Monday, March 29, 2021

ठेचा (शड रस रसनेचे - तिखट -१)

आम्ही मराठवाड्यातले लोक गोड तर खातोच पण आम्हाला तिखटाचा झटका जास्त प्रिय. त्यामुळे रसनेच्या सहा रसांपेकी पुढचा रस घेऊन येत आहे. तिखट. मराठवाडी झटका. ठेचा!!

इकडच्या लोकांना जेवणात ठेचा, भाकरी पाहिजे मग बाकी काही असो नसो फार फरक नाही पडत. त्यातून कडक भाकरी असेल तर अजून प्रिय.

ठेचा खायचा तर आमच्या बाबांच्या (सासर्यांच्या) हातचा. वाटीभर खाल्ला तरी बाधणार नाही. त्यांची कृती आणि टिप्स तुमच्यासाठी.

पोपटी मिरच्या घ्यायच्या. देठ काढून तेलात वाफवून घ्यायच्या मिरच्या. वाफवताना झाकण ठेवा म्हणजे ठसका घशात कमी जातो. थोडे भाजलेले शेंगदाणे पण तेलात घालायचे. थंड झाले की भरपूर सोललेली लसूण, शेंगदाणे, मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ मिक्सर मधून काढावे. दगडी खलबत्ता असेल तर अजून बहार. चुर् आवाज करत वरून कडक तेलाची फोडणी. फोडणीत तेल जिरे आणि हिंग उचलून घालायचे. आणि ठेच्यात मिरची पेक्षा लसूण उचलून घालायचा. म्हणजे बाधत नाही. 

हा झाला साधा ठेचा. यात मिरच्या तेलावर वाफवताना कधी त्यात कच्चे टोमॅटो घाला, कधी मेथी घाला. कधी दुधी भोपळ्याचा मधला गर घाला. कधी दोडक्याच्या शिरा घाला.

बाकी फोटो नाही का विचारू नका. ठेच्याचे फोटो शूट करण्या एवढे रसिक नाही आम्ही. करतो आणि खाऊन टाकतो.

ता. क. स्वयंपाक करताना नाकाला हात लावू नका बरं. तसंही मिरच्या नाकाला झोंबायला फार वेळ नाही लागत म्हणून म्हणलं आपलं.

- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment