Sunday, March 21, 2021

अन्नपूर्णा

मूलभूत तीन गरजा. त्यातली अन्न ही पहिली. पोट भरलेले तर बाकी काम करायला सुधरते नाहीतर डोक चक्कर चक्कर. उपास कधी केले नाही.. डाएट वगैरे चे अर्थ कधी समजून घेतले नाहीत.. एकच नियम स्वतः ला लावला लग्न झाल्यास.. अस्तित्वात असलेली सगळी धान्य, कडधान्य, डाळी, भाज्या, पालेभाज्या आलटून पालटून पोटात गेले पाहिजे.. तिथे आवडत नाही म्हणून वेगळी भाजी बनवून देते असले फाजील लाड जमणार नाहीत.. सहा रसांनी युक्त अन्न जिभेवर चवीची जाणीव देत पोटात जाते.. हे सगळे रस पोटात जाऊ द्यावे कारण त्याच रसांमध्ये घोळवून शब्द बाहेर येतात जिभेवर.. उगाच बोलताना एखादा रस कमी नको पडायला..

माझी आजी म्हणायची (ती काय काय म्हणायची ते अख्ख्या महाराष्ट्राने वाचले म्हणा) कोणाला खास जेऊ घालायचे तर पानात रंगसंगती चोख असावी.. उगाच करायचे म्हणून विचार न करता पदार्थ करत सुटले आणि पान वाढल्यावर कळले सगळेच पिवळ्या रंगाचे.. असले चांगले दिसत नाही. खाणाऱ्याला अशा पानात जेवावे वाटत नाही.. आधी मेनू ठरवावा त्याचे रंग वास चवी एकमेकांना पूरक असाव्यात.. आणि मग पदार्थ बनवायला घ्यावे..

माझे माहेर म्हणजे कोकणी खाद्य संस्कृती आणि सासर म्हणजे मराठवाडा. ओल्या नारळाचे शेंगादाण्याशी लग्न लागल्यावर व्हायचे ते सगळे धमाल गोंधळ उडाले माझे सुरवातीला.. तसा स्वयंपाक येत होता आधीपासून पण इकडे नावं ऐकून गांगरून जायचे मी.. डुबुकवडी, माणिक पैंजण, मोहन भाऊ, सुशीला, एसर, पूड चटणी, गडगीळ, दिलपसंद, चमकुरा असे नाव ऐकले की काय करायचं आणि कसं करायचं.. आम्हाला आपले फणस, ओले काजू, कुळीथ, पातोळ्या, आंबोळ्या, घावन, रातांबे असले शब्द ऐकायची सवय.. त्यात परत भाजीत शेंगा कूट घालायचे का ओला नारळ हे अजून एक प्रश्नचिन्ह.. पण नवीन पदार्थ खायची आवड असल्यामुळे करायला पण शिकले.. माझे पाककलेतील ज्ञान दुप्पटीने वाढले..

चवीचे म्हणाल तर माझे सासू सासरे दोन्ही नणंदा आणि नवरा सगळेच उत्तम स्वयंपाक करतात.. लग्नाच्या आधी पहिल्यांदाच सासरी आलेले आणि तेव्हा केलेल्या स्वयंपाकात वरण सासर्यांनी बनवले होते तेव्हाच लक्षात आले आपला पाककलेचा सोडवलेला पेपर ज्या मास्तरांच्या हातात तपासायला जाणार त्यांचा पाया भक्कम आहे.. अजूनही त्यांनी एखाद्या पदार्थाला दाद दिली मनापासून की मी एकदम सातवे असमान पर असते.. आणि तेव्हाच दुसरे हे पण जाणवले की इथे पुरुषांच्या सुध्धा स्वयंपाक करण्यात तितकीच सहजता आहे.. काही पुरुष हळूच बायकोला लपून छपून मदत करतात, कोणाला कळू देत नाहीत.. तसेही नाही इथे.. सहजतेने सांगितले होते पहिल्याच भेटीत वरण बाबांनी केले आज आणि भाजी आईनी केली.. आवडले ना तुम्हाला.. इतके सहज..

अभ्यास केल्यावर वार्षिक परीक्षा देतो ना तसे महालक्ष्मी (गौरी चा सण) चा सोवळ्यात स्वयंपाक करताना वाटते मला.. आमची चार कुटुंब एकत्र येऊन हा सण करतात आणि हा स्वयंपाक मी आवर्जून करते वार्षिक परीक्षा समजून.. वर्षभरात केलेल्या सगळ्या प्रयत्नांचा कस लागतो तेव्हा.. सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, तीन चटण्या, पुरण पोळी, साधी पोळी, कटाची आमटी, कढी, चमकुर्याचे भजे, घोसवळ्याचे भजे, कुरडई, साखरभात, साधा भात, वरण, खीर, कानवला.. तरी काहीतरी राहिलेच आहे यादीत बहुतेक (एक यादी असते केलेली तेव्हा त्यात एक एक पदार्थ झाला की टिक टिक करत जायचे म्हणजे विसरत नाही) हा सगळा स्वयंपाक मी आणि धनश्री करतो सासूबाईंच्या हाताखाली. (हो हो.. ही तीच धनश्री.. तोरण विणायला सोबत रात्री जागायची तीच.. माझी चुलत जाऊ. तिच्याबद्दल निवांत परत कधीतरी) तर हा स्वयंपाक जेव्हा दाद मिळून पास होतो तेव्हा वर्षभरात केलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रयोगाचे समाधान वाटते..

आता हे सगळे पुराण झाले स्वयंपाक बद्दल.. पण तो काय पोट भरायला करतोच आपण सगळे.. थोडे फार नावीन्य पण आणायचा प्रयत्न करतो. पण याच्या पलीकडे जाऊन एक छंद आहे जगावेगळा.. त्याच्यासाठी लिहायचा खटाटोप.. मला मसाले, लोणची आणि भाजण्या करायला प्रचंड आवडते.. बहुतेक हे करताना जो वास येतो खमंग त्याच्या वरच्या प्रेमामुळे असेल.. पण तुफान आवडीने मी ही गोष्ट करते.. भयानक उत्साह संचारतो माझ्यात.. वेळात वेळ काढून मसाल्यासाठी खडे मसाले बाजारातून आणण्यापासून सगळे जाम भारीच वाटते मला.. सांबार मसाला, काळा मसाला, उपास आणि साधी थालीपीठ भाजणी, कैरीचे लोणचे हे प्रकार माझेच मला आवडतात खूप..आता विकतचे नको वाटतात.. खूप प्रयोग करून कमावलेला फॉर्म्युला आहे माझ्याकडे या सगळ्याचा..( माझ्या पर्सनल ब्लॉग वर जाऊ तिथे खाऊ या विषया अंतर्गत माझे असेच काही प्रयोग सापडतील तुम्हाला प्रमाणासहित.. ) माझ्या सोबत अजून काही मैत्रिणींना हे वेड लावले आहे..

तर यापुढे एक नक्की करा.. तुमच्यासमोर कोणी बोलायला लागले की आयटी मधल्या किंवा जीन्स टीशर्ट घालणाऱ्या मुलींना स्वयंपाकाची बिलकुल आवड नसते तर त्यांना एकदा थांबवून सांगा.. त्या जगात पण वेड्या मुली शिल्लक आहेत अजून.. ज्यांना छंद म्हणून मसाले, लोणची आणि भाजण्या घरी बनवायचा नाद आहे.. पारंपरिक पाककला काही संपुष्टात वगैरे येत नाही.. चवीने खाणारे चवीने खाऊ घालतात पण.. उगाच खाद्यसंस्कृती ची वैश्विक चिंता वगैरे करून त्रागा करू नका म्हणावं..

मीठ ना, घाल ग अंदाजाने,
याचे अचूक गणित ती समजते..
तेव्हा हातात पळी घेतलेली ती,
देव्हाऱ्यात बसलेली अन्नपूर्णा भासते..!!!

काय मग येताय ना जेवायला? यायलाच पाहिजे. अखिल भारतीय "अन्नपूर्णा" संघटनेकडून तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचे निमंत्रण!!!


ता. क. हे लोकरीचे जेवणाचे पान आमच्या हिराकाकूंची (चुलत सासूबाई) क्रोशा ची स्पेशालिटी. हे पान जेवढे छान दिसते आहे तेवढीच त्यांच्या हाताच्या या सगळ्या पदार्थांची चव पण.


-- अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment