Friday, August 14, 2020

गंध प्रहराचे ५ - पहाट

कॉलेज चे दिवस.. रात्री २-३ पर्यंत night मारून अभ्यास केलेला.. तरी सुद्धा झोपताना ४ चा लावलेला अलार्म.. कुडकुडत उठून अंधारात तयार झालेल्या आम्ही मैत्रिणी - मी, केतकी, नेहा.. तळ्यातल्या गणपती ने आठवण काढलेली.. फक्त आमचीच नाही बरं.. पुण्यातल्या समस्त तरुणाईची.. एकाच दिवशी.. एकाच वेळी.. 

गंध प्रहराचे - दिवाळी पहाट - दीपोत्सव.. 
स्थळ - तळ्यातला गणपती.. 

शाळेत असताना दिवाळी पहाट फटाके उडवण्यात जायची.. पहिला फटाका गल्लीत कोण उडवणार याची रेणुका स्वरूप च्या गल्लीत लागलेली चुरस.. आणि मग शेवटी सोबतचे सगळे फटाके उडवून संपल्यावर सगळे बिनवातीचे फटाके एका खोक्यात एकत्र करायचे आणि त्या खोक्याला काडी लावून तडतड वाजल्यावर पळून जायचे घरी.. फटाक्यांनी प्रदूषणात भर न पडण्याचा सुंदर काळ होता तो.. पण मग हळूहळू पंख फुटले.. कॉलेज मध्ये गेलो आणि मग दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमात बदल झाला.. अंगाला पिसं लावून तरंगायचेच दिवस होते ते.. त्यामुळे दिवाळी पहाटे ला साद घालू लागला तळ्यातला गणपती..  

आमच्यासारख्या निशाचर मुलांना भल्या पहाटे जागे करायचे सामर्थ्य फक्त सारसबागेचे.. पूर्ण सारसबागेत लखलखाट पणत्यांचा.. अंधकारावर पणतीच्या प्रकाशाची केलेली मात.. वेगवेगळे आकार केलेले पणत्या लावून.. मंदिराच्या भोवतालच्या परिसरात, लॉन वर, पायऱ्यांवर नजर जाईल तिकडे.. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया.. झळाळती कोटी ज्योती.. 

या दिवशी समस्त पुण्यातील तरुणाई नटून थटून.. झब्बे कुडते घालून.. पंजाबी ड्रेस, साड्या घालून.. आवरून सावरून ब्राह्ममुहूर्तावर हजर..सारसबागेचा गणपती.. तिथे दीपोत्सव.. म्हणजे घरचे कार्य.. जायला लागतंय.. आमंत्रण दरवर्षी.. स्वतःचे स्वतःला.. हळूहळू अंधाराचे साम्राज्य कमी होऊन थोडा थोडा गंध पहाटेचा.. हळूहळू तळ्यातल्या कमळाचे डोळे उघडायला लागलेले.. 

इथली खासियत म्हणजे ज्यांच्या सोबत परिसरात शिरलो, त्यांच्याच सोबत बाहेर येऊ असे काही निश्चित नाही.. गर्दी प्रचंड.. त्यामुळे सोबतचे हमखास चुकामुक होणार.. आणि अनपेक्षित कोणीही समोर येणार.. शाळेतले, कॉलेज मधले, सख्खे मित्र, चुलत मित्र, शेजारी, घरगुती मित्र जसे की - आजीच्या मैत्रिणीची नात, आजोबांच्या मित्राचा नातू, आईबाबांच्या मित्रांची मुले, ताई दादांचे मित्र.. कोणीही.. आणि मग जोरात लांबून हाका.. वर्षभराच्या गप्पा.. आणि एक फालतूचा प्रश्न.. अरे, तू कशी काय इथे? दरवर्षी येते का? भेटू मग.. पुढच्या वर्षी..  जाता जाता फोटो.. आपला त्यांच्यासोबत नाही बरं का.. ते आलेले असतात त्यांच्या ग्रुप सोबत.. त्यांच्या ग्रुप चा फोटो काढायला ते शोधतच असतात कोणाला तरी.. आपण अनायसे समोर आलेले असतो त्यामुळे जाता जाता मग अग एक फोटो काढ की आमचा म्हणून स्वतःचा एक फोटो काढून घेतात आपल्याकडून..

मग थोडेसे उजाडले की तिथेच सार्वजनिक गाण्याचा कार्यक्रम.. तो ऐकायला लागतोय.. शास्त्र असतं ते.. शास्त्रीय संगीत आपल्यालाच कळते जगात अशा प्रकारे समस्त तरुणाई तिथे ठाण मांडून दाद द्यायला हजर.. त्यातली एक दाद गाण्याला.. आणि दुसरी दाद मनातल्या मनात.. अचानक दिसलेल्या कोणालातरी.. 

हे सगळे सोपस्कार होईपर्यंत सूर्योदय होतोच.. मग काय झालं तर.. मंदिरात गणपती चे दर्शन घ्यायचे.. पुढच्या वर्षीचे आमंत्रण घ्यायचे.. गंध प्रहराचे मधली दिवाळी पहाट साजरी होते.. आणि समस्त तरुणाई घरी रवाना होते.. दह्यात बुडवून चकली खायला.. 

-- अवनी गोखले टेकाळे 



No comments:

Post a Comment