लक्षात ठेवले तरच लक्षात राहील ना.. मग करणार ना सुरुवात नवीन वर्षात.. करणार ना पाठांतर..
हल्ली झालंय थोडं आमचं असं.. काय करणार.. आलाय ना मोबाईल मदतीला.. सगळ्या गोष्टी त्याच्यात भरलेल्या.. दिवसभरातली प्रत्येक गोष्ट त्याच्या भरवशावर.. परिवाराचे, मित्रांचे वाढदिवस, मावशींचे पैसे देणे, गॅस संपल्याची नोंद, बिल, EMI च्या तारखा, किराणा भाज्यांच्या याद्या, दिवसभराचे सगळे गणित त्याच्यात, जाता येता रिमाइंडर.. सोय आहे ना.. चांगली सोय आहे.. पण होतंय काय त्यामुळे आपल्या मेंदूचे काम कमी होईल का काय भिती वाटते.. ना काही पाठांतर, ना काही मेंदूला घोकणी.. असेच वागत राहिलं तर विस्मरण, विस्मृती आपल्या पिढीला लहान वयात घेरणार नाही ना.. याची भिती वाटते..
त्या काळी कुठे होते वाढदिवसांचे रिमाइंडर वगैरे? पण आमची सुमी ना चैत्री पुनवेची, शेजारचा गण्या ना माघी चतुर्थीचा असे करत करत सगळ्या खानदानाचे, गल्लीचे वाढदिवस लक्षात ठेवलेले.. पदराला गाठी मारून मारून घरातली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवलेली.. जात्यावरच्या ओव्या, प्रत्येक सणावाराला पारंपरिक लोकगीते ना कुठे लिहिलेली..पण चालीसकट तोंडपाठ.. असेल तर मेंदूत त्याची नोंद झालेली.. पाठांतरावर जोर जास्त.. नुसते पाढेच नाही तर पावकी, निमकी पासून अर्धे गणित मुखोद्गत.. संस्कृत श्लोकांचे पाठांतर करून करून कमावलेली जिव्हा.. वय झाले तरी या सगळ्या लक्षात ठेवण्याच्या सवयीमुळे त्यांची बुद्धी उतारवयात पण तल्लख राहत होती..
मागच्या वर्षापासून खूप घोळायला लागले हे विचार.. आणि ठरवले.. जितका शरीराचा व्यायाम महत्वाचा तितकाच मेंदूचा व्यायाम महत्वाचा.. पाठांतर करायचे.. लक्षात ठेवले तर लक्षात राहील ना.. जाणीवपूर्वक शिवतांडव पाठ करायला घेतले.. आणि जाणवले.. लहानपणी पाठांतर नकळत व्हायचे पण आता खूप वेळ लागत आहे.. पण तरी तो वेळ देऊन पाठांतर केले.. खूप फरक जाणवला.. उच्चार, वाणी, शब्दफेक या प्रत्येकात हळूहळू होत जाणारा बदल मला प्रोफेशनल कामांमध्ये पण फायद्याचा ठरेल असे जाणवू लागले.. आत्मविश्वास, खंबीरपणा वाढत जाताना दिसला.. हे सगळे बदल पाठांतर आणि संस्कृत भाषेच्या पाठबळामुळे झाले..
आज हे सगळे व्यक्त व्हायचे कारण.. २०२० चे एक रिसोल्युशन होते.. पाठांतर करणे.. त्यामागची कारणे, विचार आज मांडावा वाटला वर्ष संपताना.. विस्मृती ला जाणीवपूर्वक लांब ठेऊया.. शरीरासोबत बुद्धीचा जाणीवपूर्वक व्यायाम करूया.. पाठांतर करूया.. उजळणी करूया.. मोबाईल च्या सोबत बुद्धीला पण रिमाइंडर लावूया..
पटलं तर हो म्हणा.. सुरुवात करा.. लक्षात ठेवले तर लक्षात राहील ना.. मग करणार ना सुरवात नवीन वर्षात.. करणार ना पाठांतर..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment