एक संध्याकाळ.. निवांत रेंगाळलेली.. संथ शांत .. आरामात पहुडलेली.. घराचे अंगण.. डोलणारी फुलझाडे अंगणात.. गंधाळलेली झाडे.. जुई, मोगरा, स्वस्तिक, पारिजातक, कण्हेर, गुलाब.. पाऊस मगाशी पडून गेलेला.. त्यामुळे मृदगंध दरवाळलेला.. पण आकाश निरभ्र..त्या श्रावण सरींमुळे मनावरचे मळभ दूर होऊन निरभ्र मन.. शांत निर्विकार.. फक्त भोवतालच्या अस्तित्वाचा गंध घेणारे मन.. संध्याछायांचा मागोवा घेणारे मन.. गंध प्रहराचे.. वेळ - सायंकाळ, कातरवेळ, सांजवेळ..
या संध्याकाळी एकच काम.. आकाशात उधळलेल्या रंगासोबत हरवत जाणे.. वाट फुटेल तिकडे.. वाहू द्यावे मनाला मुक्तछंदात.. आकाशात पसरलेला नीलिमा आणि त्यात हळूच डोकावणारा केशराचा रंग.. हळूहळू केशराचे अस्तित्व वाढत चाललेले.. ढगांचे पुंजके तरंगत लहरत जाणारे.. त्यासोबत आपले मनही.. कधी त्या ढगांचे वेगवेगळे आकार तयार होतात.. नजरेसमोरचा ढग कुठला आकार घेऊ पाहत आहे ही कल्पनाशक्ती करत मन त्या आकारावर आरूढ..
अशावेळी मन क्षणात आनंदित होते.. क्षणात उदास होऊ शकते.. कधी ते हसते.. कधी दोन भरलेल्या घागरी.. हे सगळे मनाचे हिंदोळे त्रयस्थ बघणारे आपणच.. त्याला जसे व्यक्त व्हायचे तसे होऊ द्यावे.. जे आठवायचे ते आठवू द्यावे.. स्मरणशक्ती तयार झाल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत काहीही आठवू शकते.. ते उठणारे तरंग.. अशावेळी एकटेच त्या भरती ओहोटीच्या लाटांवर स्वार होऊन आपण थिजलेले..
मनात कुठलेही गाणे रेंगाळू शकते अशा वेळी.. म्हणजे संध्याकाळ आहे म्हणून "संधीकाली या अशा" हेच गाणे आठवले पाहिजे अशा बंधनात नसलेले मन.. कुठली तार छेडून कुठले गाणे ओठी येईल सांगता येत नाही.. ते येऊ द्यावे.. अशावेळी ताल सूर लय यामध्ये बसत नसलेला आपला आवाज पण गोडच आहे असे समजून गाता रहे मेरा दिल.. चालू ठेवावे.. अशा वेळी जगात सगळ्यात जास्त मिस करतेय ती माझी गिटार.. असती तर चुकत माकत का होईना जेवढे आठवेल तेवढे "एक हसीना थी" वाजवलं असतं.. ही गिटार एक अशी वस्तू आहे की जी कित्येक वर्ष घराच्या कोपऱ्यात धूळ खात होती.. पण आत्ता ती सोबत नाहीये.. आणि तिची रोज आठवण येतेय..
पांढऱ्या रंगाचा एक पक्षी आकाशात पसरलेल्या केशराच्या रंगाचे त्याचे बूड.. हा कुठला पक्षी नाव गाव त्याचे माहित नाही.. पण कित्त्येक वेळ गच्चीच्या कठड्यावर विसावलेला तो.. आणि त्याच्याकडे बघणारी मी.. कितीतरी पक्षी आपल्या घराकडे जाणारे.. त्यातला हा एक थबकलेला.. माझ्याच लिहिलेल्या एका कवितेची ओळ मला आठवलेली..
सायंकाळी क्षितिजापार,
निघाला पाखरांचा थवा..
थबकला माझ्या तरूवर,
नकळत एक चुकार रावा..
दूर राऊळ, नदी पार,
कुणी झंकारे मारवा.. !!
खरं तर अशा निवांत संध्याकाळी गाणी ऐकावीत, गप्पा माराव्यात, सोबत दही चिवडा घेऊन बसावे.. चमचा वगैरे न घेता सरळ हात बुडवून चिवडा खावा.. किंवा फिरायला जावे, एखादे वाद्य वाजवावे, एखादे छान पुस्तक हातात घेऊन दुसऱ्या हातात कॉफी चा मग घेऊन रेंगाळत पुस्तक वाचावे.. पण आज असे वाटले यातले काहीच न करता नुसते स्वतः मध्ये हरवून जाणे आणि आकाशाकडे बघत राहणे हे पण करावे कधीतरी ..
वाचणाऱ्याला वाटेल यात काय विशेष.. पण खरं सांगू, मुंबई मध्ये सकाळी डोळे उघडतात आणि मग मध्यरात्र येते.. यामध्ये काय घडत ते अनुभव घ्यायला वेळ होत नाही.. संध्याकाळ कित्येक वर्षांनी अनुभवायला मिळाली.. गेली कित्येक वर्षात सूर्यास्त अनुभवला नव्हताच.. इतके रेंगाळून कधी बसायला नव्हतेच जमले.. गावाकडच्या वातावरणात एक रेंगाळलेली संध्याकाळ.. अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत तसे अधेमध्ये आकाशाकडे बघणे, दिवसरात्रींचा हा फेरा अनुभवणे ही पण एक मूलभूत गरज असायला हवी होती.. दुर्दैव हेच की ही संध्याकाळ मला भेटायला लॉकडाऊन यायला लागला..
आता गंध प्रहराचे मध्ये काही विशेष सांगण्यासारखे नाही.. ताऱ्यांच्या आणि पंचमी च्या चंद्रकलेत हळूहळू सांज विरत गेली.. केशराचा रंग विरत मग तो जांभळा झाला आणि मग काळभोर.. परत कातरवेळ.. हुरहूर.. हे लॉकडाऊन म्हणजे एका भयाण रात्रीची सुरुवात तर नाही असे विचार घोंगावायला लागल्यावर गच्चीतून काढता पाय घेतला..बहकत जाणाऱ्या मनाला परत एकदा आकसून अंगाभोवती लपेटून टाकलं आणि जिना उतरताना त्याला गुंतवून टाकलं एका स्त्री सुलभ प्रश्नात.. आज जेवणात काय?
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment