प्रकर्षाने जाणवलं एक दिवस. मी मराठी वाचते. खूप वाचते. पण हिंदी काहीच वाचले नाही. फक्त बोलते ते पण कामचलाऊ. ऑफिस च्या निमित्ताने एक मैत्रीण मिळाली ती टिपिकल लखनवी हिंदी बोलणारी. तिच्यामुळे हिंदी ची भाषा म्हणून आवड निर्माण झाली आणि मग काय आवड निर्माण झाली की सवड मिळतेच. तिने खरं तर प्रेमचंद पासून सुरवात करायला सांगितली होती पण सगळ्यात पहिले हातात पडलं ते हे - मधुशाला. काही पुस्तकं आपण एकदाच वाचतो. काही पुस्तकांची पारायणं होतात, प्रत्येक वेळी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, भावनेच्या प्रत्येक हिंदोळ्यावर ज्याचा नवीन अर्थ समजतो. हे पुस्तक दुसऱ्या प्रकारातले. त्यामुळे विकत घेऊन संग्रही ठेवावे असे.
या पुस्तकामुळे हरिवंशराय बच्चन हे मोठे नाव वाचायला मिळाले. कवीसंमेलनांचा मुकुटमणी म्हणजे मधुशाला. मधुशाला म्हणजे दारू असे म्हणणार्यांना मधुशाला वाचून समजलीच नाही. हिंदीवर प्रेम करायला लावते ती मधुशाला. निसर्गावर प्रेम करायला लावते ती मधुशाला. जगण्यावर आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवते ती मधुशाला. जगात जे जे सुंदर, जे जे अटळ ते ते सर्व मधुशाला. "पाठक गण है पिनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला" असे स्वतःच्या पुस्तकाचे केलेले वर्णन म्हणजे मधुशाला. जातीभेद, वर्णभेद यांवर केलेले भाष्य म्हणजे मधुशाला. निसर्ग, जन्म, मृत्यू, यमदेव, अंत्ययात्रा, प्रेम, विरह, अंधार, गायक, वादक, चित्रकार, भारतदेश, ऋषीमुनी, स्वतःचे आयुष्य सगळीच मधुशाला. आपल्या मृत्यूनंतर लोकांनी आपले वर्णन करावे तर एवढे आणि एवढेच - "कहना सच्ची मधुशाला".
प्रत्येक कडवे भरभरून समीक्षण करावे असे. पण सगळे मी लिहिले तर तुम्ही वाचणार ते काय. म्हणून इथे थांबते. श्रावण चालू होतोच आहे तर जाता जाता प्रसन्न करून जाणाऱ्या, वर्षा ऋतूचे वर्णन करणाऱ्या या मधुशाला मधल्या काही ओळी तुमच्यासाठी-
सूर्य बने मधू का विक्रेता, सिंधू बने जल घट हाला
बादल बन बन आये साकी, भूमी बने मधू का प्याला
झडी लगाकर बरसे मदिरा, रिमझिम रिमझिम रिमझिम कर
बेली, विपट तृण बन मैं पिऊ, "वर्षा ऋतू" हो मधुशाला ..
शब्दांकन - अवनी गोखले टेकाळे
मधुशालेचा खूप सुंदर परिचय परिचय..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन आशय गवसणा-या कलाकृती पैकी एक!
ReplyDeleteही आशयघनता आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध करणारी असते..!✍👌👌