कसं आहे. एका रात्रीत जागून चार ऑपरेशन करून लाखभर रुपये पाकिटात गोळा करायची ताकद फक्त डॉक्टर कडेच असते. हे पक्के माहीत असते आपल्याला. यात त्याचा दुस्वास करण्यासारखे काही नाही महाराज. ही त्याची बुध्दी, कॉलेज मध्ये मरमर रात्री जागून केलेले अभ्यास, intern म्हणून रात्र रात्र जागून केलेली duty, स्वतःचे हॉस्पिटल उभे करायला केलेली दिवस रात्र धडपड हे सगळेच असते हो. आमची काकू चांगल्या ड्रेस वरच झोपायची कायम. रात्रीत अवघडलेल्या पेशंट चा फोन आला की लगेच तोंडावर पाणी मारून पाचव्या मिनिटाला ती बाईच्या शेजारी हजर असायची. असतील ना, शंभरातले चार गैरफायदा घेणारे डॉक्टर असतील सुध्धा. पण मग तसे तांदुळातले खडे प्रत्येक प्रोफेशन मध्ये असतातच की.
डॉक्टर फक्त पेशंट तपासणारे नसतात. आपापल्या विषयात सखोल अभ्यास केलेले डॉक्टरेट झालेले लोक पण असतात. यांच्याबद्दल पण उगाच टवाळ्या करणारे लोक सापडतात. का पण. म्हणजे आपला उत्साह कॉलेज च्या पहिल्या वर्षीच्या अभ्यासात संपलेला असतो. रडत खडत आपण कसे तरी धक्क्याला लागलेले असतो. मग ते बिचारे दहा दहा वर्ष कॉलेज मध्ये जाऊन अभ्यास करत असतात. त्यांचा उत्साह मास्टर्स नंतर पण टिकून असतो. थीसिस साठी ते रात्री जागवत असतात. वेगवेगळे research paper वाचत असतात. लॅब मध्ये प्रयोग करत असतात. Ph. D. मिळणं हे बुध्दी सोबतच प्रचंड पेशन्स चे काम असते. मग आपण एक respect का नाही देऊ शकत त्यांना.
आणि या चर्चेमध्ये आम्ही एक. समस्त लोकांकडून टपल्या खाणारे. इंजिनिअर लोक. सगळ्यात जास्त flexible जमात. कॉलेज मध्ये जे शिकलो आणि आपण पैसे मिळवण्यासाठी जे करत आहोत त्याचा संबंध असतोच असे नाही आणि नसतोच असेही नाही. आणि याचे कुठलेही दुःख आम्हाला नसते. अशा सामान्य तत्वावर जगणारी सामान्य जमात. नोकरी करून पैसे कमवायची हमी तर मिळतेच डिग्री सोबत. पण गरज पडलीच तर त्याच सोबत वारा वाहिल तसे वाहून वाट्टेल तिथून पैसे ओढून आणू शकतात. शेअर मार्केट मध्ये तर बहुसंख्य IT वाल्यांचे account सापडतील. कोणी कुठल्या बिझनेस मध्ये स्लीपिंग पार्टनर असतो. कोणी ऑफिस ची night duty करत करत दिवसा अजून कुठे पार्ट टाइम काम करत असतो. कोणी Mechanical वाला boom आहे म्हणून. आयटी मध्ये येऊन कोडींग करताना दिसतो तर कोणी सिव्हिल वाला नोकरी सांभाळत गावाकडच्या घराचे बांधकाम करताना दिसतो. आमचा रविवार पेठेत ठोक कापड मार्केट मधला शेठ coep pass-out आहे.
याला माज म्हणत असतील तर हो माज आहे. कारण तो माज कमावलेला आहे. कोणालाही हिणवण्याचा उद्देश नाही. आम्हाला पक्के माहीत आहे की चक्रवाढ व्याज जमत नसल्याने आम्ही कॉमर्स ला एडमिशन घेतली नाही. आम्हाला पक्के माहीत आहे की इंडियन पिनल कोड, इतिहासातल्या सनावळी आपल्याला पाठ होत नाहीत. ज्ञानेश्वरी वर अभ्यास करून मराठी घेऊन M.A. आपल्याला नाही जमणार. बॉर्डर वर असलेल्या जवानांमुळे आपण सुखाने झोपतो, शेतकऱ्यांनी कमावल्याने सुखाचे खातो हा सगळ्याची पूर्ण पणे जाण आहे. त्यामुळे त्या त्या क्षेत्राचा सार्थ अभिमान आम्हाला आहेच. त्या मित्रांचा पण अभिमान आहे. फक्त गल्लोगल्ली चे डॉक्टर इंजिनियर म्हणून उगाच कोणी टप्पल मारली तर ती वर्मी लागते. आई बापाने पोटाला चिमटे घेऊन लाख लाख फिया भरलेल्या आठवतात. रात्र रात्र जागून केलेली सबमिशन आठवतात. एका मध्यम वर्गीय कुटुंबातले आर्थिक परिस्थिती शिक्षणाने सुधारते एवढ्या एका भाबड्या समजुतीने मरमर करणारे आम्ही. गल्लोगल्ली चे डॉक्टर इंजिनियर!! आमचे काम, आमचा अभिमान!!!
-- अवनी गोखले टेकाळे
Madat👌👌
ReplyDelete