Wednesday, June 10, 2020

या धिरड्यांवर शतदा प्रेम करावे..

गरम गरम कुरकुरीत धिरडे तव्यावरचे डायरेक्ट पानात आणि थेट पोटात त्याच्या सोबत ओल्या नारळाची चटणी यासारखा चविष्ट नाश्ता दुसरा कुठला असेल.. म्हणजे महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये पोह्याला तोड नाहीच पण तरी धिरडे ते धिरडे.. 

पातळसर पीठ तव्यावर पसरून थोड्या तेलावर उलटे पालटे खरपूस होऊ द्यायचे.. एवढेच काय ते.. पण त्याच्यात तऱ्हा किती.. प्रत्येक प्रांतातले धिरडे वेगळ्या चवीचे.. पीठ भिजवायची पद्धत वेगळी, प्रमाण वेगळे.. कोकणात ते घावन, आंबोळी, पोळे अशा नावाने नटते.. तर बाकी महाराष्ट्रात ते धिरडी म्हणून समोर येते.. शहरी भागात टोमॅटो ऑम्लेट, vegetable ऑम्लेट नावाने पोषाखी रूप घेते..  याचेच भाऊबंद साऊथ इंडिया मध्ये फारच नावारूपाला आले.. उत्तप्पे, डोसे, पिसरट्टु वगैरे..  अश्याच वेगवेगळ्या प्रकारांची झटपट आठवण या ब्लॉग मध्ये थोडक्यात कृती सहित.. 

कोंकणी घावन म्हणजे फक्त तांदूळ.. त्यात काही डाळींची भेसळ नाही.. हे तांदूळ रात्री भिजवून ठेवायचे..  सकाळी मिक्सर ला काढून मीठ घालून सैलसर पीठ तयार करायचे.. या घावनासोबत ओल्या नारळाची, कोथिंबीर भरपूर घालून केलेली हिरवीगार चटणी अत्यावश्यक.. याला दोन जुळी भावंडं घावन घाटलं आणि दूध गूळ घावन.. यापैकी घावन तेच आधी म्हणलं तसं.. पण तोंडी लावणं वेगळं.. घाटलं म्हणजे तांदुळाचे पीठ, दूध शिजवून केलेले तोंडीलावणे.. आणि दूध गूळ घावन मध्ये दुधात गूळ घालून मुरू द्यायचा.. एकजीव झाल्यावर थोडी विलायची किंवा जायफळ.. आणि हे घ्यायचे तोंडी लावायला.. 

याच घावनाचे भाऊ म्हणजे ताकातले पोळे आणि काकडीचे घावन.. ताकातले पोळे मध्ये तांदूळ ताकात भिजवून ठेवायचे बाकी कृती तीच.. आणि काकडीचे घावन मध्ये बाकी कृती साध्या घावन चीच पण पीठ सैलसर केल्यावर त्यात किसलेली काकडी आणि गूळ घालायचा.. हे तर एकदम पॅन केक सारखे लागते आणि काकडीचा अजिबात उग्र वास येत नाही.. 

आंबोळी चे पीठ दळून आणू शकतो ज्यात तांदूळ, ज्वारी, गहू, सगळ्या डाळी, मेथ्या, लाल मिरची न भाजता प्रमाणात दळून आणायचे आणि मग आयत्या वेळी फक्त मीठ घालून पातळ करून आंबोळ्या करायच्या.. किंवा हे सगळे डोश्यासारखे भिजत घालून पण आंबोळी करता येते.. मेथ्या मुळे आंबूस चव येते म्हणून आंबोळी म्हणत असावेत बहुतेक.. 

तसे नाचणीची धिरडी आधीपासून खातातच नाचणीच्या पिठापासून बनवलेली पण हल्ली त्याच्या "ragi dose" नावानी dietician लोकांमध्ये त्याची जास्त उठबस झाली आहे.. 

मुगाची धिरडी किंवा पिसरट्टू डोसे यामध्ये भिजवलेले मूग आणि तांदूळ एकत्र वापरतात.. या धिरड्यांना सुंदर हिरवा रंग येतो.. असाच हिरवा रंग पालक/मेथी घालून पण येतो.. यात फक्त पालेभाजी आयत्यावेळी पिठात मिक्सर ला फिरवून घालायची.. 

बेसन आणि तांदुळाचे पीठ आयत्या वेळी कालवून त्यात कांदा, टोमॅटो घातला की टोमॅटो ऑम्लेट होते.. मी यामध्ये एक variation करून पाहिले.. रात्री एक भाग तांदूळाला अर्धा भाग चणा डाळ आणि एक चमचा मेथीदाणे असे भिजत घातले.. सकाळी सगळे मिक्सर मधून काढले.. त्यामध्येच टोमॅटो, मिरची, आलं फिरवून घातलं.. या ऑम्लेट चा सुंदर गुलाबी रंग आला होता.. असेच vegetable ऑम्लेट साठी सगळ्या भाज्या चिरून पिठात घालू शकतो..
 
