कधीच एका team मध्ये काम न करता आम्ही एका lunch group मध्ये कधी आलो आणि पुढे जाऊन कधी बाहेर कट्टा टाकायला भेटायला लागलो, आठवत पण नाही आता. दहा वर्ष सोबत आहोत एवढं खरं. तोंड भरून हसताना मनात साठवलेली वेदना जेव्हा न सांगता समोरच्याला समजते तिकडे corporate life मधल्या politics च्या पलीकडे जाऊन एका निखळ मैत्रीची सुरुवात होते.
दोघी एकारांत. एक गोखले, एक भावें. मुळात दोघींची तोंड फटकळ. गरजेपेक्षा जास्त स्पष्ट आणि परखड. आहे ते आहे, नाही ते नाही. उगाच कारण नसताना कोणाची मखलाशी करणं कधी तत्वात बसलं नाही, इथून पुढे जमावं याची आता गरज वाटत नाही. इमानदारीने घरचं, बाहेरचं काम करत रहायचं बाकी जे होईल ते रामभरोसे. दोघींचा हाच स्वभाव. काल ज्यावर रडलो त्यावरच आज पोट धरून हसायचं. आहे ते, आहे तसं स्वीकारत, न थांबता सतत पुढे चालत राहायचं.
वाटेल त्या विषयावर तितक्याच बिनधास्त पणाने कितीही वेळ बोलू शकणाऱ्या आम्ही दोघी. शाळा, कॉलेज, माहेरच्या आठवणी, सासरच्या गोष्टी, ट्रेन, traffic, मनातल्या सलणाऱ्या गोष्टी, fashion trend, shopping. थोडक्यात ऑफिस सोडून सगळे. काहीपण. कधीपण. कुठेपण. भेटलो तर पाठोपाठ नाहीतर बरेच दिवसात गाठभेट होत नाहीं. पण भेटल्या क्षणापासून बडबड सुरुवात. कधीच आता काय बोलायचं हा प्रश्न पडत नाही
.
काही वेडे लोकं आहेत अजून पण, ज्यांना पेपर मधले सुडोकू, शब्दकोडे सोडवायला आवडते. ज्यांना mall सोबतच ideal book store, शिवाजी पार्क, चौपाटी अशा ठिकाणी वेळ घालवायला जास्त आवडते. त्यांच्यासोबत मैत्री तर टिकून राहतेच, पुढे जाऊन त्यांच्या मुलांची पण मैत्री होते. एखाद्या निवांत रविवार संध्याकाळी मुलांना गिरगाव चौपाटीवर वाळूत किल्ला करायला सोडून सूर्य अस्ताला जाऊन अंधार पडेपर्यंत समुद्राकडे पहात वाटेल त्या विषयांवर गप्पा मारत बसणे यासारखे सुख नाही.
ज्या corporate life नी कामापलीकडे जाऊन कायम साठी एका प्रसन्न व्यक्तीची भेट घडवली, त्याला पहिल्या माळेचे नमन.
❤️ खूप छान
ReplyDelete