Tuesday, August 4, 2020

मी लिहिते..

मी लिहिते.. का लिहिते? माहित नाही.. ढग दाटून येतात.. सरीवर सरी येतात.. परत निरभ्र आभाळ.. एवढेच काय ते.. मनाला रिते करण्याचे एक माध्यम.. प्रत्येकासाठी वेगळे असते.. माझ्यासाठी लिखाण.. जेवढा वेळ मी लिहीत असते तेवढा वेळ मी पूर्ण वेगळ्या विश्वात असते.. सुख दुःख आनंद तणाव या सगळ्याच्या पलीकडे.. हे सगळे कोणीतरी लिहून घेते आपल्याकडून.. का कशासाठी माहित नाही.. पण मागे फिरून मी जेव्हा स्वतः लिहिलेले वाचते तेव्हा माझाही विश्वास नाही बसत की हे मी लिहिले.. 

कशावर लिहिते? कशावर पण लिहू शकते.. विषय दिलात तर लिहिते, विषय नाही दिलात तरी लिहिते.. कविता लिहिते, लेख लिहिते, कथा लिहिते, पत्र  लिहिते.. चारोळ्या लिहिते.. चारोळी ला उत्तर प्रतिउत्तर देते.. मनाचा मनाशी संवाद होतो तो उतरवते.. बऱ्याच वेळा एखादे उत्तर मी शोधायचा प्रयत्न करत असते.. वेगवेगळ्या विषयांना छेडताना ते नकळत सापडावं अशी स्वतः कडूनच अपेक्षा ठेऊन लिहिते.. कधी उत्तरे सापडतात.. कधी नाही सापडत.. मग वाटत सगळ्याच प्रश्नांची उत्तरे ज्या दिवशी सापडतील त्या दिवशी बंदच होईल की लिखाण.. म्हणून परत ते अनुत्तरित प्रश्न तसेच ठेऊन देते.. बंद कुपीमध्ये.. 

आता पुढचा मुद्दा स्त्री लेखिका आणि त्यांचे विषय.. मुळात जे मला पहिल्यापासून ओळखतात त्यांना माहित असेल की फार वेळ समोर बसून कोणी फॅमिली गॉसिप, सोन्याचे दागिने आणि त्याचा तोळा मासा किंवा मग पार्लर, मेक अप, साड्या अशा चर्चा करायला लागले की मी तिथून कल्टी मारलेली असते.. ते ज्ञान कमी असेल कदाचित माझ्याकडे.. हरकत नाही.. पण आहे हे असं आहे.. नाही जमत फार वेळ.. हे खरे.. त्यामुळे बहुतेक लिखाणात अलका कुबल च्या picture सारखे विषय नाही येत.. पण तरी!! तरी मी स्त्री सुलभ सगळी नाती जगते हे माझे मन कसे विसरेल.. जेव्हा मी लिहिते तेव्हा ते स्त्रीमन व्यक्त होणारच ना, मग त्यात चुकीचे काय आहे? आजपर्यंत माझ्या लेखणीतून पुरुषांना हिणवणारे एक वाक्य गेले असेल तर लगेच मला दाखवून द्यावे.. मोठी माणसं म्हणतात तसं नावात काय आहे? लेखणी स्त्री च्या हातात आहे का पुरुषाच्या हे महत्वाचे नाही.. आहे सामर्थ्य ते शब्दात.. ते शब्द वाचा.. आवडले, पटले तर हो म्हणा.. नाहीतर नाही म्हणा.. आपली तयारी दोन्हीची.. स्वानंद मिळतो तो ब्लॉग लिहिताना.. त्याचे पुढे काय करायचे ते वाचकांच्या हातात.. बुद्धी, प्रतिभा, शब्दसंपदा यांचे तारण ठेवले आहे तुमच्या समोर.. 

समाजप्रबोधन, स्त्री चा उद्धार हे खूप मोठे विषय आहेत.. असे काही जमत नाही आपल्याला.. जमत ते एकच.. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं.. तर जे जगतो ते लिहिणारी मी एक व्यक्ती आहे.. मध्यम वर्गीय समाजाचा एक आवाज.. चाकोरीतले जगणे.. फार काही परीकथा नाहीत.. कोणी खलनायक नाहीत.. नायक नायिका असतील तरी ते रोज भेटणारे.. बहुतेक त्यांची ओळख "तो ती किंवा ते" गर्दीतले चेहरे.. फक्त सर्वनाम घेऊन जगणारे.. विशेष नाम नसणारे.. धोपटमार्ग सोडू नको म्हणणारे.. तरी त्यांना आवाज आहे.. त्यांचा आवाज व्हायचा प्रयत्न करणारी मी.. बाकी काय लिहू.. सध्या एवढंच.. 

-- अवनी गोखले टेकाळे 

2 comments:

  1. खूप सुंदर ब्लॉग्स आहेत अवनी, वेळ काढून वाचेन

    ReplyDelete