हे आपलं उगाच.. म्हणजे हे काही पुराणात लिहिलेलं नाही बरं.. परिकथेतल्या कथा असतात तशी उगाच आपली एक काल्पनिक रूपक कथा.. या गोष्टीचा जर कुठे योगायोग आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा..
तर झालं काय.. फार फार वर्षांपूर्वी.. एक आटपाट नगर होतं.. त्या नगरात सगळ्या सुख सोयी होत्या.. माणसं होती.. पशुपक्षी होते.. झाडं होती.. तरी काहीतरी कमी वाटत होती.. मग वाटले जयबाप्पा ला की आपण या झाडांवर फुलांची निर्मिती करायला पाहिजे.. त्यांनी फुलांनाच विचारले.. तुम्हाला काय काय पाहिजे?
धोत्र्याच्या फुलाला पण विचारले बाप्पाने.. फुला फुला तुला काय पाहिजे? तो म्हणतो मला मान पाहिजे.. बाप्पा म्हणतो.. तथास्तू.. तेव्हापासून प्रत्येक महादेवाच्या पूजेत त्याचा मान पहिला.. त्याची आठवण प्रत्येक जण ठेवते.. पूजेच्या वेळेस त्याला शोधून घेऊन येते.. महादेवाच्या पिंडीवर विराजमान ते धोतऱ्याचे फुलं मानात, तोऱ्यात जगते.. आपल्याच धुंदीत, आनंदात असते..
एक एक करत सगळ्याच फुलांची पाळी येते.. कोणी रंग मागून घेते तर कोणी रूप, कोणी गंध मागून घेते तर कोणी प्रहर.. अबोली, मोगरा, जाई, जुई, शेवंती, सायली.. कधी स्त्रीच्या अम्बाड्यात, कधी गजऱ्यात, कधी वेण्यांत.. प्राजक्तासाठी कवीची लेखणी सळसळलेली.. गुलाबाचा तोरा थोडा वेगळा.. कधी कोटावर, कधी अम्बाड्यात तर कधी थेट कॉलेज च्या गेट बाहेर.. निशिगंध, रातराणी चा प्रहरच वेगळा.. कुंद, केवडा, चाफ्याचा दरवळच अनोखा.. थोडक्यात काय तर कोणी माणसाचे मन गंधाळते, कोणी वास, कोणी नजर सुखावते तर कोणी आस..
मग झाले काय? झाले काहीच नाही.. धोतऱ्याच्या फुलाला पाहिजे तो मान मिळाला.. कायम मिळत राहील..लिहावेसे वाटले ते एवढ्याच साठी, मनाला हुरहूर वाटली ती इतकीच..मान मिळवण्याच्या नादात त्याचे सामान्य फुलांसारखे मनमौजी आयुष्य जगायचे राहून नसेल न गेले..
हे आपलं उगाच.. म्हणजे हे काही पुराणात लिहिलेलं नाही बरं.. परिकथेतल्या कथा असतात तशी उगाच आपली एक काल्पनिक रूपक कथा.. या गोष्टीचा जर कुठे योगायोग आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment