फळांचा राजा आंबा आणि रसनेच्या शड रसांचा राजा म्हणजे गोड. इतके सगळे असताना गोड पदार्थ लिहायचे ठरवले तर सुरुवात आमरस पासून नाही तर कशा पासून होणार.
शेवयाच्या खिरीचे राजेशाही रुपडे म्हणजे रसातली शेवयी. मी नवीन नवीन करायला गेले आणि याचे खूप प्रयोग फसवले. म्हणजे शेवया रसात शिजवायला गेले त्यात थोडे दूध घातले पण किंचित आंबट रस असल्याने दूध फाटले. कधी सगळ्या शेवया एकमेकींना चिकटून त्यांचा गोळा होऊन बसला. पण खूप प्रयोगा नंतर या वेळी एकदम परफेक्ट जमली म्हणून मग घेऊन आले तुमच्या साठी.
आमरसात थोडे दूध, साखर घालून मस्त फ्रिज मध्ये ठेऊन द्या. साखर किती ते रसाच्या गोडीवर ठरवा. तुपावर शेवया परतून घ्या. हात शेवया असतील तर जास्त बेस्ट. पाण्यात शेवया शिजवून घ्या. आणि मग आम रसात या शेवया घालून हलवा. बाकी आमरस मध्ये दूध किती घालायचे? आपल्याला फालुदा नाही करायचा, जेवणात गोड म्हणून घ्यायचे आहे त्यामुळे थोडक्यात. ड्राय फ्रूट काय आणि कधी घाला ते काही सांगत बसत नाही. ते तुमची हौस, आवड. ते काय दोन घाला नाहीतर दहा. तुपावर परतून वरून डेकोरेट करायला घाला नाहीतर किसून दुधात घाला. कुठल्याही गोड पदार्थाचा शेवट होतो जायफळ किंवा वेलची पावडर नी. घालायचे तर घालू शकता पण रसाचा स्वाद आणि रंग पुरेसा ठरतो त्यामुळे काही नाही घातले तरी चालेल.
तुम्ही म्हणाल हिनी प्रमाण नाहीच सांगितले कशाचे, तर सांगितले काय नेमके? मी फक्त तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि पदार्थ करून खायची इच्छा होईल एवढेच काम केले. बाकी प्रमाण ते काय तुम्ही सुगरण आहातच. घाला सगळे मोकळ्या हाताने. प्रयोग फसला तर सरळ या फोटोचा वास घेत आमच्या घरी पोचा. सोबत करू आणि खाऊ. काय म्हणता.
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment