मला विशेष ओळख नसलेल्या एका काकांनी उगाच एकदा टोमणा मारलेला. आयटी मध्ये नोकरी त्यात बरेच सारे छंद म्हणजे स्वयंपाकाची बोंब असणार. ऐकून वाईट वाटलं. असे का विचार? मूलभूत गरजा तीन. त्यातली अन्न ही प्रमुख. त्यासाठी तर सगळे. मग असे का वाटते लोकांना की नोकरी करणाऱ्या बाईला स्वयंपाक करायला आवडतं नसेल? खातो आम्ही पिझ्झा आवडीने पण आम्हाला थालीपीठ करायला जमत नसेल, खायला आवडतं नसेल हे तुम्ही कोण ठरवणार? त्यामुळे वाटले लिहावेसे.
होतं काय माहितेय. डंखावर मसाले कुटायला जाताना काय ड्रेस कोड नसतो कुठला. पण लोकांना वाटतं तसं. तिथे लोकांना मोठं कपाळभर कुंकू, हातभर बांगड्या, संसाराचा भक्कम अनुभव असलेल्या, केस पिकायला लागलेल्या, लुगडं नेसलेल्या बायका बघायची सवय लागलेली असते. मी जाते तिथे मोटार सायकल चालवत. Splendor वाल्यांनी खरंतर advertisement करावी इतकी पुदडली आहे ती गाडी. वाटेल ते सामान त्यावर लोड करून. गाडी main stand वर लाऊन उतरताना साधारण अवतार असा असतो. जीन्स टी शर्ट, कपाळाला टिकली नसतेच बऱ्याचदा, हातात काही नसतेच बऱ्याचदा, केस मोकळे सोडलेले. आणि मोबाईल वर इंग्लिश बोलत बोलत पिशव्या ठेवल्या तिथे कांडप वाल्याकडे, की पिशव्या मध्ये काय आहे बघायच्या आतच समोरचा मनात म्हणत असावा. बाप्पा, wrong number!! आणि मी थाटात सांगते पाच किलो कांदा लसूण मसाला, चार किलो काळा मसाला, तीन किलो मिरचीची पावडर, किलोभर चहा मसाला, सांबार मसाला आणि असे बरेच काय काय भाजलेले खडे मसाले माझ्या पोतडीतून बाहेर पडतात. आणि तो बधीर होऊन बघत असताना मी म्हणते तासाभरात करून ठेवा पटकन मी येते परत.
आजच एक मैत्रीण म्हणाली तू मसाल्याला आणि पारंपरिक पिठांना glamour दिलंय. हो प्रयत्न तर तोच आहे. मला वाटतं ते glamour लवकरच मिळावं. किती दिवस आया, आज्या, सासवा लोणची, मसाले आणि भाजण्या बनवून आपल्या लेकी बाळींना देत राहणार? कधीतरी उलट आपण बनवून त्यांना देऊन बघावं की. काय मग, पटतंय का? तुम्हाला आहे का अभिमान, तुम्ही केलेल्या कामाचा. असेल तर लिहा की तुम्ही पण एखादा ब्लॉग. माझे काम, माझा अभिमान.
मीठ ना, घाल ग अंदाजाने,
याचे अचूक प्रमाण ती जाणते!!
हातात पळी घेतलेली ती मग,
देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा भासते!!
|| श्री अन्नपूर्णा प्रसन्न||
-- अवनी गोखले टेकाळे
Jabbbbardast👌👌👌👌👍👍👍👍
ReplyDeleteThank you Vinaya
Delete