Thursday, February 27, 2020

प्रिय मराठीस,

प्रिय मराठीस,

काय ग दचकलीस का काय ..  हल्ली कोणी पत्र लिहायला जात नाही एकतर.. आणि त्यातून एक भाषा दुसऱ्या भाषेला पत्र लिहिते म्हणजे काय..   
तशी आपल्यात भांडणं नव्हतीच ग कधी.. भांडतात ती माणसं.. पण त्यात आपल्याला एकमेकींच्या प्रतिस्पर्धी ठरवलं गेलं.. मी तुला नष्ट करू बघत आहे हा आरोप लागला.. पण मी ते कधी करणार नाही आणि करूही शकणार नाही.. मुळात समृद्ध आणि संपन्न वारसा असलेल्या तुला त्याचे भय वाटायचे कारण सुद्धा नाही.. 
थोडी नाराज दिसतेस अशात.. हल्ली सगळ्या भाषांची सरमिसळ करून बोलतात म्हणून.. अग मराठी माणूस जगभर पसरला.. मिसळला.. रुजला.. एकदा  मराठी माणसाच्या मित्रांची नावं ऐकून तर बघ म्हणजे समजेल मला काय म्हणायचं आहे ते.. येतात त्याला चार भाषा.. पण तुझी जागा नाही घेऊ शकत कोणी.. साता समुद्रापार रहात असलेली मुलं सुद्धा घरी मराठीतच बोलतात ग अजून.. घरातून चकल्या, पुरणपोळी चा शिधा आला की सगळ्या मित्रांमध्ये वाटून खातात तेव्हा पिझ्झा, बर्गर फिके पडतात ग अजून पण.. मध्यंतरी काय झालं होत की इकडे राहणाऱ्या मुलांना आवड असून पण मराठी साहित्य वाचायला मिळत नव्हतं.. पण आता तर इंटरनेट च्या युगात ती पण सोय झाली आहे.. मग कशी कमजोर होशील तू.. 
अजून एक तक्रार ऐकायला येते ती म्हणजे आजकालच्या तरुण पिढीची भाषा बदलत चालली आहे.. माहित आहे ना.. ज्या भाषेत एकाही नवीन शब्दाची भर पडत नाही त्याला मृत भाषा म्हणतात ते.. भाषेत नवीन नवीन शब्दांची भर पडत असणं हे भाषा समृद्ध होत असल्याचं आणि जिवंत असल्याचं लक्षण आहे.. त्यामुळे काळजी नसावी.. 
अजून एक तक्रारीचा सूर येतो तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचे माध्यम.. शिकू दे मुलांना मराठी, हिंदी, इंग्लिश माध्यमातून.. जोपर्यंत त्यांच्या घराच्या फडताळात पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, कुसुमाग्रज, ना धो महानोर, अच्युत गोडबोले, रणजित देसाई, अनिल अवचट, आनंद यादव, ग्रेस, संदीप खरे यासारख्या अनेक लेखकांची पुस्तके दाटीवाटीने नांदत आहेत तोपर्यंत त्या तरुण पिढीच्या मराठी भाषेची काळजी नसावी.. साहित्यावरून आठवलं आजकाल नव्याने रुजलेल्या अलक सारख्या साहित्य प्रकारातून तरुण पिढी अतिशय कमी शब्दात आपले विचार फार प्रभावीपणे मांडत आहे..  
भाषेचे प्रकार दोन.. बोली भाषा आणि लेखनशैली.. बोली भाषा दर चार मैलावर बदलते.. आणि ती तशीच ऐकायला गोड वाटते.. म्हणजे कीर्तन ऐकताना ते बोली भाषेत केलेलं जास्त भिडत मनाला.. पण लेखनशैली च थोडं वेगळं असतं गणित.. त्यात व्याकरण शुद्धलेखन याला खूप महत्व आहे.. म्हणजे बघ ऑफिस मध्ये हाताखालच्या माणसानी एखादा e-mail केला इंग्लिश मध्ये आणि त्यात ढीगभर grammar आणि spelling mistake केल्या आणि मग वरती सांगितलं की आमच्या घरी आम्ही असंच बोलतो तर मला तर नाही आवडणार हे.. भाषा जतन करायचं समृद्ध करायचं काम आजची पिढी करतच आहे.. फक्त त्यांना एवढी कानपिचकी दे म्हणजे झालं.. 
शेवटी काय माणूस दिवसभरात किती का भाषा बोलेना.. त्याच्या डोळ्यात वेदनेने पाणी तरळत तेव्हा डोळे जी भाषा बोलतात ती खरी त्याची मातृभाषा.. भावनांचा आवेग व्यक्त होतो तो मातृभाषेतच.. बाकी काय आपण दोघी सरस्वतीच्याच लेकी.. एक नऊवारी नेसलेली तर एक फ्रॉक घातलेली एवढाच काय तो फरक.. खंबीर आहेसच.. आत्मविश्वास कधी ढळू देऊ नको..
-- तुझीच 
इंग्लिश भाषा.. 

No comments:

Post a Comment