Wednesday, March 24, 2021

बाळ लोणचे (शड रस रसनेचे - आंबट - १)

अन्नाचे रस सहा. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू, खारट. याच सहा रसांवर आधारित पुढची लेखमाला. यातला तोंडाची चटक वाढवणारा सगळ्यात प्रमुख रस म्हणजे आंबट. आणि त्या आंबट ची सम्राज्ञी म्हणजे कैरी!! तर सगळ्या चवींवर लिहिणार आहेच.. पण सीझन संपेपर्यंत कैरी वर जोर देऊया..

गरमी आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे कैरी आणि आंबा. आत्ता बाजारात असलेल्या कैरीला पावडर लावली असेल, आत्तापासून नको आणायला, बाधेल, घसा बसेल, पित्त होईल असे काही सुज्ञ विचार असणाऱ्यांनी पुढे वाचूच नका.

वर्षाचे साठवणीतले लोणचे जानेवारी पर्यंत बुडाला गेलेले असते. आणि मग लिंबू लोणच्यावर भागवा भागवी करत वाट बघणे चालू असते ते कैरीच्या आगमनाची. बाकी ते प्रेगनन्ट बाई डोळे मिचकावत कैरी खाते हे फक्त पिक्चर चे नियम आहेत. आपल्याकडे तसं काही नसतं.. बाजारात पहिली कैरी आल्यापासून शेवटची कैरी येईपर्यंत खवय्यांच्या घरात दररोज कैरी असतेच. आणि अबालवृद्ध सगळ्यांचा त्यावर डोळा असतो. अशातच घरातली बाई ओट्याशी सिझन ची पहिली कैरी चिरायला घेते. मग सगळे स्वयंपाकघरात डोकावत एक एक फोड उचलत जातात. मग आधी नुसती कैरी खाणे, मग मीठ लावून खाणे, मग मसाला लावून खाणे, असे करत करत जर शेवटी उरलीच कैरी तर मग पदार्थ वगैरे बनवायला पुढे जायचे. 

तसे तर कैरीचे खूप प्रकार बनवतोच आपण. पण त्यातला मानाचा पहिला मानकरी म्हणजे बाळ लोणचे. कैरी बाळ असते म्हणून बाळ लोणचे म्हणायचे का लोणच्याचे बाळ रूप म्हणून बाळ लोणचे म्हणायचे हे आपले ज्याचे त्याने ठरवायचे. आपण ठरवत नाहीच काही, डायरेक्ट करायला घेतो. फार वेळ घालवायचा नाही बनवण्यामध्ये. बनवण्यापेक्षा जास्त जोर खाऊन संपवून टाकण्यावर पाहिजे. त्यामुळे सरळ तयार लोणचे मसाल्याचे मोठे पाकीट सिझन सुरु झाला कि आणूनच ठेवायचे. (आपण काही जाहिरात करत नाही कोणाची, पण तरी केप्र चा चांगला असतो.)

कैरी चिरून त्यात मसाला, मीठ आणि कैरी आंबट किती आहे त्या प्रमाणात गूळ घालायचा. फोडणी करायची त्यात थोडी मोहरी आणि भरपूर हिंग(मिरे आणि मेथ्या आवडत असल्यास ते पण घालू शकतो). आणि फोडणी थंड झाली की वरच्या मिश्रणात घालून हलवायचे. एका जेवणासाठी माणशी एक छोटी बाळ कैरी घ्यावी. हे लोणचे "टिकत" नाही याची दोन कारणे - एक म्हणजे नवीन नवीन आलेल्या कैऱ्या पिवळ्या असतात, त्यामुळे घालून ठेवलेले लोणचे टिकत नाही. आणि दुसरे कारण म्हणजे जेवण संपेपर्यंत वाडग्यातले लोणचे संपलेलेच असते. 

if(कैरी available in market ==true) 

   {Execute same recipe every day}

बाकी बाळ लोणच्यावरच थांबायला नको. पटापट बनवून, खाऊन परत माझ्या ब्लॉग वर या. कैरीचा पुढचा पदार्थ वाचण्यासाठी. तोंडाला पाणी सुटले का? अजून सुटले नसेल तर फोटो बघत रहा..

-- अवनी गोखले टेकाळे



3 comments:

  1. मस्तच.. पाणी सुटले तोंडाला..
    मला माहित असलेली छोटीसी झटपट रेसिपी सांगते..
    कैरीचे काप करून घेऊन त्यात हळद, मीठ, तिखट आणि लसूण चेचून घालायचा.. प्रमाणात कच्च तेल सोडायच.. हातानेच हलवून घ्यायचं.. जेवणासाठी लगेच तयार..chtttaaak एकदम..

    ReplyDelete