Wednesday, December 16, 2020

डोह

खोल मनाच्या तळाशी.. नेमके काय काय आणि किती किती.. नाही सांगता येत.. व्यक्त आणि अव्यक्त यांच्या सीमारेषेवर.. कायम ओथंबून बसलेली प्रत्येक व्यक्ती..
भीती वाटते आजकाल.. प्रत्येक गोष्टीची.. बोललेल्या प्रत्येक वाक्याची.. ऐकलेल्या प्रत्येक वाक्याची.. हे वाक्य कधी कोणापर्यंत आणि कसे पोहचेल? सांगता येत नाही.. 

एक लेखक कागदावर मुद्देसूद लिहितो.. अचूक.. नेमके.. प्रत्येकाला ते प्रत्येक वाक्य कळते अगदी अचूक.. नेमके.. पण मग त्या मागचे विचार मंथन, उलाढाल समजत असेल का? माहित नाही.. त्या डोहाच्या तळाशी कोणी पोचू शकेल का कधी? माहित नाही.. एक लेखक जेवढ्या ताकदीने लिहितो, तेवढ्याच ताकदीने मुद्देसूद बोलू शकतो का? खऱ्या आयुष्यात व्यक्त होऊ शकतो का? माहित नाही.. 

रडावे एकट्याने.. डोळ्याची चुरचुर होईपर्यंत.. डोक्यात मुंग्या येईपर्यंत.  प्रत्येक लिखाण लिहिताना भिजवावे कागद अश्रूंनी जर लेखक असेल तर.. भरावेत चित्रात रंग जर चित्रकार असेल तर.. आलाप घ्यावा जर गाणार असेल तर..   आणि मग मोकळे व्हावे.. परत जगासमोर एक हसरा चेहरा घेऊन.. जर कुठली कला अंगात असेल तर मोकळे व्हावे त्या कलेला कुशीत घेऊन.. आणि नसेलच कुठली कला तर निदान खोटे हसत राहण्याची तरी कला असावी अंगात.. 

आपला डोह आपल्या जवळच ठेवावा.. खोल आत.. आणि वरती वाहू द्यावे, संथ वाहणारे पाणी.. स्वच्छ, शांत, प्रवाही.. या डोहाच्या तळाशी असलेली साठवण कोणासमोर उलगडण्याचा प्रयत्न केला तर फक्त चिवडला जातो डोह आणि सगळे पाणी गढूळ होऊन जाते.. ना ती साठवण समोरच्या पर्यंत पोहोचते, ना आपल्या मनाचा दाह कमी होतो.. फक्त तो डोह शांत होऊन परत वरती पाणी वाहू लागे पर्यंत आपल्यालाच त्याची आंदोलने झेलत राहावे लागते.. 

या डोहात उतरण्याची हिम्मत असावी आपल्यात.. आपले आपण कुठलाही, कोणाचाही आधार न घेता त्यातून परत बाहेर येऊन, काठावरती पाय सोडून बसण्याची पण ताकद असावी आपल्यात.. ही ताकद ज्या दिवशी अंगात येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर तेज येईल.. तोपर्यंत आहेतच कागदी मुखवटे.. 

-- अवनी गोखले टेकाळे


1 comment:

  1. Pan agga assamhantat na
    Dukh baat ne se kam hota hai
    Aur khushiya baatne se badh ti hai....



    Par




    Aap ko vo vyakti pata hona chahiye baaas

    ReplyDelete