जसे कोंकणी लोकं घावन घाटलं करतात तसेच मराठवाड्यात नुसत्या गव्हाच्या पिठाची(कणकेची) धिरडी आणि आळण करतात.. आळण म्हणजे घाटलं सारखंच फक्त कणकेचे.. किंवा नुसत्या ज्वारीच्या पिठाची धिरडी पण छान लागतात.. 

आता नंबर लागतो तो मिश्र पिठाची धिरडी.. या मध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी सगळ्याची पीठ मिक्स करायची.. थोडे बेसन घालायचे.. 

घारगे हा लाल भोपळ्याचा प्रकार.. हेच घारग्यांचे पीठ सैलसर करून धिरडी घातली की छान लाल भोपळ्याची धिरडी तयार होतात.. किसलेले बीट घालून किंवा गाजर घालून पण छान लाल धिरडी करता येतात.. 

आता नंबर शिळ्या भाताची धिरडी.. यामध्ये ताक किंवा पाणी घालून मिक्सर ला पातळसर फिरवावे.. याची तर मस्त जाळीदार धिरडी होतात.. फक्त भात शिळा आहे हे गुपित तुमच्या पुरत ठेवा.. याच प्रकारे खपत नसलेल्या कुठल्याही भाज्यांची थालीपीठाप्रमाणे धिरड्यात पण जागा सामावता येते.. वरण भात पण खाऊन खाऊन कंटाळा आला तर फिरवा मिक्सर ला जिरे, मीठ, मिरची आणि पातळसर करून घाला वरण भाताची धिरडी..

पिझ्झा धिरडे/पावभाजी धिरडे.. हा एक फार अफलातून प्रकार आहे.. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, बीट असतील त्या भाज्या थोड्या तेलावर तिखट, मीठ घालून परतून घ्यायच्या.. तुमच्या आवडीचे कुठल्याही प्रकारचे धिरडे करायचे.. ते तव्यावर घालून खालच्या बाजूने खरपूस होत आले की वरून त्याला टोमॅटो सॉस लावायचा.. त्या सॉस वर केलेली भाजी पसरायची.. आणि थोडे तेल कडेने सोडून फक्त खालच्या बाजूने पूर्ण खरपूस होऊ द्यायचे आणि पलटी न मारता डायरेक्ट पानात वाढायचे.. 

उपासाची भाजणी, मीठ, जिरे, मिरची, आलं सगळे एकत्र करून सुरबुरीत करावे.. उपासाची धिरडी पण करता येतात.. सोबत शेंगदाण्याची दह्यातली उपासाची चटणी किंवा लिंबू लोणचे उपासाचे.. 

बाकी या कुठल्याही प्रकारच्या धिरड्यात मीठ, मिरची, जिरे, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर यांचा चवीप्रमाणे वापर करून तिखट धिरडी बनवूच शकतो.. पण जर या सगळ्याची फोडणी करून पिठात घातली तर चव तर खमंग येतेच पण धिरडी तव्याला चिकटत नाहीत.. 

धिरड्यांचे प्रकार जितके वेगळे तितकीच तोंडी लावणी पण वेगवेगळी.. ओल्या नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, चिंचेची चटणी, डाळीची चटणी, टोमॅटो चटणी, दह्यात भिजवलेली चटणी, आळण, घाटले, दूध गूळ हे तर आहेतच.. काहीच नाही तर सॉस, लोणचे पण काम भागवते.. पण आंब्याच्या दिवसात खास रसासोबत घावन/गव्हाची धिरडी/तिखट मिठाची धिरडी खाण्याची मजा अजून वेगळी.. तर काही लोकांना non veg रस्से सुद्धा धिरड्यासोबत/घावन सोबत आवडतात.. 

आता येतात धिरड्याचे चुलत भाऊ.. साऊथ इंडियन संस्कृतीतील उत्तप्पे, डोसे, नीर डोसे, रवा डोसे, परत डोश्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार.. थोडक्यात काय धान्य, डाळी भिजवत रहा.. भरडत रहा.. आणि खात रहा प्रत्येक वेळी वेगळ्या चवीचे .. 
  
धिरड्यांवर शतदा प्रेम करणारी अवनी गोखले टेकाळे 

मी पण अगदी अस्सेच धिरडे करते म्हणून हा लेख स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न करू नये.. किंवा मूळ लिखाणात कुठलाही बदल लेखकाच्या परवानगी शिवाय करू नये.. साहित्यचोरी हा लक्षणीय गुन्हा आहे आणि या गुन्ह्यात स्वतःला नकळत अडकवू नका.. 
माझ्या केलेल्या एका पण धिरड्याचा फोटो काढलेला नाही कारण ते तव्यावरून पानात आणि डायरेक्ट पोटात स्वाहा होते.. पण हे सगळे प्रकार चवीला चांगले होतात याची खात्री बाळगून करून बघायला हरकत नाही.. कुठेही अडल्यास अवश्य विचारा.. तुम्ही काही वेगळे करत असाल तर comments मध्ये नक्की सुचवा.. आणि आयते खावे वाटले तर कधी पण घरी या.. अवनी गोखले टेकाळे!!!

3 comments: