधल्या सासवा सूना का पाहिजे फोटो साठी? आपल्या सासू च्या सोबत काढलेला फोटो का नको आपल्याला पोस्ट वर?

मुळात आपल्या शब्दात पकड असावी. सोबत एक पण चित्र नसताना पहिल्या चार वाक्यात वाचून पुढचे वाचत जाण्याची इच्छा निर्माण करणारी ताकद आपल्यात पाहिजे.विषयात नावीन्य असावे. लिखाणात प्रगल्भता असावी. लिखाण मोजके, नेटके, बांधेसूद असावे. वाचक आपसूक वाचतील हो. त्यातून एखादे विषयाला साजेसे चित्र लावावे वाटले तर काढा एखादा छान फोटो घरीच फुललेल्या मोगऱ्याच्या फुलांचा. सकाळी सकाळी बाहेर पडून एखाद्या बहरलेल्या अमलतास चा. प्रशांत सरांसारखा तुमच्या आवडत्या मेनू चा. 

हा लेख मी कोणाला टॅग न करता, कोणतेही चित्र सोबत न जोडता माझ्या वॉल वर लिहीत आहे. जर मुद्दे बरोबर असतील तर तुम्ही शेवट पर्यंत वाचत याल. आणि जर शेवट वाचला तर कॉमेंट कराल. इतके सोपे आणि सरळ गणित आहे. बाकी आपले गणित फार पक्के हो. त्याच्या जीवावर तर आज इथे पर्यंत. बाकी सुज्ञास अजून सांगणे न लगे. 

एक फार कळकळ. एक ब्लॉगर म्हणून. माझ्या मनात. मुखवट्या मागचे चेहरे. तुम्ही याचा विचार केला आहे का?

-- अवनी गोखले टेकाळे.
(बाकी हे नाव महत्त्वाचे बरं. ते कट करून स्वतः च्या नावावर हा लेख खपवू नका. नाहीतर कसं व्हायचं. गाढवा पुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. )

1 comment: