शुभांगी ने एक हळवा कोपरा उलगडला आणि मला पण एक आजी आजोबांची हळवी आठवण share करावीशी वाटली.. नातेसंबंध कसे सुंदर, नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात ते दाखवणारी..
माझ्या आजोबांची पहिली मुलगी आणि बायको गेल्यावर आजोबांचे दुसरे लग्न झाले माझ्या आजीशी..भाऊबीजेच्या दिवशी आजोबांच्या पहिल्या बायकोचा भाऊ आजीसमोर येऊन बसला.. "खूप आठवण आली ताईची.. का पावले वळली माहित नाही पण इथे आलो.. ओवाळशील का मला.." इतके सहज.. इतके सोपे असते नाते जपणे.. नात्यांची वीण जितकी उकलू तितकी ती घट्ट बसते.. पाटावर नवऱ्याच्या आधीच्या बायकोचा भाऊ बसलेला ओवाळणी घेऊन.. आणि निरंजन मंद तेवत होते.. समाधानाने..
यानंतर मला आठवते तेवढे हे "मामा आजोबा(काळे)" नेहमी घरी यायचे..
*************
आजीचे विचार वेगळेच होते थोडे.. तिनी कधी वड पुजला नाही लग्न झाल्यास.. ती म्हणायची.. त्यांच्या आधीच्या बायकोने काही वर्ष वड पुजला होताच की मग पुढच्या सात जन्मात आम्ही दोघी देवाला कशाला कोड्यात पाडत राहू.. संसाराच्या सारीपाटावर सगळे डाव खेळून खेळ रंगवलेल्या आजीने शेवटचे दान ठेवले होते "तिच्यासाठी"..
*************
आजीने कधी डोक्यात गजरा घातला नाही.. तिला विचारायचे मी का ग असे? तर म्हणायची मी मॅट्रिक ला शिकत असताना एक मुलगा होता सोबत.. सगळे चांगले झाले असते तर लग्न केले असते आम्ही पण त्या आधी तो वारला.. तेव्हापासून मी फुलं घालायची सोडून दिली.. आजोबांना सांगितलं लग्न ठरल्यावर तुझ्या.. तेवढी फुलं डोक्यात घालायला सांगू नका.. बाकी सगळे तुमचे..
***********
माझा काही पुनर्जन्मावर विश्वास नाही.. पण तरी वाटते हे सगळे ऐकल्यावर.. देवाने वरती नमूद केलेल्या सगळ्या व्यक्तींना पुनर्जन्म द्यावा.. बाकी त्यांच्या पुढे कशा जोड्या लावाव्या हे शेवटी देवाच्या हातात.. ज्याचे काम त्याला करू द्यावे.. बाकी काय बोलू.. थांबते आता.. डोळ्यांना दिसेना जास्त काही लिहायला.. शुभांगी च्या पोस्ट नी फारच जुने काहीतरी आठवले.. जसे आठवले तसे लिहिले..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment