Friday, June 14, 2019

अम्बलोंड नव जुन ...!!!



पुण्यातून लग्न करून मराठवाड्यात आल्यावर बऱ्याच नवीन पदार्थांची ओळख झाली .. किंवा माहित असलेल्या पदार्थांची नवीन नाव कळली .. सुरवातीला तर मजाच यायची एक एक नवीन ऐकून .. दिलपसंद  काय.. माणिक पैंजण काय.. डुबुक वडी काय..

असाच एक नावीन पदार्थ महालक्ष्म्या च्या वेळेला खाल्ला.. स्मिताकाकूंनी केलेला .. अम्बलोंड नव जुन...!!! अम्बलोंड म्हणजे कणकीचा कोंडा आणि हरबरयाच्या डाळीपासून बनणारे खुस्खुशीत cutlets..

नंतर विचार करताना असे जाणवले कि हा नुसता पदार्थ नाही एक चांगली concept आहे .. आपल्या day to day मध्ये सतत काहीतरी नवीन आणि काहीतरी जुने एकत्र  येत असते.. रोजच्या दिवसाला आलेल्या अनुभवातून आपण बदलत असतो .. भेगाळलेल्या मातीवर पाउस पडला कि जशी ती नव्याने तरारते... जुने छंद जपतानाच नवीन छंद जडतात .. जुन्या मित्र, नात्यांबरोबरच नवीन नाती पण दृढ होत जातात  .. लग्नानंतर एक मुलगी अशीच बदलते .. माहेरच्या आठवाणीतून हळवी होत जाणारी ती सासरमध्ये नकळत रमते, गुरफटते .. ही recipe मी माझ्या आयुष्याला relate करून बघितली .. आणि तयार झाल एक खमंग अम्बलोंड .. !!


कुठे कालचेच स्वप्न आज मळलेली वाट

आजच्या प्रवाहाखाली कालचाच घाट !

कालचे चांदणे शीतल आता कोवळेसे ऊन

असे हे खमंग अम्बलोंड नव जुन...!!!


कुठे कालचीच उर्वी आजचा वळीव सुगंध

कुठे कोवळी पालवी कुठे वट एकसंध !

दोघांवाचून घरट्यात पाखरू सुन् सुन्

असे हे खमंग अम्बलोंड नव जुन्...!!


मना घातलेली आज हळवेली साद

ते मुक्त स्वच्छंद पुण्यातील श्वास !

तालात मिसळले सुरेल ते नाद

ते दृढ भावबंध लातूरचे ध्यास !

दोघांवाचून अपूर्ण ही लेक आणि सून

असे हे खमंग अम्बलोंड नव जुन !!!


1 comment: